Monday, June 15, 2020

मी मलाच शोधतो



रात्री किनारी बसुनी, प्रतिबिंब शोधतो,
खोल स्तब्ध पाण्यात, मी मलाच शोधतो.. ।1।
नभी पुनवेचा चंद्र, मनी रात्र अवसेची,
लोचनी वाहती धारा, रूपे आसवांची,
अशा स्थितीत चेहरा, उगा उपरा हसतो,
खोल स्तब्ध पाण्यात, मी मलाच शोधतो...।2।
तू होऊनी माझी, मलाच सोडून गेलीस,
दाऊनी स्वप्ने सुखाची, सारे उधळून गेलीस,
उधळल्या पाकळ्या, मी अलगद वेचितो,
खोल स्तब्ध पाण्यात, मी मलाच शोधतो...।3।
ऐकू धून येते, दूर बासरी विरहाची,
राधेस साद घाली, ही प्रीत श्री हरीची, 
आस मनास वेडी, तुला उगाच आठवितो,

खोल स्तब्ध पाण्यात, मी मलाच शोधतो...।4।  


   ----- विभव जोगळेकर 

Sunday, May 24, 2020

निरोप

तो क्षण निरोपाचा, असा येऊन ठाकला,
परी संवाद डोळ्याचा, अजून ना संपला...



सैल झाली आता मूठ, हात हातातून सुटला,
तो स्पर्श शेवटचा असा मनी साठवला,

तू पाठमोरी झाली, मार्ग तुझा हा वेगळा,
परी संवाद मनाचा, अजून ना संपला...

कंठ दाटून हा आला, मूठ आवळली घट्ट,
हसत निरोप देण्याचा, व्यर्थ केला हट्ट,

तूझें बोलके डोळे आणि निरोप अबोला,
आपुल्या नात्याचा, प्रवास इथेच संपला...

-------विभव जोगळेकर

Sunday, May 17, 2020

रात्र अवसेची


रात्र अवसेची साद घालतोय कोण?
पिंपळाच्या झाडाखाली ज्याच्या अस्तित्वाची खूण।।

मनी विचारांचा खेळ, का कुणी मांडला हा डाव,
चाल कुणाची, प्यादे कोण, इथे कोणास ना ठाव,
नको ओलांडू उंबरा, इथे राज्य काळोखाचे,
जाळे विणून ठेवले कुणी अदृश्य संकटाचे,
कधी चेहरे, कधी आवाज, खूण ओळखीची वाटे,
का आहेत सारे हे, गतकाळाचे मुखवटे,
भूतकाळाचे हे ऐसे, चित्र रेखाटतोय कोण?
पिंपळाच्या झाडाखाली ज्याच्या अस्तित्वाची खूण।।

सावध मनास कैसी पडते भुरळ,
विचित्र ही वाट परी वाटते सरळ,
भीतीच्या राज्यात चाले सावल्यांचा खेळ,
का कुणा अतृप्त आत्म्याची इथे शिजतेय डाळ,
भासे सूडाची ही गोष्ट, का अडकला कुणी निष्पाप,
सतत मनात चाले असाच गोंधळ,
असा सूडाचा हा खेळ, आता खेळतोय कोण?
 पिंपळाच्या झाडाखाली ज्याच्या अस्तित्वाची खूण।। 




   ----- विभव जोगळेकर 

Saturday, April 25, 2020

निर्मला काकू ....

निर्मला काकू .... 

