Wednesday, June 24, 2026

रंगमंच

 पडदा वर जाण्याआधी सारे कलाकार तयार होते,
एकमेकांवरती विश्वास ठेऊन उभे होते,

नेपथ्य, प्रकाश, संगीत, साऱ्यांचीच साथ लागते,
एका कुणामुळे नाटक थोडेच चालते,
 
थोडा विचार करता, आयुष्याचेही असेच असते,
रोज नवा प्रयोग घेऊन आयुष्य उभे असते,

रोज नवी भूमिका, रोज नवे संवाद असतात,
कधी टाळ्यांचा गजर, कधी प्रसंग अवघड असतात,

कधी मित्र सावरून घेतात, कधी घरचे धीर देतात,
कधी नशिबाच्या प्रकाशात रस्ते अचानक उजळतात,

नाटकात आणि आयुष्यात एक मोठा फरक असतो,
आयुष्याच्या रंगमंचावर प्रेक्षक - कलाकार आपणच असतो,

आपणच शाबासकी द्यायची आपणच चुका स्वीकारायच्या,
आणि पडदा खाली येताच सज्ज व्हायचं प्रयोगास उद्याच्या,

आयुष्याच्या रंगमंचावर प्रयोग कधीच संपत नाही,
पडदा पडतो एक दिवसाचा, कथा मात्र संपत नाही....

--- विभव जोगळेकर

No comments:

Post a Comment

नको कोणाला सांगू...

काय कुठे कधी कसे झाले सांग मला, कोण कोणाला कधी काय बोलले सांग मला, त्या बातमीला तिखट मीठ लावायचे मला, "नको कोणाला सांगू" म्हणत सर्...