Saturday, August 22, 2026

नको कोणाला सांगू...

काय कुठे कधी कसे झाले सांग मला,
कोण कोणाला कधी काय बोलले सांग मला,
त्या बातमीला तिखट मीठ लावायचे मला,
"नको कोणाला सांगू" म्हणत सर्वांना सांगायचे मला...

कोणाचं कुठे चाललंय काय,
कोणाच्या घरी शिजतंय काय,
कोणाचा कशात रुतलाय पाय, 
अरे हाय काय नि नाय काय,
सर्व ऐकून आहे मी सर्व ठाऊक आहे मला,
"नको कोणाला सांगू" म्हणत सर्वांना सांगायचे मला...

कोणाला मिळालं promotion,
कोणाला आलं depression,
कोणाला कसलं tension,
कोणाला कशाचं obsession,
सर्व ऐकून आहे मी सर्व ठाऊक आहे मला,
"नको कोणाला सांगू" म्हणत सर्वांना सांगायचे मला...

स्वतःच झाकायची सवय मला,
दुसऱ्याचं बघायची आवड मला,
जगाच्या काळजीत दिवस सरतो,
बातम्यांचा मी चालता फिरता गल्ला,
सर्व ऐकून आहे मी सर्व ठाऊक आहे मला,
"नको कोणाला सांगू" म्हणत सर्वांना सांगायचे मला...

----- विभव जोगळेकर

Friday, August 21, 2026

रंग सावळ्याचा

रंग सावळ्याचा मला भावला,
रंग सावळ्याचा मनी सजला...

यशोदेच्या कान्हा तान्हुला, 
पुतनेस मारीता जाहला,
फेडाया मातृ ऋण यशोदेचे,
मुखी ब्रम्हांड दाविले गं तिला,
कालिया मर्दन करुनी गं,
वाचविले अवघ्या गोकुळाला,
रंग सावळ्याचा मला भावला,
रंग सावळ्याचा मनी सजला...

राधेचे प्रेम निस्सिम मिळाले,
हरी गोकुळात असा रमला,
पूजुनी गोवर्धन पर्वताला,
गर्व इंद्राचे हरता जाहला,
मातला कंस मामा त्याचा,
लोकरक्षणा वधीले गं त्याला,
रंग सावळ्याचा मला भावला,
रंग सावळ्याचा मनी सजला...

राजसभेत शील राखिले,
द्रौपदीचा बंधू शोभला,
कुरुक्षेत्री गीता सांगुनी,
मार्ग अर्जुना दाविला,
अवतार हा हरीचा,
किती वर्णू मी त्याच्या लीला,
रंग सावळ्याचा मला भावला,
रंग सावळ्याचा मनी सजला...

------ विभव जोगळेकर

Wednesday, August 19, 2026

काय असे राहून गेले

काय असे राहून गेले, 
साद घालतो कुणी भूतकाळातूनी,
का असे वाहून जाते मग,
टचकन पाणी असे डोळ्यातूनी,

नभी दाटून येती कृष्ण मेघ तशा,
दाटून येती आठवणी,
मन धावते, शोधते, रमते का,
क्षण ना येती ते परतुनी,
काय ओढ ही, का वेदना,
युग लोटले तुला जाऊनी,
का असे वाहून जाते मग,
टचकन पाणी असे डोळ्यातूनी,

अजूनही जुन्या कोऱ्या वहीत,
पहिल्या पानावर तुझी लेखणी,
त्या लेखणीत दडल्या आहेत,
तुझ्यासंगे अनेक आठवणी,
विसरून गेलो म्हणता म्हणता,
आठवण येते अचानक कुठुनी,
का असे वाहून जाते मग,
टचकन पाणी असे डोळ्यातूनी,

अजूनही जेव्हा पाऊस येतो,
मन नकळत जाते तिथेच,
मिटल्या डोळ्याआड अचानक,
जुने दिवस दिसतात तसेच,
वर्तमानात असे बेसावध,
क्षण येती जुने परतुनी,
का असे वाहून जाते मग,
टचकन पाणी असे डोळ्यातूनी...

---- विभव जोगळेकर

Sunday, August 16, 2026

भुरळ

जी वेचीली शब्दासुमने ती सारी,
तुला वर्णाया अपुरीच पडली,
तुला पाहता विसरलो मी सारे,
कशी मनास या भुरळ पडली...

होतो सुखात मी एकटाच आधी,
मी, माझा, मोकळा स्वच्छंदी,
सहवास तुझा वेड लावून गेला,
आगळीच मस्ती नी वेगळीच धुंदी,
अजून ना कळते मला की,
तुजवरी कशी ही प्रीत जडली,
तुला पाहता विसरलो मी सारे,
कशी मनास या भुरळ पडली...

तव लोचनी चांदण्यांची जणु,
रात्र मोहक अशी ही सजली,
मन गुंतता त्या मोहक लोचनी, 
प्रीत आपुली अजूनच खुलली,
या प्रितीची, तुझ्या सहवासाची,
सवय मनास अशी ही जडली,
तुला पाहता विसरलो मी सारे,
कशी मनास या भुरळ पडली...

तुझीच आस मनास आता,
तुझ्या विना मज नकोच काही,
एक क्षणाचाही विरह आता,
मनास या मंजूर नाही,
इथून परत फिरण्याची आता,
वाट कुठली नाही उरली,
तुला पाहता विसरलो मी सारे,
कशी मनास या भुरळ पडली..

--- विभव जोगळेकर

समुद्र

आज पुन्हा एकमेकांसमोर, उभे ठाकलो आम्ही,
तो अस्वस्थ बेचैन, तितकाच शांत नि स्थिर मी,

लाटांचा गाज, भरतीचा जोर, तो एकटाच गर्जत होता,
अथांग विशाल सागर जणू उग्र, संतापलेला होता,
त्याची व्यथा ऐकण्या, काही पाऊलखुणा, शिंपले नी मी,
तो अस्वस्थ बेचैन, तितकाच शांत नि स्थिर मी,

त्याची गाज ऐकता ऐकता, मी ही मग बोलता झालो,
वरवर शांत भासणाऱ्या मनातील एक एक कप्पे उघडता झालो,
आता सूर्य अस्ताला गेला, राहिल्या काही पाऊलखुणा, शिंपले नी मी,
तो अस्वस्थ, बेचैन, तितकाचं अस्वस्थ, बेचैन मी,

शेवटी रिते झाले मन, निरोपाची वेळ आली,
निरोप देण्या एक लाट हलकेच स्पर्शून गेली,
किनारी राहिल्या काही पाऊलखुणा, शिंपले, घरी परतलो मी,
तो शांत, स्थिर, आता किंचित शांत मी...


----- विभव जोगळेकर

Tuesday, August 11, 2026

पाऊस

नेहमीप्रमाणे निघालो मुलाला, सकाळी शाळेत पोचवायला,
गर्जत गर्जत तेवढ्यात, पाऊस लागला कोसळायला,

आम्ही मग गाडीत बसलो, निघालो सावकाश सावकाश,
सिग्नलला आमच्यासमोर होतं, गाडीवर एक जोडपं खास,

पाऊस आता थोडा संथ झालेला, मुलगी बसलेली बिलगुन त्या मुलाला,
पुढे काय होईल विचाराने, मी अस्वस्थ लागलो व्हायला,

मुलीने त्याच्या केसावरून हात फिरवत, चक्क मानेवर चुंबन दिले,
मी पटकन ओशाळून, शेजारी मुलाकडे पाहिले,

त्याची नजर समोर खिळलेली, चेहऱ्यावर कुतूहल भारी,
मुलाचं लक्ष कसं वळवावं, ह्याची करायला लागलो तयारी,

"ती होंडा ची CBR ना रे बाबा?" तेवढ्यात मुलाचा प्रश्न आला,
व्वा, अजून मन निरागस आहे पोराचं, विचार हाय सा करून गेला,

एवढ्या पावसातल्या घडामोडीत, मुलाचं लक्ष बाईक कडे होतं,
माझं मन मात्र उगाचच, सगळीकडे धावत होतं....

------ विभव जोगळेकर

Wednesday, July 22, 2026

स्टेशनवरची प्रीत

नेहमीप्रमाणे पुन्हा तो ठाण्याला उतरला, 
वेगळं सांगायलाच नको, घामाघूम झालेला,
गर्दीतून वाट काढत त्याने बाकडं गाठलं ,
कटिंग घेऊन तिच्या येण्याची वाट पाहू लागला,

पुढच्याच ट्रेन ने आली ती, फलाटावर उतरली,
त्या गर्दीतही सुगंधी झुळूक त्याला स्पर्शून गेली,
गर्दीतून वाट काढत तिनेही बाकडं गाठलं,
दुकानदाराने सवयीने एक चिक्की सरकवली,

भेट झाली, चिक्की संपली, तास सहज निघून गेला,
निघायची वेळ येताच शेवटी तिने प्रश्न केला,
"तू बदलापूर, मी बदलापूर, 
असं ठाण्याला किती दिवस भेटायचं,
आपलं हे नातं आता पुढे कधी सरकायचं?"

चेहरा पडला बिचाऱ्याचा, शांत होऊन तो उत्तराला,
डॉक्टर म्हणालेत म्हातारीकडे एकच महिना शिल्लक राहिला,
डोळ्यात टचकन पाणी आलं, जाणीव तिला परिस्थितीची,
घरात फक्त जागा होती, चौघांपूरती रहाण्याची,
उद्या परत भेटण्यासाठी, दोघांनी निरोप घेतला,
तो हळूच शांत होऊन डब्याकडे वळला,

आज एक वर्ष सरलं, दोघे नेहमीप्रमाणे तिथेच भेटले,
तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते, त्यानेच प्रेमाने घातलेले,
चिक्की झाली, कटिंग झाला, तेवढाच गर्दीत एकांत मिळाला,
दोघे निघाले घरी, उद्या पुन्हा एकांतात भेटायला...

---- विभव जोगळेकर

Tuesday, July 21, 2026

बाबा

एक एक दिवस करता, वर्ष आता सरले,
तुमच्याशी बोलणे होऊन वर्ष आता उलटले,
अजूनही ते क्षण शेवटचे, तसेच मनात कोरलेले,
आता फक्त आठवणीतले क्षण तेवढे जपलेले...