काही लोकं अशी असतात जी नेहमी पडद्यामागे काम करत असतात, त्यांच्याबद्दल जास्त कुणी कधी बोलत नाही पण त्यांच काम अविरत चालू असतं. आशा category मध्ये मोडणारी,  जोगळेकरांच्या घरातली अजून एक सून, जिचा ह्या घराच्या उभारणी मध्यें खारीचा वाटा नक्कीच आहे, निर्मला काकू. आज लॉकडाऊन मुळे  घरी बसून होतो, मुलाला दाखवायला म्हणून जुने अलबम काढले आणि त्यात निर्मला काकूंचा फोटो दिसला. मन लगेच भूतकाळात गेलं. मला कळायला लागल्या पासून मी तिला नेहमी एकाच गेटअप मध्ये बघितलंय, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, पांढरी नऊवारी साडी, हातात चार काचेच्या बांगड्या. बस्स. पहाटे चार वाजता उठून जे कामाला लागायचं ते रात्री 9/10 वाजता सगळे झोपले की झोपायचं, एवढं तीच routine. अविरत काम करत रहाणं, दिलेल्या घरात मान खाली घालून सतत काम करणं एव्हढच तिला ठाऊक. निदान मी तरी तिला असच पाहिलंय. 

घरात नेहमीची ८-१० माणसं असो किंवा सुट्टीत जमलेली घरातली १७-१८ माणसं, सगळ्यांच्या स्वयंपाकाची जबाबदारी ललिता काकूला बरोबर घेऊन ती सांभाळायची. काकुला मी कधीच रिकामं बसलेलं बघीतलं नाही की कधी बाहेरच्या पडवीत आलेलं बघितलं नाही. आम्ही सुट्टी संपवून निघालो की मात्र  ती आम्हाला टाटा करायला यायची बाहेर, नाहीतर कायम घरात. स्वयंपाकघर, माजघर, मागची पडवी हे तिचं कार्यालय. तिला ह्या घराची एवढी सवय झाली होती की म्हातारपणी जेंव्हा तिची दृष्टी गेली, तेंव्हा पण ती संपूर्ण घर फिरायची.  तिच्या पायांना जणू सगळं घर पाठ होतं. भिंतीला हात लावत ती  अगदी सहज स्वयंपाकघरातून मागच्या पडवीत यायची. तिथला लाकडी बाकी चुकवून, झोपाळ्याच्या बाजूने, भिंतीला हात लावत कोठाराकडे जायची. कपाट  उघडून जे हवं ते घेऊन परत त्याच मार्गाने स्वयंपाकघरात. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहिली. दिसत नव्हतं तरी पण  भाजी चिरून दे, नारळ खवणंण  सतत चालु असायच.

काकुला दोन मुलं आणि तीन मुली पण तिने आमच्या बाबांवर पण आपल्या मुलासारखच प्रेम केलं. वयात अंतर पण तेवढंच होतं. ती विवेक दादाचं (तिच्या स्वत:च्या मुलाचं) नाव घेताना सुद्धा आधी कित्येकदा बाबांचं नाव घ्यायची, विजय, शशी, आनंदा अशी सगळी नाव घेऊन झाली की मग विवेकदादाचं नाव तोंडात यायचं, एवढं निर्मळ मन होतं तिच. आम्ही मे महिन्यात हेदवीला गेलो की निघताना आजी आम्हाला लाह्यांचं पीठ, कुळीथाचं  पीठ आठवणीनं द्यायची. आजी गेल्यानंतर ते काम निर्मला काकू आठवणीनं करायची."तुला लाह्यांचं पीठ आवडतं ना?" अस विचारायचं आणि हातात पिठाची पिशवी टेकवायची. निघायच्या आधी नमस्कार करायला गेलो की तिच्या डोळ्यात पाणी असायचं. "हेदवीला, मला म्हातारीला, विसरू नका, या परत नक्की पुढच्या सुट्टीत" हे म्हणत, पदराने डोळे पुसून, देवासमोरची सुपारी हातावर टेकवायची आणि हातावर दही द्यायची. आपसूकचं आमचे ही डोळ्यात पाणी यायचं. 

