Monday, July 11, 2022

पाऊस आणि प्रेम ....

आज सकाळपासूनच पावसाची संततधार आणि हवेतला गारवा  ह्यामुळे वातावरण खूप प्रसन्न होतं. समीर आणि सईचं WhatsApp चॅटिंग सूरू होतं, कॉलेजला कसं जायचं हा विषय!! सईला पावसात छान सायकलने भिजत  जायचं होतं तर समीर बाईक ने जाऊ म्हणून आग्रह करत होता. शेवटी, मैत्रीणीच्या हट्टापुढे, समीरने माघार घेतली आणि दोघांनी सायकल घेऊन जायचं ठरवलं.

 
आपापल्या घरातून निघून दोघेही कर्वे पुतळ्याजवळ सिग्नलला भेटले आणि एका बाजूने निवांत गप्पा मारत जाऊ लागले. पावसाची संततधार आणि सकाळचं ट्रॅफिक ह्यातही ते दोघे आपल्याच तंद्रीत चालले होते. मयूर कॉलनीचा सिग्नल ओलांडून दोघेही पुढच्या करिश्मा चौकातल्या सिग्नल जवळ येत असताना, चौकातला लाल दिवा लागला आणि गाड्या थांबु लागल्या. सवयीप्रमाणे, पुढे जाण्यासाठी  समीरने पटकन सायकल बाजूला घेत, लेन बदलली आणि गाडीच्या पुढे जायचं ठरवलं. पण सईला तिथेच थांबायचं होतं. थोडं  निवांत, पावसात भिजत जायचं होतं. तिला थांबलेलं पाहून समीर ने पटकन सायकल मध्येच थांबवली आणि तो मागे येण्यासाठी सायकलवरून उतरू लागला. मागून येणाऱ्या बाईकवाल्याने जोरात ब्रेक लावत चार शिव्या हासडल्या आणि बाजूने पुढे निघून गेला. ब्रेकचा आवाज ऐकून सिग्नलला थांबलेल्या सगळ्यांचं लक्ष त्या दोघांकडे गेलं.

मागोमाग येणाऱ्यास्कुटीवरच्या  मुलीने गाडी थोडी मागेच थांबवली आणि समीरला मागे येऊ दिलं. समीरने पटकन उतरून सायकल सईच्या बाजूला उभी केली. सईने बाइकवरच्या मुलीकडे बघीतलं , आँखो ही आँखो मे thanks आणि welcome संवाद झाला दोघींमध्ये आणि स्कुटीवाली पुढे निघाली. 

समीरची धडपड बघून सईच्या गालांवर अलगद हसू आले, थोडीशी ओशाळलीच ती; तिच्या खळीवरून ओघळणाऱ्या पावसाच्या थेंबात समीर आकंठ बुडाला होता आणि आजूबाजूला सिग्नलला थांबलेले.......क्षणभर Monday Blues विसरून, पाऊस आणि पावसात उमलणाऱ्या प्रेमाचा  विचार घेऊन कामावर निघाले. 

©विभव 

2 comments:

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...