जन्मलो तेंव्हा कदाचित बोट असेल धरले मी तुमचे ,
शेवटी मात्र माझे हात घट्ट पकडून होते हात तुमचे,
नियतीचे संकेत होते, आयुष्याचं वर्तुळ पूर्ण झाल्याचे
मन मात्र तयार नव्हतं, हे सत्य स्वीकारण्याचे,
तो स्पर्श, ते क्षण माझ्या मनात असे कोरले,
आता फक्त आठवणीतले क्षण तेवढे जपलेले...

अजूनही निघता कुठल्या प्रवासा आठवण तुमची येते,
"निघतोय, पोचलो की कळवतो" सांगाया कोणी नसते,
पोकळी ती ह्या मनाला व्यापून असे टाकते,
डोळ्यात मग दुःख सारे दाटूनी असे येते,
ते बोलणे, ते आशीर्वाचन सारे आता संपले,
आता फक्त आठवणीतले क्षण तेवढे जपलेले...

रितेपण आले असे, आभाळाएवढी पोकळी,
आता राहिली शिल्लक आठवणीने भरलेली झोळी,
जडस्वरूप नाहीत तरी हक्काने मी मागतो,
तुम्ही दाविल्या मार्गावर चालण्या आशीर्वाद मागतो...

Thursday, July 16, 2026

महालातील चोर

महालात इथे राहतो चोर,
राजा म्हणतं त्याला शेंबडं पोर,
युगायुगांची हीच कहाणी,
ज्याची सत्ता, चाले त्याचा जोर...

प्रजा ना इथली साधी भोळी,
प्रत्येकजण भाजतो आपली पोळी,
म्हणूनच राजा निवडणुकीच्या वेळी,
दारोदार फिरतो घेऊन झोळी....

"मी", "माझे" पलीकडे, 
विचार कोणी करीत नाही,
बोलायच्या गोष्टी हजार,
प्रत्यक्षात कृती काहीच नाही...

महालातील चोर एकटा नाही,
गावोगावी त्याची जात,
स्वार्थाच्या छोट्या ठिणगीने,
पेटते सहज सत्तेची वात...

दोष देऊन फक्त राजाला,
प्रश्न इथला सुटणार नाही,
आपण बदललो नाही तर,
व्यवस्था बदलणार नाही...

युगायुगांची हीच कहाणी,
बदल घडवा आधी मनात,
जसा माणूस हवा आहे,
तसा माणूस घडवा स्वतःत...

------- विभव जोगळेकर

Wednesday, July 15, 2026

मी पांतस्थ

 मी पांतस्थ, वाट माझी काटेरी,

चाले निरंतर, आयुष्याची वारी...


सामान्य मी, रमातो संसारी,

संसाराचा भार उचलतो हरी,

हात राबती प्रपंची, चित्त रमते पंढरी,

चाले निरंतर, आयुष्याची वारी...


कर्मयोगी मी, रतीब कामाचा,

ओठी हरी नाम, ध्यास दर्शनाचा,

देह इथे, मन चंद्रभागे तिरी,

चाले निरंतर, आयुष्याची वारी...


ऊन सावली येती जाती, ऋतू बदलती,

सुख दुःखाच्या खेळात, तूच एक सोबती,

तूच माऊली सकलजनांची, तूच एक कैवारी,

चाले निरंतर, आयुष्याची वारी...


रूप सावळे, कर कटी तू उभा विटेवरी,

तुला शोधता पंढरपुरा, तू वससी अंतरी,

या वाटेवर तूच सोबती, तूच वारकरी,

चाले निरंतर, आयुष्याची ही वारी...


----- विभव जोगळेकर

Jungle

In the jungle, mighty jungle,

Full of letters, words and rhyme,

Some are dancing some are hiding,

Waiting for the perfect time...


Thoughts come flowing like a river,

Dreams come drifting with the breeze,

Pick the blossom, catch the echo,

Tie them gently, if you please...


Every poem starts with wandering,

Every poet loses way,

But the ones who keeps on searching,

Find a rainbow someday!!!


----- विभव जोगळेकर 

जंगल

 शब्दांचे हे विशाल जंगल,
शांत नि घनदाट,
भावनांच्या वाहती नद्या इथे,
शोधून त्यातून वाट...

कुठे उमलती अर्थफुले,
कुठे सुगंधी भावना,
कुठे दडल्या शांत सावल्या,
कुठे विरहाच्या वेदना...

कुठे आनंद पाखरू होऊन,
फांदीफांदीवर गातो,
कुठे व्यथेचा पानगळ होऊन,
अलगद खाली झरतो...

कवी नसतो शब्दांचा राजा,
ना तो त्यांचा निर्माता,
फक्त भटक्या प्रवाशापरी,
शोधत फिरतो वाटा...

वेचून घेतो शब्द फुले,
भावनांचा दोरा गुंफतो,
कल्पनांच्या कुशल हातानी,
काव्यहार तो विणतो...

या जंगलाचा नाही अंत,
ना संपते कधी वाट,
जितके आत शिरत जावे,
तितकाच वाढतो थाट...

---- विभव जोगळेकर

Tuesday, June 30, 2026

कॉफी आणि बरंच काही...

बऱ्याच वर्षांनी, परवा भेटली, रस्त्यावरून जाताना,
वेळ कसा गेला कळलाच नाही, गप्पा तिच्याशी मारताना,
आठवलं तिला कॉफी आवडायची, म्हणून विचारलं तिला कॉफीला,
आणि विषय मिळाला लोकांना, आमची लव्हस्टोरी चघळायला...

कॉलेज मध्ये होती जशी, तशीच अजूनही वाटली,
हसतमुख, मनमोकळी, गप्पांमध्ये हरवणारी,
ना कुठला आव, ना दिखावा, स्वभाव तिचा तसाच राहिला,
वर्षे सरली किती तरी, मैत्रीचा धागा तसाच विणलेला,
मैत्रीच्या ह्या धाग्याने, गप्पांचा डाव रंगला,
आणि विषय मिळाला लोकांना, आमची लव्हस्टोरी चघळायला...

कॉफीचे दोन कप होते, गप्पा होत्या जुन्या आठवणींच्या,
बाहेरून पहाणाऱ्यांनी मात्र, कथा लिहिल्या प्रेमाच्या,
कोणी म्हणे "जूने प्रेमी भेटले..", कुणी तर आमचे लग्नच ठरवले,
कॉफी संपण्या आधीच लोकांच्या, चर्चेस एकदम उधाण आले,
लोकांच्या ह्या चर्चेपासून दूर, आठवणींचा इथे पसारा मांडला,
आणि विषय मिळाला लोकांना, आमची लव्हस्टोरी चघळायला....

घरी पोचताच दारातच, मिश्किलपणे ताई म्हणाली,
"आई बघ तुझ्या लेकाने, माझ्यासाठी वाहिनी शोधली"
" मला आधीच संशय होता..", आईने आतून सूर आळवला,
बाबांनी तर मुहूर्तासाठी, गुरुजींनाच फोन लावला,
मी म्हटलं अहो कॉफी प्यालो, गप्पांमध्ये थोडा वेळ गेला,
आणि विषय मिळाला लोकांना, आमची लव्हस्टोरी चघळायला...

कॉफीचं बिल होतं दोनशे, चर्चा झाली लाखांची,
दोन मित्र भेटले एवढंच, पण प्रेमकथा झाली गावाची,
कॉफी संपली, निरोप घेतला, पुन्हा कधी असंच भेटायला,
आणि विषय मिळाला लोकांना, आमची लव्हस्टोरी चघळायला....

--- विभव जोगळेकर

Friday, June 26, 2026

पहिला पाऊस

 रात्री उबदार पांघरुणात, गुडूप झोपताना,
पाऊस येईल घेऊन संथ सरींच्या सुरांना..

पहाटेच्या अंधारात, डोळ्यांनी बंड पुकारलेले,
"कराग्रे" म्हणत असताना, बाहेर सरींनी गीत मांडलेले,

खिडकी, बाहेर पाऊस, आणि वाफाळणारा चहा,
खिडकीवरील थेंब म्हणतील " थोडं वेळ अजून इथेच रहा"

नित्याची कामे हाक देतील, हात कामालाही लागतील,
कोसळणाऱ्या सरी मात्र पुन्हा पुन्हा खुणावतील,

नद्या, तलाव ओढे, दुथडी भरून वाहतील,
तापलेल्या धरणी संगे, मनाचे ताप ही निवतील,

भीजरी पायवाट आता मनास खुणावेल,
खळखळणाऱ्या ओढ्यांकडे पाऊले वळतील,

पावसाच्या ह्या गाण्यामध्ये हरवून जाता जाता,
तुझ्यातलाच तू नव्याने तुला सापडले..

---- विभव जोगळेकर 

जरा थांब ना...

 तो:
तू थांब ना...जरा थांब ना...
जाऊ नको...थोडं थांब ना...

नजरेतून संवाद झाला ,
ओठांवर काही आले नाही,
भान हरपले तुझ्याच संगे,
सरली वेळ कशी कळले नाही,
बोलायची राहून गेली 
माझ्या मनीची भावना,
तू थांब ना...जरा थांब ना...
जाऊ नको...थोडं थांब ना...

सांज वेळ ही, 
जवळ तू हवीहवीशी,
प्रीत आपुली,
ही नवी नवीशी,
तुझ्याविना बेचैन मना
कसे आवरू तू सांग ना,
तू थांब ना...जरा थांब ना...
जाऊ नको...थोडं थांब ना...

ती:
भाव तुझ्या डोळ्यातले,
जाणले मी ते वाचले,
लाजुनी माझ्या मनीचे,
व्यक्त ना मी जाहले,
जाऊ दे, भेटायला
यायचे उद्या पुन्हा..

तो:
तू थांब ना...जरा थांब ना...
जाऊ नको...थोडं थांब ना...
उद्या कुठे भेटायचे
एवढे सांगून जा,
तोवरी कसे जगायचे,
तेवढे सांगून जा,
क्षण एक तुझ्याविना,
मनास आता करमेना,
तू थांब ना...जरा थांब ना...
जाऊ नको...थोडं थांब ना...