आजोबा गेल्या नंतर आजीने घर सावरलं, व्यवहारात लक्ष घातलं . मला वाटतं तिच्या मदतीला जशी Front end ला शालिनी काकू होती मुंबईला, तशी Back end सांभाळायला निर्मला काकू होती.  म्हणूनच कि काय कोणास ठाऊक, या दोघींनी या जगाचा निरोप पण एका पाठोपाठ १० दिवसाच्या अंतराने घेतला. मला कळलेली, माझ्या आठवणीत आहे ती  ही सरळ, साधी, शांत अशी निर्मला काकू, तुझ्यासारखी तूच काकू. तुला शतशः प्रणाम 🙏🙏

..... विभव जोगळेकर 

Saturday, July 6, 2019

मी लखपती झाले ....

मी लखपती झाले ....

"विभव मी आता लखपती झाले बरं, माझ्या कडे आता एक लाख जमा झालेत." अगदी आनंदात येऊन शालिनी काकू चहा देत मला म्हणाली होती. मी पण  "अरे वा, छान" एवढंच उत्तर दिलं आणि तिने दिलेला चहा संपवून बाहेर पडलो होतो. आजही आठवतंय तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, डोळ्यातले मिश्किल भाव आणि आयुष्यात काहीतरी मोठं केल्याच समाधान होतं. 

माझी सगळ्यात मोठी काकू, शालिनी काकू. गोरा वर्ण, घारे डोळे,  गोल चेहरा, पिकलेले पांढरे केस, कमी उंची, आणि हातात walker. शिस्तीची एकदम कडक!!! दादरच्या हेदवकरवाडीतल्या १० x १० च्या खोलीत तीचं निम्म्याहून जास्त आयुष्य गेलं. अण्णा काका, शालिनी काकू आणि त्यांची एकुलती एक मुलगी शैला असं खरं तर छोटंसं कुटुंब. सोबत आमचे थोरले काका, आप्पा पण तिथेच रहायला. सासरी मोठा परिवार. माझ्या बाबांसह काकूला सहा दीर आणि चार नणंदा. गावाकडच्या काकांच्या दोन मुली, एक मुलगा, माझे बाबा, शशी काका एवढे सगळेजण मुंबईला शिकायला, त्या १० x  १० च्या खोलीत रहायला होते. म्हणजे सगळे मिळून ९ - १० जण रहायला आणि घरात करणारी एकच बाई, शालिनी काकू. पण काळाने काहीतरी वेगळंच योजले होते ....

ध्यानीमनी नसताना अण्णांचा अपघात झाला आणि ते दगावले. केवढं आभाळ कोसळलं असेल काकूवर. आप्पा एकटेच कमावणारे, एवढ्या सगळ्यांचं शिक्षण, एका पगारात एवढ्याजणांच करायच. पण शालिनीकाकू खंबीरपणे उभी राहिली. तिला साथ मिळाली तिच्या सासूबाईंची, आमच्या आजीची. आंब्याचे लोणचे, आंबापोळी (आंब्याची साठं), फणसपोळी, पापड, कुळिथाचं पीठ असे वेगवेगळे पदार्थ करून आजी मुंबईला पाठवायची. हे सामान घरोघरी जाऊन विकायचं काम शालिनी काकूकडे. ह्यातून येणाऱ्या पैश्यातले थोडे पैसे आपल्याकडे ठेऊन, बाकीचे पैसे काकू हेदवीला पाठवायची. दोन्ही कडे पैश्याचा ओघ सुरु झाला. आजोबा गेल्यावर आजीने व्यवहारात लक्ष घातलं आणि हेदवीतपण लक्ष्मीचा ओघ सुरु झाला. दोन बायकांनी "जोगळेकर" घराणे सावरायला सुरुवात केली होती. 

