Wednesday, June 10, 2026

वृक्ष ऐटीत उभा

एका गावात वृक्ष,
असा उभा ऐटीत,
येता जाता वाटसरू,
बसत त्याच्या छायेत,

त्याच्या अंगाखांद्यावर,
पक्षी  खेळती अनेक
गोड फळे खायला,
येती थवे कित्येक,

काय झाले अचानक,
काहीच कळेना,
त्या झाडाची फळं,
कोणालाच दिसेना,

आले कावळेदादा,
कराया बात खास,
"काय झाले मित्रा,
का दिसतो उदास?",

म्हणे वृक्ष हळुवार,
 "कालच मी ऐकले,
रस्ता करणार रुंद, 
माझे दिवस संपले",

हे ऐकून महंत,
जे बसले त्या छायेत,
दुःख दाटून आले,
 त्यांच्या अंतःकरणात,

म्हणाले गावकऱ्यांना,
"नका  वृक्ष कापू,
आपल्याच हातांनी,
विनाश नका ओढवू",

वृक्ष देती सावली,
वृक्ष देती प्राण,
त्यांच्या विना होईल,
कोरडे सारे रान,

प्रगतीच्या ओढीने,
ऐकले ना कुणी,
असे कित्येक वृक्ष,
तोडून टाकले त्यांनी,

आणि मग खरी ठरली,
त्या महंतांची वाणी,
असा कोपला तो सूर्य, 
रुसून बसले पाणी,

ना उरली पक्ष्यांची गाणी,
ना उरला सुगंध,
वृक्ष तोडून हरवला,
गावाचा तो आनंद,

आजही त्या रस्त्याने,
लोकं जेव्हा जातात,
त्या वृक्षाच्या छायेची,
आठवण काढतात...

---- विभव जोगळेकर

No comments:

Post a Comment

नको कोणाला सांगू...

काय कुठे कधी कसे झाले सांग मला, कोण कोणाला कधी काय बोलले सांग मला, त्या बातमीला तिखट मीठ लावायचे मला, "नको कोणाला सांगू" म्हणत सर्...