---- विभव जोगळेकर

Wednesday, June 24, 2026

रंगमंच

 पडदा वर जाण्याआधी सारे कलाकार तयार होते,
एकमेकांवरती विश्वास ठेऊन उभे होते,

नेपथ्य, प्रकाश, संगीत, साऱ्यांचीच साथ लागते,
एका कुणामुळे नाटक थोडेच चालते,
 
थोडा विचार करता, आयुष्याचेही असेच असते,
रोज नवा प्रयोग घेऊन आयुष्य उभे असते,

रोज नवी भूमिका, रोज नवे संवाद असतात,
कधी टाळ्यांचा गजर, कधी प्रसंग अवघड असतात,

कधी मित्र सावरून घेतात, कधी घरचे धीर देतात,
कधी नशिबाच्या प्रकाशात रस्ते अचानक उजळतात,

नाटकात आणि आयुष्यात एक मोठा फरक असतो,
आयुष्याच्या रंगमंचावर प्रेक्षक - कलाकार आपणच असतो,

आपणच शाबासकी द्यायची आपणच चुका स्वीकारायच्या,
आणि पडदा खाली येताच सज्ज व्हायचं प्रयोगास उद्याच्या,

आयुष्याच्या रंगमंचावर प्रयोग कधीच संपत नाही,
पडदा पडतो एक दिवसाचा, कथा मात्र संपत नाही....

--- विभव जोगळेकर

Tuesday, June 23, 2026

घर कौलारू

 घर कौलारू सुंदर, 
दाट झाडीत वसले,
कित्येक पिढ्यांचे साक्षी, 
आज एकाकी राहिले...

इथे फुलले संसार,
अनेक पिढ्यांचे,
सूर सनईचे घुमले,
अनेक लग्नांचे,
प्रत्येक नवनवरीच्या स्वागता,
घर हे सजले,
कित्येक पिढ्यांचे साक्षी, 
आज एकाकी राहिले...

कित्येक पाळणे हलले,
बाळंतिणीच्या खोलीत,
बालपण ते रमले,
घराच्या अंगणात,
बालपणींच्या आठवणीने,
घर भरलेले,
कित्येक पिढ्यांचे साक्षी, 
आज एकाकी राहिले...

आनंदाच्या क्षणी घर
नटले सजले,
काळ कठीण तो येता,
खंबीर आश्रय बनले,
काळ बदलता लोकं,
वाट शहराची चाले,
कित्येक पिढ्यांचे साक्षी, 
आज एकाकी राहिले...

ओस पडल्या ओसऱ्या,
रिते झोपाळे पडवीत,
भिंती उभ्या धीर गंभीर,
आठवणींच्या छायेत,
परतीच्या वाटेकडे घर,
डोळे लावून बसले,
कित्येक पिढ्यांचे साक्षी, 
आज एकाकी राहिले...

----- विभव जोगळेकर

Sunday, June 21, 2026

आयुष्याची संध्याकाळ

 दिवस सरला आता संध्याछायेत जगणे,
आता किनारी बसुनी सूर्यास्ताची वाट पाहणे...

संसारासाठी सारी उमेद खर्चून झाली,
लेकरांच्या सुखासाठी स्वप्नेही गहाण गेली,
आता उरल्या आठवणींच्या सावल्या सोबतीने,
आता किनारी बसुनी सूर्यास्ताची वाट पाहणे....

जिना जो चढायचा कधी दोन पायऱ्या एका दमात,
आता लागतो आधाराला कोणाचा तरी हात,
सलते आता थरथरत्या हातांना कोणाचाच आधार नसणे,
आता किनारी बसुनी सूर्यास्ताची वाट पाहणे....

भरले होते घर कधी आपल्या माणसांनी,
अंगण दुमदुमत होते लेकरांच्या आवाजाने,
आता उरले भिंतींशी दिवसभर बोलत बसणे,
आता किनारी बसुनी सूर्यास्ताची वाट पाहणे....

तक्रार नाही तुझ्याशी, भरभरून दिलेस सारे,
डोक्यावर छप्पर, प्रेमळ नाती, दिवस सुखाचे न्यारे,
आता ओढ पैलतीराची, नको एकाकी जगणे,
आता किनारी बसुनी सूर्यास्ताची वाट पाहणे....

------ विभव जोगळेकर

पाऊस

थेंब थेंब पावसाचा असा भिजवून गेला,
चिंब चिंब ह्या मनास असा सुखावून गेला...

निळाशार आकाशात गर्दी सावळ्या ढगांची,
सांगावा पावसाचा घेऊन आली झुळूक वाऱ्याची,
स्वर कोकिळेचा आनंद सांगून तो गेला,
चिंब चिंब ह्या मनास असा सुखावून गेला...

भेट ढगांची ढगांशी, आली साद दामिनीची,
कोसळल्या सरी संपली प्रतीक्षा पावसाची,
सुखावली धरणी गंध मातीचा सांगून तो गेला,
चिंब चिंब ह्या मनास असा सुखावून गेला...

------ विभव जोगळेकर

बाबा


When in trouble I look up to you for courage,
When in confusion I look up to you for direction,
When in doubt I look up to you for solution,
When chips are down, I look up to you for inspiration...
You have been my support, right from the time I took the first breath in this world, 
Standing with me in good and bad times, facing challenges of the world.

Saturday, June 20, 2026

Teenage

माझं teenage सुरू झालं, म्हणाले आईबाबा,
आता मूल कसं होणार, याची त्यांना चिंता...

ते सारखा याचाच विचार करत बसतात,
तू बदलणार असं म्हणून स्वतःच खूप बदलतात,
क्षुल्लक गोष्टीवरून रागावणे आता खूपच normal आहे,
त्यामुळे ओरडणं सारखं ऐकून आता त्याची सवय झाली आहे,
छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड ते करतात,
स्वतःला उगाचच स्वतःच त्रास करून घेतात,

बरोबर आहे तुम्हाला आम्हालाच सुधारायचंय,
पण आता जरा जास्तच होतंय,
Don't worry मी नाही बदलणार, ते आपण बघू,
पण तुम्हीही अजिबात नका बदलू...

-----  नहुष जोगळेकर 

WhatsApp वरची भक्ती

 WhatsApp वरची भक्ती हल्ली फारच वाढली आहे,

प्रत्येक दिवशी एका देवाची वर्णी लागली आहे...


सोमवार येताच प्रगट होतात भोलेनाथ status वर,

महाकाल, रामेश्वर ते केदारनाथ सगळेच देतात वर,

मंगळवार नी संकष्टी गणपतीचे वार असतात,

अष्टविनायक, दगडूशेठ पासून गावागावातले गणेश प्रगटतात,

बुधवार तर वार पंढरपूरच्या विठ्ठलाचा,

थाट दिसतो status वरती विठ्ठल-रखुमाईचा,

गुरुवारची तर विचारू नका एवढी गर्दी होते

गिरनार दत्तप्रभूं संगे स्वामींची वर्णी लागते,

शुक्रवार तर नारी-सम्मानाचा वार आहे,

तुळजाभवानी महालक्ष्मी ह्यांच्यासाठी reserved आहे,

शनिवारी मग उफाळून येते सर्वांचीच भक्ती,

भक्तश्रेष्ठ हनुमंताची दिसते सर्वत्र शक्ती,

रविवार तेवढा अजून बऱ्यापैकी मोकळा आहे,

 WhatsApp वरची भक्ती हल्ली फारच वाढली आहे.....


तुमच्या आणि देवामधला भक्ती ही दुवा आहे,

भक्ती असावी personal, पण हल्ली फारच social झाली आहे,

लक्षात घ्या भक्ती ही खूपच Spiritual गोष्ट आहे,

तुमच्या पगाराएवढीच ती Confidential गोष्ट आहे,

देवही म्हणत असेल वरती पाहून हा प्रकार,

"माझ्यापेक्षा Status चाच दिसतोय जास्त प्रचार!",

दर्शनापेक्षा Forward चीच आता घाई झाली आहे,

WhatsApp वरची भक्ती हल्ली फारच वाढली आहे...


----- विभव जोगळेकर

Friday, June 19, 2026

जिंदगी

 यूँ न ज़िद करो तुम, ज़िंदगी अकेले न कटती,
जब शाम गुज़रे तन्हा, तो दिल को है चुभती...

दिन तो गुज़रेगा यूँ ही तुम्हारा,
ज़रूरत न मन को किसी का सहारा,
पर ख़ामोश रातें धीमी हैं चलती,
जब शाम गुज़रे तन्हा, तो दिल को है चुभती...

थाम लेना हाथ किसी का कमज़ोरी नहीं है,
खुशियाँ बाँटने जैसी और खुशी नहीं है,
कुछ रिश्ते दुआ बनकर हैं साथ निभाते,
जब शाम गुज़रे तन्हा, तो दिल को है चुभती...

माना कि वक़्त कोई ज़ख्म छोड़ गया,
जिसे कहा अपना, वो पराया कर गया,
क्यों सज़ा दो ख़ुद को, ज़िंदगी ऐसे न चलती,
जब शाम गुज़रे तन्हा, तो दिल को है चुभती...

चलो हमसफ़र न सही, एक दोस्त तो चाहिए,
ख़ामोश लम्हे जो बाँटे, ऐसा कोई चाहिए,
मुस्कुराते हुए उम्र गुज़र जाएगी,
ज़िंदगी फिर और प्यारी हो जाएगी...

यूँ न ज़िद करो तुम, ज़िंदगी अकेले न कटती,
जब शाम गुज़रे तन्हा, तो दिल को है चुभती...
— विभव जोगळेकर

Sunday, June 14, 2026

बायकोची तयारी...

वाट बघ माझ्या तयार होण्याची तू एकदा तरी
तू पण तयार होऊन बघ माझ्या आधी कधीतरी....

घड्याळाकडे पाहत मी दाराशी उभा राहतो,
"झालच रे आता" म्हणता म्हणता, तास सहज निघून जातो,
आरशाशी तुझ्या गुपित गप्पा कळू दे मला कधीतरी,
तू पण तयार होऊन बघ माझ्या आधी कधीतरी...