तिथे आप्पांच्या पगारात आणि सामान विकून येणाऱ्या पैश्यात काकूने बिऱ्हाड सांभाळायला सुरवात केली. अण्णांची पण थोडी पेन्शन होतीच मदतीला. "काटकसर आणि अखंड मेहनत" हा एकच मंत्र. कदाचित ह्या परिस्थीतीमुळेच असेल पण काकूंची शिस्त फार कडक होती. सगळं कसं  मोजून मापून. एवढ्या मुलांमुलींची जबाबदारी असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत बारीक लक्ष ठेवायची सवय लागली. सगळ्यांना शिस्त आवडतेच असं नाही. ज्यांना तिची शिस्त मानवली, ते तिथे टिकले, शिकले, मोठे झाले. शशी काका आणि बाबा शिक्षण संपवून गोव्याला स्थायिक झाले. शोभा ताई शिक्षिका झाली आणि नंतर लग्न होऊन ठाण्याला स्थायिक झाली. तिचीच लहान बहीण, निला ताई बँकेत कामाला लागली. तिची मुलगी, शैला ताई पण शिक्षिका झाली. 

तिची शिस्त जेवढी कडक होती, त्याहून जास्त ती प्रेमळ होती, हौशी होती. मला आठवतंय, आमच्या लहानपणी ती एकदा गोव्याला आली होती. रिकामी बसून रहाणं स्वभावातच नव्हतं. पण उंची कमी असल्यामुळे तिला आईला स्वयंपाकात मदत करणं कठीण जात होतं. शेवटी तिने शक्कल लढवली. शेगडी हालवली, खुर्चीने ओट्यावर चढून बसली आणि पोळ्या भाजायला आईला मदत करू लागली. आम्हा मुलांना जरा हे गंमतशीर वाटलं. काकू ओट्यावर बसून पोळ्या भाजते, पुऱ्या तळते. पण त्या वयात सुद्धा काकूंचा उत्साह प्रचंड होता. तिला आईचा खूप अभिमान वाटायचा. आई नोकरी करून घर सांभाळते ह्याच तिला खूप कौतुक होतं. 

पुढे आप्पा  रिटायर होऊन हेदवीला आले, पण शालिनी काकूने मुंबईलाच रहायचं ठरवलं. तिची कडक शिस्त पुढच्या पिढीला जाचक वाटू लागली. सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवायची सवय आता इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ होऊ लागली. पण आता तो तीचा स्वभाव झाला होता. जे आयुष्यभर केलं ते असं लगेच बदलणं शक्य नव्हतं. पुढे वयानुसार परावलंबी झाल्यावर तीला हेदवीला हलवण्यात आलं आणि काही काळ हेदवीला घालवल्यावर तीने ह्या जगाचा निरोप घेतला. 
हेदवीची आजी, आप्पा ह्यांच्याबरोबर जोगळेकरांची पिढी घडवण्यात तिचा मोलाचा आणि मोठा वाटा होता. काटकसरीत आणि कठीण परिस्थितीत आयुष्य घालवल्यावर,  ह्या बाईकडे जेंव्हा तिचे स्वतः:चे असे एक लाख जमा झाले तेंव्हा तिला किती आनंद झाला असेल. It was indeed a very big achievement for her!!

हॅट्स ऑफ शालिनी काकू. Love you n miss you!!

