Friday, March 27, 2026

कवितेच्या विश्वामधुनी...

वेळी - अवेळी काही सुचून जाते,
जसे अंधारातून कुणी खुणावते,
कधी एकच शब्द कधी एक वाक्य,
पूर्ण कवितेची नांदी गाऊन जाते...

इथून पुढचा प्रवास कवितेचा,
जसा खेळ ऊन  - सावलीचा,
मी बसतो लिहाया सुचले म्हणुनी,
ती  रुसून जाते घाई बघुनी...

शब्दांचा पसारा दिसतो मजला,
परी एक ना हाती येते काही,
जणू स्वार शब्दांच्या हिंदोळ्यावर,
किनाऱ्यावर परी दूर अजुनी ....

मी थकून जातो हरून जातो, 
शेवटी तिला मी शरण जातो,
"मी " लिहीत नाही, माध्यम आहे,
मनापासूनी  कबुल करतो ...

बागडत येते मग कविता,
शब्दांचा छान साज लेवुनी,
झरझर चाले कागदावर मग,
हातातली माझी लेखणी...

------ विभव जोगळेकर

No comments:

Post a Comment

नको कोणाला सांगू...

काय कुठे कधी कसे झाले सांग मला, कोण कोणाला कधी काय बोलले सांग मला, त्या बातमीला तिखट मीठ लावायचे मला, "नको कोणाला सांगू" म्हणत सर्...