कुठली साडी, कुठले दागिने, कुठला रंग शोभतो,
प्रत्येक वेळी हा प्रश्न पुन्हा नव्याने का पडतो,
प्रत्येक रूपात तू दिसतेस सुंदर, माहीत असते तुला परि,
तू पण तयार होऊन बघ माझ्या आधी कधीतरी...

तयारी तुझी पाहताना मी कधी चिडतो कधी हसतो,
भरले कपाट तरी कपडे नाहीत, हा गोंधळ तुझा मी पाहतो,
तयार होऊन मी वाट पाहतो कधी येशील तू वेळेवरी,
तू पण तयार होऊन बघ माझ्या आधी कधीतरी...

अनुभव घ्यायचा आहे माझ्याआधी तुला तयार पहाण्याचा,
तू थांबली असताना निवांत आवरण्याचा,
वाट पाहण्याचा अनुभव तू पण घे एकदा तरी,
तू पण तयार होऊन बघ माझ्या आधी कधी तरी...

समजतो मी तुझी धडपड नीटनेटके दिसण्याची,
प्रत्येक प्रसंगी स्वतःची सर्वोत्तम प्रतिमा जपण्याची,
साज शृंगार असो वा नसो तूच माझी गोड परी,
तरी पण एकदाच, तयार होऊन बघ माझ्या आधी कधी तरी...

----- विभव जोगळेकर

Thursday, June 11, 2026

निसर्गाची शाळा

कुठल्या बरं शाळेत जातात फुलपाखरं सारी?
असते का ग त्यांना पण  सुट्टी रविवारी?
गणवेश ह्यांचा रंगीबेरंगी प्रत्येकाचा वेगळा,
फुलाफुलांवर उडत शिकण्याचा आनंदच वेगळा,

कुठल्या बरं शाळेत जाते छोटी मुंगी ताई?
रविवारची पण शाळा घेतात का गं ह्यांच्या बाई,
कडक शिस्त असेल शाळेत रांगेत बघ त्या जातात,
साखर पडता जमिनीवरती कशा लगेच गोळा होतात?

मधमाशीच्या शाळेमध्ये मधच असेल डब्याला,
गुणगुण गाणी शिकवत असतील बाई साऱ्या वर्गाला,
फुलांमधला रस गोळा करण्याचा गृहपाठ असेल भारी,
सुट्टी होताच उडत जातील पोळ्यातल्या घरी,

चिमण्यांच्या शाळेमध्ये शिकवत असतील उडायला,
काडी काडी जमवून  मग सुंदर घरटे बांधायला,
चिवचिव गप्पा रंगत असतील मधल्या सुट्टीमध्ये,
पंख पसरून उडत असतील निळ्याशार आभाळामध्ये,

निसर्गाच्या ह्या शाळेत प्रवेश मिळेल का गं मला,
पहिल्या बाकावरती बसायला देतील का ते मला,
रविवारी पण जाईन मग मी शाळेत शिकायला,
फुलपाखरासांगे मिळेल मला भरपूर खेळायला...

----- विभव जोगळेकर

Wednesday, June 10, 2026

वृक्ष ऐटीत उभा

एका गावात वृक्ष,
असा उभा ऐटीत,
येता जाता वाटसरू,
बसत त्याच्या छायेत,

त्याच्या अंगाखांद्यावर,
पक्षी  खेळती अनेक
गोड फळे खायला,
येती थवे कित्येक,

काय झाले अचानक,
काहीच कळेना,
त्या झाडाची फळं,
कोणालाच दिसेना,

आले कावळेदादा,
कराया बात खास,
"काय झाले मित्रा,
का दिसतो उदास?",

म्हणे वृक्ष हळुवार,
 "कालच मी ऐकले,
रस्ता करणार रुंद, 
माझे दिवस संपले",

हे ऐकून महंत,
जे बसले त्या छायेत,
दुःख दाटून आले,
 त्यांच्या अंतःकरणात,

म्हणाले गावकऱ्यांना,
"नका  वृक्ष कापू,
आपल्याच हातांनी,
विनाश नका ओढवू",

वृक्ष देती सावली,
वृक्ष देती प्राण,
त्यांच्या विना होईल,
कोरडे सारे रान,

प्रगतीच्या ओढीने,
ऐकले ना कुणी,
असे कित्येक वृक्ष,
तोडून टाकले त्यांनी,

आणि मग खरी ठरली,
त्या महंतांची वाणी,
असा कोपला तो सूर्य, 
रुसून बसले पाणी,

ना उरली पक्ष्यांची गाणी,
ना उरला सुगंध,
वृक्ष तोडून हरवला,
गावाचा तो आनंद,

आजही त्या रस्त्याने,
लोकं जेव्हा जातात,
त्या वृक्षाच्या छायेची,
आठवण काढतात...

---- विभव जोगळेकर

Thursday, June 4, 2026

Just Four More Days

It's strange how someone can be just a few days away,
Yet leave such a silence in every moment of the day.
Your laughter still lingers in the corners of this room,
But without you here beside me, even sunshine feels like gloom....

I reach across the bed at night and find an empty space,
Then close my eyes and softly trace the memory of your face,
The clock keeps moving slowly, the stars still find their way,
But my heart has learned to measure time by how long you're away....

Every cup of morning tea, every evening sky,
Carries little pieces of you that money cannot buy,
And though I know you'll soon be here, my restless heart still roams,
Searching for your voice, your touch, the feeling of coming home....

Just four more days, they tell me, then you'll be here with me,
Four sunsets, four moonlit nights, four tides upon the sea,
Till then I'll keep your memories close, in every breath I take,
For loving you is not a choice—it's simply how I wake....

And when you walk back through that door, these lonely days will end,
I'll hold you just a little longer than I ever did then,
For every mile, every hour, every moment we're apart,
Only reminds me once again—you are my home, my heart....


------ Vibhav Joglekar 

Monday, June 1, 2026

लुकलुकणारे तारे

रात्री चमचमणारे तारे दिवसा कुठे जातात?
दिवसभर आभाळात का हे लपून बसतात?
घाबरतात का सूर्याला आकाशातले तारे?
की ढगांच्या गादीवर दिवसा झोपून घेतात?

चांदोबा तर कधी कधी संध्याकाळी दिसतो,
सूर्य घरी जाताना तो हळूच ढगात येतो,
तारे मात्र माझ्याशी कट्टी करून बसतात,
निळ्या निळ्या आकाशात लपून सारे बसतात,
रात्री आई छान छान दूध भात देते,
खिडकीतून आकाशातले तारे मला दाखवते,
लुकलुकणारे तारे माझ्याशी किती छान खेळतात,
मग दिवसभर आभाळात का हे लपून बसतात?

आई म्हणाली त्याची तर वेगळीच गंमत आहे,
सूर्याची म्हणे मशाल भली मोठी आहे,
मशालीच्या उजेडात तारे लपून बसतात,
ढगांच्या गादीवर दिवसा झोपून घेतात,
सूर्य जेव्हा झोपताना मशाल विझवतो,
चांदोबा मग ताऱ्यांना हळूच उठवून येतो,
सारे मग माझ्याशी किती छान खेळतात,
आणि दिवसा मग आकाशात हळूच लपून बसतात...


--- विभव जोगळेकर

Sunday, May 31, 2026

नरसोबाची वाडी

कृष्णाकाठी सांज उतरली रंग उधळुनी नभामध्ये,
मन नकळत हरवून गेले त्या शांततेच्या गर्भामध्ये..

संथ वाहते कृष्णामाई घेऊन युगांची कहाणी,
लाटांमधुनी ऐकू येते स्वामींची दिव्य वाणी..

हा तो घाट, ही ती भूमी, तपश्चर्येने पावन झालेली,
बारा वर्षे स्वामींच्या साधनेने धन्य केलेली..

वृक्ष, वेली, कणाकणामध्ये, अजुनी त्यांची चाहूल आहे,
वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीत दत्तनामाची भूल आहे...

दत्तप्रभूंची राजधानी स्वामींची तपोभूमी महान,
जिथे मिटती वादळे मनाची, आणि लाभे आत्मिक समाधान...

संधिप्रकाशी त्या नभाखाली अंतर्मुख हे मन होते,
स्वतःस शोधत शोधत जाता, स्वामींच्या चरणी रमते...

जन्मोजन्मी लाभो सेवा त्या पावन पादुकांची,
श्वासागणिक ओढ लागो, श्रीगुरूंच्या स्मरणाची।

दत्तप्रभूंची राजधानी नरसोबाची वाडी रे,
नित्य स्मरण पादुकांचे आणि मन गुरुचरणी लीन रे,
कृष्णातीरी दे विसावा पादुकांच्या छायेत,
शेवटचा हा श्वास जावो, फक्त स्वामींच्या नामात....🙏🙏

----- विभव जोगळेकर

Friday, May 29, 2026

सुकलेले झाड

एक सुकलेले झाड, झाडावर हिरवी वेल,
त्या वेलीला फुलले एक लहानसे फुल,

झाड सुकून गेलेले, आता मराया टेकलेले,
परी त्या वेलीसाठी शर्थीने उभे ठाकलेले,

ना पाने ना सावली ना पक्ष्याचा थवा सोबतीला,
त्या एका फुलाने मात्र सारा आसमंत गंधाळला,

येई वाऱ्याची झुळुक वेल अलगद डुले,
जणू सुकलेल्या झाडाशी तिचा संवाद हळू चाले,

त्या छोट्याशा फुलाने जादू अशी केली,
फुलपाखरे नि पक्षी झाडाकडे परतली,

ओस पडल्या फांद्यांना पुन्हा वसंत भेटला,
सुकलेल्या झाडालाही जगण्याचा अर्थ मिळाला,

छोटसं ते फुल किती सुचवून गेलं,
जगायचं कसं सांगून ते गेलं...


----- विभव जोगळेकर

Thursday, May 28, 2026

गावाच्या वेशीवर

गावाच्या वेशीवर वृक्ष एक डौलदार,
शेजारी त्या जुने मोडके गरीबाचे एक घर...