Saturday, December 30, 2017

मसाला डोसा



मसाला डोसा हा तसा सहज आणि कुठेही मिळणारा पदार्थ. दक्षिण भारतातून जगभर प्रसिद्द झालेला. हल्ली तर मुंबई पुण्यात प्रत्येक नाक्यावर डोस्याची गाडी बघायला मिळते. आमच्या लहानपणी असं नव्हतं. मला वाटतं जी गोष्ट आपल्याला सहज नाही मिळत, त्या गोष्टीच आपल्याला कुतूहल असतं, तसंच काहीसं डोस्याच्या बाबतीत झालं. आमच्या लाहानपाणी, आता सारखं सर्रास हॉटेलला जाणं होत नसे. आम्ही तर वर्षातनं एकदाच जायचो हॉटेलला त्यामुळे डोसा हा एरव्ही घरी न बनणारा पदार्थ, हॉटेल मध्ये अगदी आवडीने खायचो. त्यामुळेच असेल, डोस्याच माझ्या मनात एक स्पेशल स्थान आहे.
गोव्यात डिसेम्बर महिन्यात, ३ तारखेला Old Goa येथे आणि ८ तारखेला पणजी येथे फेस्त असतं. ७ तारखेला, चर्च स्क्वेर, पणजी येथे फटाक्यांची आताषबाजी असते. ती  आताषबाजी बघायला आई बाबा आम्हाला दर वर्षी पणजीला घेऊन जायचे, ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघायचो.
आम्ही रहायचो पर्वरीला, टेकडीवरती. पर्वरी - पणजीला जोडणारा, मांडवी नदीवरचा पूल पडल्यामुळे, वाहतूक बेती मार्गे (आतच Betim), फेरीबोटने पणजीला वळवली होती. ७ तारखेला, संध्याकाळी, ४ वाजता सगळं आटोपून आम्ही तयार व्हायचो. बाबांची त्या वेळी विजय सुपर ही स्कुटर होती. ह्या स्कुटरवरती आम्ही ५ जण स्वार व्हायचो. बाबा स्कुटर चालवायचे, माझा लहान भाऊ, विनय पुढे उभा रहायचा, आई मागच्या सीटवर, आमच्या लहान बहिणीला, वैष्णवीला घेऊन बसायची आणि दोन सीटच्या मध्ये मी !!
पर्वरीहुन बेतीचा प्रवास म्हणजे १०-१५ मिनिटं, मस्त डोंगरातून खाली उतरण्याचा, बाजूला दाट झाडी. बेतीला आलो, कि बाबा स्कुटर पार्क करायचे आणि आईने तो पर्यंत तिकीट काढायचे. मग आम्ही धक्क्यावर फेरीबोटची  वाट बघत उभे असायचो. एखादा शेंगदाणेवाला आला  कि आम्ही बाबांकडे बघायचो. १ रुपयाला  १ पूडी ह्या प्रमाणे २-३ पुड्या घेऊन आम्ही फेरीबोटीत  चढायचो.
बोटीच्या मागच्या बाजूला उभे राहून पाणी कापत जाणारी बोट बघण्यात कधी पणजी यायच कळायच नाही. पणजी धक्का ते चर्च स्क्वेर मग पायपीट करून, एक चांगली जागा पकडायची, जिथून आम्हाला पूर्ण आताषबाजी दिसेल. मग वाट बघायची ती काळोख पडण्याची. तो पर्यंत एखाद दुसऱ्या खेळण्याची आणि आमच्या आवडत्या भिरभिऱ्याची खरेदी व्हायची. काळोख झाला कि २५-३० मिनिटं फटाक्यांची आताषबाजी चालायची. एखादं आईस्क्रीम, उरलेले शेंगदाणे खात आताषबाजी बघायची म्हणजे पर्वणी असायची. जात धर्म विसरून सगळे लोकं रस्त्यावर आताषबाजीचा आनंद घ्यायचे!!
ही आताषबाजी झाली कि आमची पावलं वळायची ती जवळच्या कामत हॉटेलमध्ये. तिथे गेलो कि एकच ऑर्डर असायची, मसाला डोसा. मी, विनय आणि वैष्णवी, प्रत्येकी एक डोसा खायचो. आईबाबांनी स्वतःला कधी काही ऑर्डर केलेलं मला तरी आठवत नाही. ते फक्त चहा प्यायचे आणि आम्ही डोस्यावर ताव मारायचो. डोसा खाऊन झालं कि २ Gold Spotची ऑर्डर असायची. ते संपलं कि आमची सहल संपायची आणि आम्ही निघायचो परतीच्या प्रवासाला.
आज पण डोसा म्हटलं कि मला  ७-डिसेंबरची आठवण येते. विजय सुपरवरची आमची राईड आणि कामत हॉटेल मधला, मसाला डोसा!!

