Tuesday, June 30, 2026

कॉफी आणि बरंच काही...

बऱ्याच वर्षांनी, परवा भेटली, रस्त्यावरून जाताना,
वेळ कसा गेला कळलाच नाही, गप्पा तिच्याशी मारताना,
आठवलं तिला कॉफी आवडायची, म्हणून विचारलं तिला कॉफीला,
आणि विषय मिळाला लोकांना, आमची लव्हस्टोरी चघळायला...

कॉलेज मध्ये होती जशी, तशीच अजूनही वाटली,
हसतमुख, मनमोकळी, गप्पांमध्ये हरवणारी,
ना कुठला आव, ना दिखावा, स्वभाव तिचा तसाच राहिला,
वर्षे सरली किती तरी, मैत्रीचा धागा तसाच विणलेला,
मैत्रीच्या ह्या धाग्याने, गप्पांचा डाव रंगला,
आणि विषय मिळाला लोकांना, आमची लव्हस्टोरी चघळायला...

कॉफीचे दोन कप होते, गप्पा होत्या जुन्या आठवणींच्या,
बाहेरून पहाणाऱ्यांनी मात्र, कथा लिहिल्या प्रेमाच्या,
कोणी म्हणे "जूने प्रेमी भेटले..", कुणी तर आमचे लग्नच ठरवले,
कॉफी संपण्या आधीच लोकांच्या, चर्चेस एकदम उधाण आले,
लोकांच्या ह्या चर्चेपासून दूर, आठवणींचा इथे पसारा मांडला,
आणि विषय मिळाला लोकांना, आमची लव्हस्टोरी चघळायला....

घरी पोचताच दारातच, मिश्किलपणे ताई म्हणाली,
"आई बघ तुझ्या लेकाने, माझ्यासाठी वाहिनी शोधली"
" मला आधीच संशय होता..", आईने आतून सूर आळवला,
बाबांनी तर मुहूर्तासाठी, गुरुजींनाच फोन लावला,
मी म्हटलं अहो कॉफी प्यालो, गप्पांमध्ये थोडा वेळ गेला,
आणि विषय मिळाला लोकांना, आमची लव्हस्टोरी चघळायला...

कॉफीचं बिल होतं दोनशे, चर्चा झाली लाखांची,
दोन मित्र भेटले एवढंच, पण प्रेमकथा झाली गावाची,
कॉफी संपली, निरोप घेतला, पुन्हा कधी असंच भेटायला,
आणि विषय मिळाला लोकांना, आमची लव्हस्टोरी चघळायला....

--- विभव जोगळेकर

No comments:

Post a Comment

नको कोणाला सांगू...

काय कुठे कधी कसे झाले सांग मला, कोण कोणाला कधी काय बोलले सांग मला, त्या बातमीला तिखट मीठ लावायचे मला, "नको कोणाला सांगू" म्हणत सर्...