पारंब्यांच्या झोक्याला साथ भारी वाऱ्याची,
परी खेळाया तिथे मुले फिरकत ना कोणाची।

घराचे छप्पर कौलारू पावसाने झिजलेले,
भिंतीवर शेवाळ जुने शांतपणे वाढलेले।

दाराशी बसे म्हातारा एकटाच धीरगंभीर,
परतीच्या पावलांचा रस्ता शोधे त्याची नजर।

कधी ऐकू येई आवाज म्हाताऱ्याच्या हसण्याचा,
पौर्णिमेच्या रात्री घुमे नाद तिथे पैंजणांचा।

रात्री म्हणे कधीतरी झोका हलताना दिसे,
पारंब्यांच्या झोपाळ्यावर अस्तित्व कोणाचे भासे।

चांदण्यांच्या उजेडात वृक्ष उभा थरथरे,
त्या मोडक्या घरात पणतीचा उजेड पसरे।

कुणीच ना जाणली त्या म्हाताऱ्याची कैसी व्यथा,
डोळ्यांत साचून राहिली एकाकीपणाची कथा।

आजही ऐकू येतो नाद कधी तिथे पैंजणांचा,
एकटाच झोका न जाणे वाट पाहतो कोणाचा....

— विभव जोगळेकर

Tuesday, May 26, 2026

किनारा

ओढ लावतो मनाला तो मोकळा किनारा,
सूर्यकिरणांनी उजळला वाळूचा पसारा,
खेळ संथ लाटांचा भासे स्वगत समुद्राचे,
वाऱ्यासंगे हरवते भान या देहाचे...

क्षितिजाच्या पल्याड मावळतो दिनकर,
सोनेरी किरणांनी सजला नभाचा दरबार
सावल्यांच्या रेषांमध्ये विरते हे जग सारे,
क्षणैक थांबावे वाटे मना चित्र टिपाया हे सारे,

पावलांचे ठसे माझे अलगद मिटवती त्या लाटा,
जणू सांगती क्षणभंगूर आहेत आयुष्याच्या वाटा,
शांततेच्या गाभाऱ्यात दडले किती ते बोलणे,
निःशब्द त्या सायंकाळी चालती लाटांशी संभाषणे,

ना गर्दीचा गोंधळ ना शब्दांचा पसारा
माझ्या सोबतीला इथे अथांग किनारा,
मनाच्या शांत तळाशी उमटती जुनी वादळे,
स्मृतींच्या त्या मार्जनाने ताण मनाचा निवळे,

आकाशात मग पहिला तारा अलगद चमकून जातो,
आठवण घराची मज हळूच तो करून देतो,
निरोप घेता डोळ्यात भाव दाटे विरहाचे,
वाऱ्यासंगे हरवते पुन्हा भान या देहाचे...

----- विभव जोगळेकर

देव

कोणी पाहिला का देव कैसा दिसतो,
जैसा ज्याचा भाव तैसा त्यास भासतो...

कोणी जातो भक्तीमार्गे, कोणी ज्ञानमार्गी शोधतो,
कोणी योग साधतो कोणी अस्तित्वच ना मानितो,
कोणी दंग रामनामी कोणी सावळ्यास पुजितो,
जैसा ज्याचा भाव तैसा त्यास भासतो...

कोणा कास विज्ञानाची कर्मात देव दिसतो,
कोणी कला साधनेतून देवासंगे रमतो,
कोणी उगाच हक्क सांगून देवासंगेच भांडतो,
जैसा ज्याचा भाव तैसा त्यास भासतो...

देव आहे चराचरी सर्व ठायी वसतो,
ज्याच्या मनी अहंभाव त्यासी ना तो दिसतो,
निर्मळ चित्ते शरण जाता देव त्याचे ठायी वसतो,
जैसा ज्याचा भाव तैसा त्यास भासतो...

------ विभव जोगळेकर

Sunday, May 24, 2026

जाणीव - उणीव

गोठलेल्या मनामध्ये ना कसली जाणीव,
कळते ना मनास या कसली उणीव...

ना सुखावते मन जरी दरवळ मोगऱ्याचा,
ना बोचतो मनास आता दुरावा कुणाचा,
हरवलेल्या भावनांना शोधतोय जीव,
कळते ना मनास या कसली उणीव...

बोलायचे बरेच काही परी शांत मी रहातो,
चेहऱ्यामागील मुखवटे शांत बसून वाचतो,
नात्यांमधील बंध केंव्हाच झाले सुकून निर्जीव,
कळते ना मनास या कसली उणीव...

आठवणींचे ढग कधी दाटून येतात,
साचतो पावसाळा इवल्याशा डोळ्यात,
अश्रू वाहतात परी ना तुटतो हा जीव,
कळते ना मनास या कसली उणीव...

रात्र रात्र मी जागतो वेळ सरतच नाही,
ही तळमळ कशाची काही कळतच नाही,
मन होईल ते शांत जीवा भेटता तो शिव,
मग राहील ना कसली जाणीव - उणीव...

----विभव जोगळेकर

Thursday, May 21, 2026

Twelve years ago, you fit so perfectly in Baba’s arms…
Today, you stand beside him, almost shoulder to shoulder.

From the tiny little boy who found comfort in Aai’s embrace,
to now growing taller than her with every passing day…
we have watched you grow not just in height, but in heart too.

From riding a tiny toy cycle around the house,
to exploring roads, dreams, and little adventures on your bicycle…
every moment of your journey has been special to us.

And now, as you step into your teenage years,
we wish for you to always stay kind, curious, fearless, and full of joy.

No matter how tall you grow, how far you ride, or how big your dreams become,
one thing will never change —
our endless love, pride, and blessings for you. ❤️

Happy 12th Birthday, Nahush!
Welcome to your teenage chapter, champ! 🚲✨

Wednesday, May 20, 2026

Eyes....Be Wise

Eyes… Be Wise

Some eyes meet yours with warmth and light,
Some pass by cold, avoiding sight.
Some search for you in crowded space,
Some never pause to know your face.

Some glance at you and quickly stray,
Some look right through and walk away.
Some fear the day you’re out of view,
Some silently wait just to see you.

Some read your clothes, your skin, your style,
Some judge your worth within a while.
Some see your smile and call it grace,
Some search for flaws they can replace.

Some eyes hold storms they never share,
Some hide their pain behind a stare.
Some speak of love without a sound,
Some leave a soul completely drowned.

Some see the beauty life can weave,
Some only scars they can’t unsee.
Some carry questions deep and wide,
Some hold the answers locked inside.

Eyes can shatter, eyes can heal,
Eyes can hide what hearts still feel.
They can lift a soul above,
Or leave it aching, starved of love.

So when your gaze meets someone’s eyes,
Choose gentle truth, choose being wise.
For eyes remember, long and deep,
The wounds we give… the love we keep.

---- Vibhav Joglekar
 ( inspired by Rajashree's poem)

Thursday, May 14, 2026

संवाद

सापडेल तुम्हाला जिवलग,
तुमच्यातच कुणीतरी,
मारून पहा गप्पा चार,
स्वतःशी कधी तरी...

कशाला हवेत डोळे गुंतलेले,
सतत कामात व मोबाईल मध्ये,
डोळे मिटून संवाद साधा,
स्वतःशी कधी तरी...

कशाला हवे प्रत्येक वीकएंडला,
बाहेर जाणे, मित्रांशी बोलणे,
 "आनंद" शोधाया संवाद साधा,
स्वतःशी कधी तरी...

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
प्रश्न असतात ढीगभर,
उत्तर शोधाया संवाद साधा,
स्वतःशी कधी तरी...

वाटल्यास कधी हरवलोय आपण,
दिशा भरकटली जगण्याची,
मार्ग शोधाया संवाद साधा,
स्वतःशी कधी तरी...

जेंव्हा अस्तित्वाचा प्रश्न,
उभा राहील तुमच्यापुढे,
स्वतःला शोधाया संवाद साधा,
स्वतःशी कधी तरी...

------ विभव जोगळेकर

Friday, May 8, 2026

आपण थंडच राहायचं..... (child version)

परीक्षेचा निकाल लागला 
आई-बाबांचा थोडा ओरडा खाल्ला 
ते कितीही ओरडले 
तरी आपण शांत राहायचं 
आपण थंडच राहायचं ....||१||

हातातली मॅच गेल्यामुळे 
कॅप्टनचा ओरडा खाल्ला 
त्याच्या अशा बोलण्यामुळे 
माझा धीर खचला 
तो कितीही बोंबलला 
तरी आपण शांत राहायचं 
आपण थंडच राहायचं .... ||२||

एक गणित चुकल्यामुळे 
ताई मला ओरडल्या 
पुन्हा असं करू नकोस 
असं त्या म्हणाल्या 
त्या कितीही ओरडल्या 
तरी आपण शांत राहायचं 
आपण थंडच राहायचं.... ||३||

आपली प्रतिकारशक्ती वाढावी 
म्हणून तीच औषध घ्यायची 
एक गोळी रोज रोज 
पाण्यात घालून प्यायची 
ते कितीही कडू लागलं तरी 
आपण शांत राहायचं 
आपण थंडच राहायचं.... ||४||

कितीही कंटाळा आला तरी 
सूर्यनमस्कार घालायचे 
आई सांगते म्हणून 
नाचणीचे सत्व प्यायचे 
कितीही नको वाटलं तरी 
आपण शांत राहायचं 
आपण थंडच राहायचं...||५||

------- नहुष जोगळेकर

आपण थंडच राहायचं

Monday, May 4, 2026

फूल उमलायच्या आधीच....

कुठे चालला आहे समाज आपला,
कसल्या दलदलीत जगतोय आपण,
जिथे चिमुरडीवरच्या अत्याचाराचं,
केलं जात आहे राजकारण....

एवढासा जीव, बालपण निरागस होतं,
स्वप्नांच्या पंखांना, अजून उडायचं होतं,
आई - वडिलांच्या कुशीत इवलसं,
सुरक्षित तिचं आयुष्यं सुरू होतं...

एका नराधमाच्या काळया सावलीनं,
फूल उमलायच्या आधीच चिरडलं,
वासनाधुंद नराधमाच्या  क्रौर्याने आज,
जणू माणुसकीलाच विटाळलं...

रडतंय आभाळ आज, थरथरतंय मन,
या धर्तीवर मात्र वेगळंच सुरू आहे रण,
त्या नराधमाची, त्या चिमुरडीची जात,
आणि त्यावरून सुरू आहे इथे रणकंदन...

