ज्या जाहिरातींवरून ह्या कवितेचा विचार सुरु झाला ...👆
रस्त्यावरती लाल सिग्नल तरी पुढे जाणं,
नियम मोडणयातच शहाणपण मानणं,
कोणी ना घाली हेल्मेट इथे, कोणी ना पाळतो नियम,
पदपथावरती चालवणारे, साक्षात भासतात यम,
पोलिस जिथे करतात दुर्लक्ष, तिथे आपणही तेच करायचं,
आपण थंडच राहायचं... ।।१।।
लहान मुलं खेळताना, सहज शिव्या देतात,
मोठ्यांच तर विचारूच नका, आई - बहिण काढतात,
छत्रपतींच्या भूमीत आई - बहिणीवरून शिव्या फॅशन झाली आहे,
मुलं आपली अनुकरण करतात याचं भान हरपलं आहे,
त्यांच्या आई वडिलांना चालतं, आपण कशाला बोलायचं,
आपण थंडच राहायचं... ।।२।।
स्त्रिया मुलींवरील अत्याचार रोजचीच बातमी झाली,
पेपर उघडला की वेदना, पण संवेदना मात्र हरवली,
कायद्याच्या पळवाटा आता सर्वांना ठाऊक आहेत,
ज्याचं जळतं त्यांना कळतं, बाकीचे निवांत आहेत,
बातमी वाचून मान हलवायची, पुढे सरकायचं,
आपण थंडच राहायचं... ।।३।।
पण जरा विचार करा, हे कुठवर चालेल,
काय कराल जेव्हा उद्या ही ज्वाला आपल्यालाच पेटवेल,
नियम पाळा, सावध व्हा, अत्याचाराविरुद्ध आवाज उठवा,
एकमेकात लढण्यापेक्षा, एकसंध समाज व्हा,
आता एकत्र उभं रहायचं, थोडं मनावर घ्यायचं,
आपण आता थंड नाही रहायचं... ।।४।।
-------- विभव जोगळेकर

No comments:
Post a Comment