आज सकाळी पावसाने विश्रांती घेतली आणि आम्ही दोघे Morning Walk ला बाहेर पडलो. हो, हल्ली आम्ही जोडीने वॉकला जातो. म्हटलं एकट्याने चालून काही वजन कमी होत नाही, जोडीने जाऊन बघू.!!
जोडीने जायला लागल्यापासून एक गोष्ट लक्षात आली. आपण पुरुष मंडळी जेवढं DARING नही करत तेव्हढ ह्या बायका STARING करत असतात. मला वाटायचं अचानक एव्हढ्या बायका मला का observe करायला लागल्या, मग लक्षात आलं, मला नाही आमच्या जोडीदाराचं निरीक्षण सुरू असतं. मला एक गोष्ट नक्की कळली आहे, बायकांच्या डोळ्यात देवाने जो काही scanner बसवला आहे ना, science ने कितीही प्रगती केली तरी We can't beat it! अवघ्या एक सेकंदात त्या समोरच्या व्यक्तीला नखशिखांत स्कॅन करतात. अगदी पाच सहा महिन्यानंतर विषय निघाला तरी त्या सांगतील त्या दिवशी morning walk चे details. अगदी डोक्यावरच्या हेअर पिन पासून पायात कोणते shoes होते इथपर्यंत. तसा त्यांचा हेतू फार प्रामाणिक असतो हे scanning करताना. "काय तो टॉप घातलाय त्या बाईंने .... " अस म्हणून पुढील १-२ आठवड्यात तोच टॉप तुम्हाला तुमच्या बायकोच्या wardrobe मध्ये दिसतो!!
तर गंमत अशी की मला पण एक वाईट सवय आहे, बाहेर पडलो की मी पण समोर येणाऱ्या व्यक्तीचं निरीक्षण करत असतो आणि आमच्या बायकोच्या भाषेत त्यांची ' मापं ' काढत असतो, उगाच काहीतरी time pass . असो, तर आजचा किस्सा थोडा वेगळाच. आम्ही निघालो morning walk ला आणि थोड्या वेळाने एक व्यक्ती चालत आमच्या पुढे गेली. साधारण पन्नास च्या आसपास वय असावं. चेहऱ्यावर अखिल विश्वाची चिंता, पाठीवर टांगलेली छोटी सॅक आणि खिशात मोबाईल. त्या मोबाईल वर मोठ्या आवाजात गाणं सुरू होतं..." ये अपना दिल तो आवारा..." त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव, त्याची देहबोली आणि त्या गाण्याचा मूड, ह्याचा काडीमात्र ही संबंध नव्हता. तसही लोकांना अशा एकापेक्षा एक विचित्र सवयी असतात morning walk करताना - एक जण मोबाईल वर रामरक्षा लावून चालायचे, तर दुसरे एक जण हनुमान चालीसा आणि त्या बाजूने कोणी तरी रफी साहेबांचं गाणं ऐकत जाणार. आम्ही नक्की ऐकायचं काय आणि कशाला?. नाही, ऐकायला माझी ना नाही, चालण्याला ज्याने प्रोत्साहन मिळेल असं तुम्ही काहीही एका, पण अख्या जगाला कशाला ऐकवता? एखादा हेडफोन लावा कानात आणि काय हवं ते ऐकावं. ह्या हेडफोन वाल्यांची पण वेगळी गंमत असते. त्यांना आपण कुठून चाललोय, आपल्या मागून गाड्या ये-जा करत आहेत ह्याच भानच नसतं. कधी फूटपाथ वर, तर कधी रस्त्याच्या मधून हे लोकं Morning Walk करत असतात, जसं की रस्ता हा ह्यांच्या morning walk साठीच बनवला आहे. गाड्यांनी जपून, वाट मिळेल तिथून जावं आपलं!!
असो, तर मूळ मुद्दा राहिला बाजूला. तर हे साहेब हेमंत कुमार ह्यांचं गाणं ऐकत चालले होते, ते थोडे पुढे गेल्यावर मी हळूच हिला म्हणालो - "ते गाणं आणि ह्यांचे भाव काही संबंध नाही" त्यावर आमच्या सौ - "अरे चालायचंच, काही लोकांसाठी गाणं ही सुद्धा एक प्रकारे थेरपीचं काम करते. त्या बिचाऱ्याच्या आयुष्यात काही problems असतील, त्याला जर का हे गाणं ऐकून आपला भूतकाळ आठवत असेल, जो कदाचित त्याला energy देत असेल आजचं टेन्शन झेलायला, तर चांगलंच आहे. आणि काही लोकांना आवडतं असं भूतकाळात रमून रहायला"
मी - " काही नाही, ह्या लोकांना change नको असतो, जुनं ते सोनं आणि नवीन काही असेल ते भंगार असेच असतं ह्यांचं "
आमची सौ. - "तू कशाला पण एवढा वैतागतो आहेस? आणि त्याला judge का करतो आहेस, you hardly know him."
मी - "मी Judge वगैरे नाही करत, ऐकेना तो काहीही मला काय करायचं आहे? पण जे काही ऐकायचं आहे ते कानात ऐकावं - स्वता:च्या!! जगावर कशाला थोपता तुमचा मूड ?"
सौ. - "तू नको लक्ष देउस , आपण जरा speed वाढवू चालण्याचा आणि पुढे जाऊ त्याच्या.."
पण कुठे काय, तो पण आमच्याच स्पीड ने चालत होता, आता मला हळूहळू त्रास व्हायला लागला होता - गाण्याचा नाही पण त्याने ते मोठ्याने लावण्याचा असावा बहुतेक. माझ्या बाबतीत काय होतं की एखादं ऐकलेलं गाणं काधी कधी संबंध दिवस मी गुणगुणत असतो आणि ते गाणं माझ्या दिवसाचा "tone" ठरवतं ...Music has that power to influence you for the whole day!! तेवढ्यात एक गंमत झाली...
समोरून एक तरुणी, हातावर Apple चे smart watch, कानात boat चे headphone, पायात NIKE चे shoes घालून जॉगिंग करत आमच्या बाजूने निघून गेली आणि योगायोग की काय माहीत नाही, त्या समोरच्या व्यक्तीच्या मोबाईल मधून नवीन गाणं कानावर पडलं .... "दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी" ...
आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं, हसलो आणि पुढील walk "दिल तो बच्चा है जी" म्हणत पूर्ण केला!!
@ विभव जोगळेकर