कोण कोणाचा, कुठल्या जातीचा,
यातच अडकून पडलोय आपण सारे,
एक निरागस जीव हरपला तरी ही,
वादाच्या ज्वाळेत जळतंय न्यायचं द्वार हे...

का नाही उभे रहात आपण, 
त्या राक्षसाला शिक्षा व्हावी म्हणून?
का अजून एकत्र नाही येत आपण,
चिमुकल्यांच जग सुरक्षित व्हावं म्हणून?

ना फक्त शोक, ना फक्त शब्द,
कृतीतून दाखवू संताप आपला,
चिमुरड्यांसाठी, त्यांच्या स्वप्नांसाठी,
उभारुया सुरक्षित समाज आपला...

एक वचन घेऊ आपण सारे,
ना जातीची ना धर्माची होईल भिंत,
जेंव्हा प्रश्न येईल आपल्या मुलांच्या सुरक्षेचा,
तेंव्हा एकच ओळख, आपण भारतीय इतकंच निश्चित....🙏🙏


------ विभव जोगळेकर

Thursday, April 30, 2026

साज शृंगार

केला नाही साज शृंगार, 
नाही भरजरी वस्त्र नेसले,
लेवून साधी ही साडी,
राया तुम्हा भेटाया आले...

नाही माळला गजरा केसांत,
नाही नेत्री काजळ रेखीले,
लाजेच्या गुलाबी छटांनी,
हे गाल गुलाबी रंगले,

नाही दागिने अंगावरती,
नाही मोत्यांचे हार ल्याले,
तुमच्याच प्रेमाच्या नजरेने,
सारे रूप खुलून आले,

नाही शब्द कुठले ओठी,
नयनांनीच गीत गायिले,
हळुवार त्या कटाक्षी,
मन माझे हरपून गेले,

साज कशाला वेगळा आता,
तुमचेच प्रेम ल्याले,
लेवून साधी ही साडी,
राया तुम्हा भेटाया आले...

नजरेसमोर तू येतांच,
सारे शब्द हरवून गेले,
तुझ्या लाजाऱ्या हास्यामध्ये,
मन माझे गुंतून गेले,

साज कशाला तुज वेगळा,
देवाने ऐसे रूप घडविले,
तू असेच यावे समोरी,
अन् मी तुझ्यात हरवून जावे...

------- विभव जोगळेकर

पाठीवरची ओझी

पाठीवरती अनेक ओझी, कशी सारी पेलायची,
स्वप्न पाही मन वाऱ्यावेगी, कशी सारी झेपायची...

गरजेच्या बघ चारच गोष्टी, मन चिंती बारा,
नको नको त्या गोष्टींचा मग, वाढे ऐसा पसारा,
तुला न कळते कुठे थांबावे, नुसताच धावतो पोरा,
जगायचे मग राहून जाते,  दमून जातोस पुरा,
उणी पुरी चार दिवसांची, जिंदगी कशी पुरायची,
स्वप्न पाही मन वाऱ्यावेगी, कशी सारी झेपायची...

क्षण हे परत ना यायचे, नको असेच जाऊ देऊ,
उद्याची स्वप्न बघता बघता, जगणं नको विसरून जाऊ,
वेग मनाचा वाऱ्यापरी तुज नाही पेलायचे,
या शर्यतीत तू उगाच नको थकून ऐसा जाऊ,
थांब थोडा, श्वास घे, थोडी गरज विश्रांतीची,
स्वप्न पाही मन वाऱ्यावेगी, कशी सारी झेपायची...

----- विभव जोगळेकर

Monday, April 20, 2026

अतीत के पन्ने

 कुछ दोस्त बिछडे थे बचपन में मेरे,
कुछ बातें कही सुनी थी आंगन में मेरे,
जाने क्यूँ यें बाते दे रही जिंदगीभर का साथ,
बनके जंजीर थामा है जिंदगीभर मेरा हाथ..

कभी खिलौना ना मिला तो तुटा ये दिल,
कभी अपने चिल्लाये तो मुरझा ये फुल,
जब बनाया मजाक भरी महाफील में,
सर झुका रहा अपनेही खामोशी में,
जाने क्यूँ यें बाते दे रही जिंदगीभर का साथ,
बनके जंजीर थामा है जिंदगीभर मेरा हाथ... 

असफलता पर जब खूब ताने सुने,
बोल पडे सब जो माने थे अपने,
कुछ नया कर सकू ये साहस ना रहा,
मन की बातें कहू कोई ऐसा ना रहा,
जाने क्यूँ यें बाते दे रही जिंदगीभर का साथ,
बनके जंजीर थामा है जिंदगीभर मेरा हाथ...

वो बचपन की यादें वो खामोश लम्हे,
रुह कापती जब पलटता हुं वो अतित के पन्हे,
गुजरा वो जमाना जब अंधेरा था प्यारा,
फिर भी डरता हुं देखने नये सपने,
जाने क्यूँ यें बाते दे रही जिंदगीभर का साथ,
बनके जंजीर थामा है जिंदगीभर मेरा हाथ...

----- विभव जोगळेकर

Sunday, April 12, 2026

युगत

एक युगत सांगतो, ध्यानात ठेवाचं,
मनातील समदं,‌ओठी येऊ नाही द्याचं...

ह्याचं बी ऐकाचं अन् त्याचं बी ऐकाचं,
जे जे कोणी सांगेल ते समदं ऐकाचं,
जे करायचं मनी पक्क करायचं,
मनातील समदं,‌ओठी येऊ नाही द्याचं...

बीगी बीगी उठू, कामाला लागाचं,
मनातील चित्राचं असं तुकडं तुकडं पाडाचं,
मग एक एक तुकडं कमाया लागाचं,
मनातील समदं,‌ओठी येऊ नाही द्याचं..

(समोरच्याचा)चेहरा हसतो मनी काही बी शिजतं,
एका शब्दाने तुझ्या, मन दुसऱ्याचं कुजतं,
तू सांगाया जातो, स्वप्न आपली म्हणून,
नुसतं ऐकून बी तुझं, त्याचं काळीज जळतं,
पूर्ण तापायच्या आधी दूध असं ते नासतं,
म्हणून मनातील समदं,‌ओठी येऊ नाही द्याचं...

------ विभव जोगळेकर

Thursday, April 2, 2026

प्रार्थना

जन्मोजन्मीचे वाहून ओझे, थकलो आता "आई" गं,
आवराया हा सारा पसारा, मार्ग आता तू दावी गं...

संचित बहू कर्माचे हे, नित्य भर त्यात पडते गं,
पाप - पुण्याचे गणित मांडता, हिशोब सारा चुकतो गं,
नको आता जन्म मरण आणि नको कर्माचा हिशोब गं,
आवराया हा सारा पसारा, मार्ग आता तू दावी गं.....

भोग भोगणे चुकत नाही, सुख असो वा दुःख गं,
मन रमते मग या चक्रात,  विसर तुझा पडतो गं 
स्थिर होऊ दे चित्त निवृत्ती, प्रवृत्ती मन नको गं,
आवराया हा सारा पसारा, मार्ग आता तू दावी गं...

"नित्यानंदी निमग्न मजला, सदैव राहू दे,
नित्य समागम तुमचा स्वामी, आम्हा लाभू दे"
वडिलांनी प्रार्थिले तव चरणी, तैसेचि होऊ दे गं,
आवराया हा सारा पसारा, मार्ग आता तू दावी गं...


---- विभव जोगळेकर

Tuesday, March 31, 2026

वो पहला प्यार

मेरे जिंदगी में उसका आना,
एक हसीन इत्तेफाक था,
उस इत्तेफाक में दिल दे बैठा,
ये दिल भी कितना नादान था...

रोज होता दिदार उसका,
रोज की मुलाकात थी, 
रोज वही राहे, वही सफर,
और घंटो चलती बातें थी ...

वो हँसती थी खुलकर जैसे,
बादल बरसते सावन में,
मैं चुप रहता, उसे ताकता,
खोया सा अपने आप में ...  

ना बोल पाया बात मन की,
ना उसके एहसास जान सका,
बस दोस्ती निभाई मैंने,
उसके आगे ना बढ़ सका...

एक मोड आया जिंदगी में ,
राहे हमारी अलग हुई,
कुछ कहना चाहती थी वो शायद,
पर फिर मुस्कुराकर रह गयी ... 

कुछ कहानीया पुरी ना होती,
बस यादों में रह जाती हैं ,
पहले प्यार की वो हलकी खुशबू,
उम्र भर साथ निभाती हैं ...

----विभव जोगळेकर

Friday, March 27, 2026

कवितेच्या विश्वामधुनी...

वेळी - अवेळी काही सुचून जाते,
जसे अंधारातून कुणी खुणावते,
कधी एकच शब्द कधी एक वाक्य,
पूर्ण कवितेची नांदी गाऊन जाते...

इथून पुढचा प्रवास कवितेचा,
जसा खेळ ऊन  - सावलीचा,
मी बसतो लिहाया सुचले म्हणुनी,
ती  रुसून जाते घाई बघुनी...

शब्दांचा पसारा दिसतो मजला,
परी एक ना हाती येते काही,
जणू स्वार शब्दांच्या हिंदोळ्यावर,
किनाऱ्यावर परी दूर अजुनी ....

मी थकून जातो हरून जातो, 
शेवटी तिला मी शरण जातो,
"मी " लिहीत नाही, माध्यम आहे,
मनापासूनी  कबुल करतो ...

बागडत येते मग कविता,
शब्दांचा छान साज लेवुनी,
झरझर चाले कागदावर मग,
हातातली माझी लेखणी...

------ विभव जोगळेकर

Tuesday, March 24, 2026

आई


तिला पाहिले मी फुले वेचिताना,
बागेतल्या फुलांमध्ये रमताना,
तिला पाहिले मी घर आवरताना,
प्रसंगी तेच घर सावरताना,
तिला पाहिले मी शाळेत शिकवताना,
सरस्वतीचे रूप पिढी घडवताना,
तिला पाहिले मी कष्ट करताना,
महालक्ष्मीचे रूप घर चालवताना,
तिला पाहिले ना कधी खचताना,
आई भवानीचे रूप संकटे संहारताना,
जिला पाहिले ना कधी रडताना,
मुलीच्या पाठवणीनंतर पाहिले कोसळताना,
तिला पाहिले ना कधी थकताना,
पहिले सदैव घरासाठी झीजताना,
पहिला तिच्या डोळ्यात असा आनंद,
नातवंडांसंगे हरवलेले बालपण जगताना,
तिला पाहिले रूपे अनेक जगताना,
खर्चिले आयुष्य सारे मुलांना घडवताना,
अन् जिला पाहिले ना कधीच थकताना,
पहावे लागले तिला निपचिप झोपताना...कायमचे झोपताना...

