कुठल्या बरं शाळेत जातात फुलपाखरं सारी?
असते का ग त्यांना पण सुट्टी रविवारी?
गणवेश ह्यांचा रंगीबेरंगी प्रत्येकाचा वेगळा,
फुलाफुलांवर उडत शिकण्याचा आनंदच वेगळा,
कुठल्या बरं शाळेत जाते छोटी मुंगी ताई?
रविवारची पण शाळा घेतात का गं ह्यांच्या बाई,
कडक शिस्त असेल शाळेत रांगेत बघ त्या जातात,
साखर पडता जमिनीवरती कशा लगेच गोळा होतात?
मधमाशीच्या शाळेमध्ये मधच असेल डब्याला,
गुणगुण गाणी शिकवत असतील बाई साऱ्या वर्गाला,
फुलांमधला रस गोळा करण्याचा गृहपाठ असेल भारी,
सुट्टी होताच उडत जातील पोळ्यातल्या घरी,
चिमण्यांच्या शाळेमध्ये शिकवत असतील उडायला,
काडी काडी जमवून मग सुंदर घरटे बांधायला,
चिवचिव गप्पा रंगत असतील मधल्या सुट्टीमध्ये,
पंख पसरून उडत असतील निळ्याशार आभाळामध्ये,
निसर्गाच्या ह्या शाळेत प्रवेश मिळेल का गं मला,
पहिल्या बाकावरती बसायला देतील का ते मला,
रविवारी पण जाईन मग मी शाळेत शिकायला,
फुलपाखरासांगे मिळेल मला भरपूर खेळायला...
----- विभव जोगळेकर
No comments:
Post a Comment