शब्दांचे हे विशाल जंगल,
शांत नि घनदाट,
भावनांच्या वाहती नद्या इथे,
शोधून त्यातून वाट...
शांत नि घनदाट,
भावनांच्या वाहती नद्या इथे,
शोधून त्यातून वाट...
कुठे उमलती अर्थफुले,
कुठे सुगंधी भावना,
कुठे दडल्या शांत सावल्या,
कुठे विरहाच्या वेदना...
कुठे आनंद पाखरू होऊन,
फांदीफांदीवर गातो,
कुठे व्यथेचा पानगळ होऊन,
अलगद खाली झरतो...
कवी नसतो शब्दांचा राजा,
ना तो त्यांचा निर्माता,
फक्त भटक्या प्रवाशापरी,
शोधत फिरतो वाटा...
वेचून घेतो शब्द फुले,
भावनांचा दोरा गुंफतो,
कल्पनांच्या कुशल हातानी,
काव्यहार तो विणतो...
या जंगलाचा नाही अंत,
ना संपते कधी वाट,
जितके आत शिरत जावे,
तितकाच वाढतो थाट...
---- विभव जोगळेकर
No comments:
Post a Comment