----- विभव जोगळेकर

Saturday, March 21, 2026

चंद्र आणि कविता...

एक प्रार्थना सर्व कवींना, नका मला हो छळू आता,
पकडा त्या Mars - Venus ला, करा त्यांच्यावर कविता...

माती दगड धोंडे आहेत त्यांच्याकडे माझ्याप्रमाणे,
माझ्याकडे हरणांची जोडी त्यांच्याकडे असतील विमाने,
रंग माझा साधा पांढरा, तो ही सूर्यनारायणा कृपेने,
Mars आहे लालबुंद तर Venus चमके मोत्या प्रमाणे,
म्हणुनी प्रार्थितो तुम्हा कवींना नवीन काही लिहा आता,
पकडा त्या Mars - Venus ला, करा त्यांच्यावर कविता...

कधी माझी उपमा देऊन, प्रेमाची गोष्ट रंगवता,
कधी विरहात माझ्याकडे बघून, अश्रू हळूच ढाळता,
रोव्हर फिरती Mars वरती, Venus भोवती ढग दाट,
तिथेही लिहा कधीतरी, प्रेम, विरह, किंवा लगीन गाठ,
म्हणुनी प्रार्थितो तुम्हा कवींना नवीन काही लिहा आता,
पकडा त्या Mars - Venus ला, करा त्यांच्यावर कविता...

 ------- विभव जोगळेकर

Tuesday, March 17, 2026

आँखें भर आयीं - Her Version

 आज फिर तेरी आहट ने दिल को छुआ यूँ ही,

बरसों बाद तुझसे मुलाक़ात हुई… आँखें भर आयीं।

तुझसे दूर होकर भी तुझमें ही रही हर पल,

तेरा नाम दिल ने जो दोहराया… आँखें भर आयीं।

कितनी रातें तेरी याद में चुपचाप रोई हूँ,

आज तुझे यूँ सामने पाया… आँखें भर आयीं।

तू समझा होगा मैं भूल गयी हूँ सब कुछ,

पर तेरी एक झलक ने बताया… आँखें भर आयीं।

जुदाई मैंने भी हर रोज़ जी है ख़ामोशी से,

आज वही दर्द फिर मुस्कुराया… आँखें भर आयीं।

न शिकवा किया तुझसे, न कोई सवाल रखा,

बस दिल ने तेरा नाम सजाया… आँखें भर आयीं।

तू कुछ न बोला, मैं भी खामोश ही रही,

मगर हर लफ़्ज़ दिल ने सुनाया… आँखें भर आयीं।

जब तू मुड़ के चला गया, मैं भी वहीं ठहर गयी,

अपने ही दिल को समझाया… आँखें भर आयीं।

------ विभव जोगळेकर

आँखें भर आयीं - His Version

 आज फिर दिल को तेरी याद ने छुआ यूँ ही,

बरसों बाद तुझसे मुलाक़ात हुई… आँखें भर आयीं।

तन्हाइयों में जो अश्क़ थे, चुपके से बहते रहे,

तेरा नाम लबों पे आया… आँखें भर आयीं।

कितनी ही रातें तेरी याद में जागते गुज़रीं,

आज तुझे देखा… आँखें भर आयीं।

जुदाई के उस मोड़ पे वक़्त ठहर-सा गया था,

आज वही लम्हा फिर लौटा… आँखें भर आयीं।

कदम बढ़े भी तो दिल ने इजाज़त न दी कभी,

तेरी गली का ख़याल आया… आँखें भर आयीं।

न शिकवा रहा कोई, न कोई गिला बाकी,

बस तेरा ख़ामोश सा चेहरा… आँखें भर आयीं।

कुछ भी न कहा हमने, न तुमने कुछ जताया,

एक नज़र ही काफ़ी थी… आँखें भर आयीं।

आख़िर में जब मुड़ के देखा, तू दूर जा रही थी,

दिल ने चुपके से कहा “अलविदा”… आँखें भर आयीं।

----- विभव जोगळेकर

Monday, March 16, 2026

मैत्रीतून प्रीत ही फुलली

हळुवार दोन जीवांची,
मैत्रीतून प्रीत ही फुलली...

रोजचेच भेटणे होते,
बोलणे ही रोजचेच,
बोलण्यात हरवून जाती,
दोघेही तासंतास,
हळू हळू स्थिरावल्या नजरा,
शांतता बोलू लागली, 
हळुवार दोन जीवांची,
मैत्रीतून प्रीत ही फुलली...

कधी निरोप आई - बाबांचा,
कधी बहाणा अभ्यासाचा,
कधी ना मिळता बहाणा काही,
जड भासे क्षण-क्षण विरहाचा,
मैत्रीतही लपून भेटण्याची,
आता सवय अशी ही जडली,
हळुवार दोन जीवांची,
मैत्रीतून प्रीत ही फुलली...

ही जवळीक दोन जीवांची,
हे नाते दोघांमधले,
आता ना राहिले काही,
गुपित दोघांमधले,
मैत्रीच्या सावलीमध्ये,
प्रेमाची कळी ही खुलली,
हळुवार दोन जीवांची,
मैत्रीतून प्रीत ही फुलली....

------ विभव जोगळेकर

Friday, March 13, 2026

सावधान...दुचाकी वळत आहे!!

दुचाकीवर स्वार, आली समोरून नार,

तिचा पाहुनी अवतार, मी घाबरलो फार....

संकेत डाव्या वळणाचे, नजर उजवीकडे तिची,

आली वेळ माझ्यावर, सावध गाडी चालवण्याची...

मी वाजविला हॉर्न, तिचं लक्ष वेधायला,

तिला ठाव नाही कशाचा, हेडफोन तिच्या डोक्याला...

माझी भीती खरी ठरली, दुचाकी उजवीकडे वळली,

मी जोरात ओरडलो तशी, ती गोंधळून मध्येच थांबली...

डोळे मिचकावीत म्हणाली, "सॉरी हा, लक्ष नव्हतं",  

अन् भुर्रकन निघून गेली, जसं काहीच झालं नव्हतं...

---- विभव जोगळेकर

Wednesday, March 11, 2026

मन गुंतते विषयी

मन धावते विषयी गुंतते विषयी
तव चरणावीण मन गुंते सर्वाठायी...

क्षणैक आयुष्य क्षणभंगूर ते सुख,
सुख नांदता घरात दारी उभे दुःख,
कळते हे सर्व परी वळतच नाही,
मन धावते विषयी गुंतते विषयी...

मनी येताच विचार तैसे कर्म घडणार,
कर्माचे फळ मग भोगावे लागणार,
तव नामावीण मनास या लगाम नाही,
मन धावते विषयी गुंतते विषयी...

सर्व दुःखाचे मूळ मनातील विचार,
जेथे मनावर ताबा तेच सुखाचे आगर,
मन साधने गुंतावे यापरी सोपा उपाय नाही,
मन धावते विषयी गुंतते विषयी...

मनाचे हे गुण रामदास वर्णियेले,
दासबोध नि श्लोक मनाचे रचीयेले,
परी आम्हा अभ्यासाची बुद्धी होत नाही,
मन धावते विषयी गुंतते विषयी...

---- विभव जोगळेकर

Thursday, February 19, 2026

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला,
खेळ लाटांचा मंदावला,
का अशावेळी खुणावते,
अनामिक ओढ ही मनाला...

ओढ अशी ही लागते,
मन बेचैन असे हे होते,
जसे ओळखीचे कोणी,
आर्त साद ही घालते....

साद कळेना कुणाची,
मावळत्या सूर्याची,
का सर्वत्र पसरलेल्या,
गूढ संधी प्रकाशाची...

संधिप्रकाश छेडतो,
मनातली अशी ही तार,
संथ लाटांसंगे शांत,
होती मनीचे विचार...

मी माझा न राहतो,
जातो शरण सागरा,
जड मनाने निघतो,
देऊन निरोप भास्करा...देऊन निरोप भास्करा....

----- विभव जोगळेकर

Wednesday, February 18, 2026

सूर्यास्त

सूर्य अस्ताला निघाला,
खेळ लाटांचा मंदावला,
का अशावेळी खुणावते,
अनामिक ओढ ही मनाला...

ओढ अशी ही लागते,
मन बेचैन असे हे होते,
जसे ओळखीचे कोणी,
आर्त साद ही घालते....

साद कळेना कुणाची,
मावळत्या सूर्याची,
का सर्वत्र पसरलेल्या,
गूढ संधी प्रकाशाची...

संधिप्रकाश छेडतो,
मनातली अशी ही तार,
आणि गोंधळ घालतो,
मनी 'कोहम' चा विचार...

' कोहम '  प्रश्नाचे, 
मी पुसतो उत्तर,
' सोहम सोहम ',
साद घालितो समुद्र...साद घालितो समुद्र...


----- विभव जोगळेकर

Sunday, February 1, 2026

रायाची अंतुरी

 का ग अशी झालीस तू,
कावरी ग बावरी,
प्रीत माझी तुझ्यावरी, 
या रायाची तू अंतुरी ||

कधी अवस कधी पौर्णिमा, 
परी साथ कधी सोडेना,
धरतीच्या सोबतीला, 
सदा नभी चंद्रमा,
त्याच परी तुझ्या  संगे 
राहीन मी सुंदरी...
प्रीत माझी तुझ्यावरी, 
या रायाची तू अंतुरी ||१||

तूच माझ्या मनामध्ये, 
तूच ग श्वासा मंदी,
तुझ्याविना गुंतणार,
कुठे ही ना, हा गाडी,
येऊ दे ग हसू आता, 
गुलाबी ओठांवरी...
प्रीत माझी तुझ्यावरी,
या रायाची तू अंतुरी ||२||

नको नजर चुकवू,
नको खेळू तुझ्या बटांशी,
काय तुझ्या मनात आता,
कळू दे या वेड्यासी,
नकार वा होकार जरी,
तूच माझी अंतुरी....
प्रीत माझी तुझ्यावरी,
या रायाची तू अंतुरी ||३||

दिवे लागणीला सख्या,
वाट तुझीच पाहते,
स्वप्न एकच पाहते मी,
तुझ्या घरी नांदते,
व्यापिले आयुष्य तूच,
आता सहावेना ही दुरी,
प्रीत माझी तुझ्यावरी,
या रायाची मी अंतुरी ||४||

---- विभव जोगळेकर

Friday, January 30, 2026

नैहर छुटो जाय...

 प्राजक्ताचा सडा बघ, पडला आज अंगणी,
पश्चिमेला तुळस ग, बसली वृंदावनी,
बाजूलाच जास्वंद, बहरून ती आली,
त्यापलीकडे लगडली, वेलावर गोकर्णी... ||१||

अशा फुलांच्या मधोमध, पसरले अंगण,
अंगणात मांडले ग, झावळांचे तोरण,
पाखडलेल्या तांदळाचा, पसारा ग अंगणी,
वेचाया जमली चिऊ-खारू, जमले ग सारेजण...||२||

समोरच्या झाडीतून,  किरणे डोकावती,
भारद्वाजाची साद मग, मनास खुणावती,
तेवढ्यात गोठ्यातून, गंगा ही हांबरती,
पिल्लास तिच्या दूध पाजाया, साद ती घालती...||३||

परसात विहिरीवर, आई रहाट ओढती,
अन् आजी माझी चुलीवर, भाकरी ग भाजती,
बाबा लागले तयारीला, शेतावर लावणी,
मी आणि मोती आमचा, दोघे त्यांचे सोबती...||४||

वैभव हे सारे इथे, कसे सोडून मी जाऊ,
सांग सख्या तुझ्या सांगे, कशी शहराला येऊ,
जन्म माझा मातीतला, जीव गुंतला ह्या अंगणी,
पश्चिमेला जिथे आहे, तुळस वृंदावनी... ||५||

---- विभव जोगळेकर

Sunday, January 25, 2026

क्या बताउ तुम्हे

क्या बताउ तुम्हे, किस तरहा से ये,
उलझी उलझी सी है, जिंदगी अब मेरी ||

जब अकेला था मैं, बडा नादान था,
मुस्कुराहट से भरे, थे लम्हे सारे,
जबसें देखा तुम्हे, दिवाना हुवा,
मुस्कुराहट की वजह, अब तुम बन गये...

क्या बताउ तुम्हे, किस तरहा से ये,
उलझी उलझी सी है, जिंदगी अब मेरी ||१||

हर पल अब तुम्हे, सोचता रहता हु,
हर बात अब तुमसे, कहना चाहता हु,
उलझन है ये, अब तुमसे कैसे कहू,
मेरे धडकन की वजह, अब तुम बन गये...

क्या बताउ तुम्हे, किस तरहा से ये,
उलझी उलझी सी है, जिंदगी अब मेरी ||२||

छोटी छोटी बातोमे, खुश रहता था मैं
अपने मस्ती में जिंदगी, जी रहा था मैं,
उलझन है ये, तुमसे कैसे कहू,
मेरे खुशी की वजह, अब तुम बन गये....

क्या बताउ तुम्हे, किस तरहा से ये,
उलझी उलझी सी है, जिंदगी अब मेरी ||३||

------ विभव जोगळेकर

Tuesday, January 20, 2026

आई - बाबा

 


आम्ही झालोय अनाथ, ना उरली आई - बाबांची साथ,
आता सहावेना, ऐसे नियतीचे हे आघात ||

गाडा संसाराचा ओढून, चिंता भविष्याची करून,
थकली ग माझी माय, गेली झिजून झिजून,
शरीर थकले, उभे आयुष्य कष्टात जगून,
परी मन ना थकले, चिंता लेकरांची करून,
शेवटी थांबले ते श्वास, काही राहिले ना शेष,
गेली  समर्थपणे देऊन, बाबांची ४७ वर्षांची साथ || १||

बाबांविषयी काय लिहू, मला शब्दचीं सूचेना,
त्यांच्या बद्दलच्या भावना, शब्दात मांडता येईना,
बाबा शीतल छाया  झाले, जेव्हा आयुष्य तापून उठले,
बाबा मजबूत ढाल  झाले, जेव्हा संकट समोर ठाकले,
राग खोट्याचा फार त्यांना, व्रत सत्याचे घेतलेले,
संस्कार मुलांवर करताना, हात कधीच ना उठले ||२||

शिक्षण नोकरी परी घर, लहानपणीच सोडले,
परी शेवटच्या श्वासापर्यंत, हेदवीचे होऊन राहिले,
चांगुलपणा नी प्रामाणिकपणाचे, बाळकडू त्यांनीच पाजले,
आईची संसारात साथ करताना, प्रेम काय ते दाविले,
संसार करताना, अध्यात्माची, कास कधी सोडली नाही,
सद्गुरू सेवेच त्यांनी, व्रत कधी मोडलं नाही || ३ ||
 
सुटली साथ आईची, एकाकी पडले ते फार,
कितीही म्हटलं तरी, त्या दोघांचा होता तो संसार,
मुलांच्या मायेपोटी, थांबले ते एक संवत्सर,
अन् निरोपाची वेळ येता, त्यागले त्यांनी हे शरीर,
नुसतेच बाबा गेले नाही, गेले माझे मित्र, माझे सल्लागार,
आम्हा करून पोरके, गेले उरकून त्यांचा संसार,
काही पुण्य होते केले,म्हणुनी ऐसे मायबाप ते मिळाले,
जन्मोजन्मी यावे ह्यांच्याच पोटी, ऐसे त्या विधात्या प्रार्थीले,
आम्ही झालोय अनाथ, ना उरली आई - बाबांची साथ,
आता सहावेना, ऐसे नियतीचे हे आघात ||४||

---- विभव जोगळेकर


Sunday, January 18, 2026

अबोली

गुलाब फुलांचा राजा झाला, कमळाला राष्ट्र फुलाचा मान मिळाला,
रात्रीस गंध रातराणीचा दरवळला, गाण्यात मान चाफ्यास मिळाला,
परी एक सखी मज सांगून गेली, तिचे आवडते फुल अबोली,
निशब्द विश्वाच्या साम्राज्याची, साम्राज्ञी ही अबोली...

नाजूक ना काही पारिजाता परी, मोगरा असावा द्वारी एकतरी,
जास्वंदीस मान, लाडकी गणेशाची, आणि सोज्वळता पहावी सोनटक्याची,
परी एक सखी मज सांगून गेली, तिचे आवडते फुल अबोली,
निशब्द विश्वाच्या साम्राज्याची, साम्राज्ञी ही अबोली... ||२||

संध्याछायेत अलगद फुलली, केशरी रंगात न्हाऊन निघाली,
गंध ना परी वेणीत सजली, शांत सौंदर्याची कोवळी अबोली,
एक सखी मज सांगून गेली, तिचे आवडते फुल अबोली,
निशब्द विश्वाच्या साम्राज्याची, साम्राज्ञी ही अबोली... ||३||


------ विभव जोगळेकर 

Monday, January 12, 2026

करम

पल खुशी के जो आये, तो ये तेरे करम है,
गम के बादल जो छाये, तो भी तेरे करम है,
तू जो धरती पे है आया, तो इतना समझ ले,
हिसाब होना है बाकी, कुछ ऐसे तेरे करम है...

------- विभव जोगळेकर 

Wednesday, January 7, 2026

इडली आणि रविवार

गोल गरगरीत, गोरी गोमटी, माझ्या नशिबी ऐसी आली,
Weekend आला, रविवारची, इडली माझ्या पानात वाढली...
सकाळच्या नाश्त्याला, संगे चटणी घेऊन आली,
पहिला घास घेताच, गळ्यात अडकून, पटकन उचकी लागली...
दुपार झाली, रविवारची, जेवणाची आता वेळ झाली,
ह्यावेळी सांबारात बुडून, समोर पुन्हा इडली आली...

संध्याकाळच्या जेवणाची, मनाने मात्र धास्ती घेतली,
आणि पुन्हा तेच, ह्यावेळी, पोडी पांघरून इडली आली...

सोमवार उजाडला, म्हटलं एकदा, इडली पासून सुटका झाली,
इतक्यात आईने, नाश्त्याला, फ्राय केलेली इडली ठेवली....


------ विभव जोगळेकर 

Friday, January 2, 2026

First Meet


 Our parents talked, the dates were fixed,

They smiled and said, "You both can meet"

We sat there, tea growing cold,

Two quiet hearts, a little scared, a little bold.!!


She spoke less, nodded more,

Eyes tracing patterns on the floor.

I tried some jokes, kept my voice light,

Hoping somehow it could feel right.

Between "yes" and "we will see",

Something waited silently!!


It was only our first meeting, thats all,

No big words, no promises to call,

Just two people, careful and slow,

Learning what the hearts should know!!


I asked her, "Shall we go outside?"

The lake was calm, the day was kind,

A small boat and the water moving slow,

Just like us, not ready - but willing though!!


She spoke of home, of simple dreams,

I listened more than I believed.

Her laughter came, shy and true,

And somehow, mine followed too.

The silence did'nt feel so tight,

It felt like things were turning right!!


It was only our first meeting you see,

But felt liek start of something meant to be.

No rush and no need to impress,

Just comfort growing and nothing less!!


When my hand touched hers by chance,

She frozed for a second, then gave a glance,

I held it gently, not too tight,

Like asking a question, not claiming a right!!


A small kiss on her forehead then,

Not love - just respect back then.

She smiled softly, looked away,

And I knew I would remember the day!


It was only our first meeting, so small,

But it changed the meaning of it all.

Not a filmy story, not too grand,

Just a begining....hand in hand.

Arranged by words,chosed by heart,

That's how our story choose to start!!



------ Vibhav Joglekar 



नको कोणाला सांगू...

काय कुठे कधी कसे झाले सांग मला, कोण कोणाला कधी काय बोलले सांग मला, त्या बातमीला तिखट मीठ लावायचे मला, "नको कोणाला सांगू" म्हणत सर्...