Friday, December 29, 2017

सिनेमासाठी काय पण.....


नाताळाची सुट्टी सुरु होती, मी रजा काढून सहकुटुंब माझ्या घरी गोव्याला होतो. दुपारचे जेवण चालू होते आणि अचानक माझ्या भावाने विषय मांडला.
आपल्या बायकोला उद्देशून तो म्हणाला - "दादा वहिनी इथे आहेत, तू त्यांच्या बरोबर सिनेमाला जाऊन ये. नंतर रुटीन सुरु झाले कि मग मला सांगू नकोस जायला मिळत नाही सिनेमाला!! " असं म्हणत त्याने मला डोळा मारला.

हाय कोर्ट (आमची आई) समोर प्रोपोसल ठेवण्याची त्याची ही पद्धत मला ठाऊक होती. मी ही त्याचीच री ओढत म्हणालो "कल्पना चांगली आहे, तुम्ही दोघी जा, आम्ही आहोतच घरी, मुलांना आम्ही सांभाळू." मी आमच्या सौ कडे पाहिलं, ती प्रश्नार्थक नजरेने माझ्या कडे बघत होती. एवढ्या वर्षात तिच्या डोळ्यातला प्रश्न मी ओळखला होता "आता हे काय नवीन?". मी पण आँखो ही आँखो मी उत्तर दिलं  "just flow with the current!!"

हाय कोर्ट कडून काहीच उत्तर नाही आलं. बाबांनी डोळ्यानेच "carry on!!" म्हणत आम्हाला प्रोत्सहन दिलं . ही मूकसंमती मानून आम्ही जेवण आटोपलं. साधारण २ वाजले असतील, आई वामकुक्षीच्या तयारीला लागली. माझा आणि भावाचा मुलगा (३-३.५ वर्षांची मुलं  ती), लागली दंगा मस्ती करायला. मी पटकन मोबाईलवर तपासलं आणि जाहीर केलं, दुपारी ३.१०, ४.२५ आणि ५.३० असे तीन शो आहेत. लवकर ठरवा कुठल्या शो ला जाणार ते. महिला मंडळाचं चर्चासत्र सुरु झालं. बराच वेळ चर्चा झाल्यावर मी ४.२५ च्या शोची २ तिकिटं बुक केली.

आता खरी कसोटी होती. जो पर्यंत मुलं झोपत नाहीत ह्या दोघीना बाहेर जाणं शक्य नव्हत. माझा मुलगा एकदा झोपला कि २-३ तास झोपेल आणि नंतर उठला कि मी त्याला सांभाळू शकणार होतो. भावाच्या मुलाच्या बाबतीत तेच होतं. झोपून उठला कि आजी, आजोबा आणि बाबा होतेच त्याला बघायला. प्रश्न होता तो ह्या दोघांना झोपवण्याचा. भाऊ मुलाला घेऊन खोलीत गेला आणि त्याला गोष्ट सांगू लागला (झोपवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न). मी पण मुलाला कुशीत घेऊन झोपवण्याचा प्रयत्न करू लागलो. पण हे दोघे पट्ठे, मोठमोठ्याने गाणं म्हणत राहिले. घड्याळात ३.१५ वाजले होते. बायकांना तयार व्हायला लागणारा वेळ लक्षात घेता मुलं पुढच्या ५ मिनिटात झोपणं आवश्यक होतं . आता मात्र आम्हाला टेन्शन आलं. आम्ही चौघे मुलांना झोपवण्याचे वेगवेगळे अयशस्वी  प्रयोग करू लागलो.

शेवटी आई आली आणि आपल्या जोरदार आवाजात म्हणाली "आता मी झोपणार आहे. मला बिलकुल आवाज नकोय. दोघांनी गुपचूप झोपा." दोघांना आजीचा राग आला होता, पण काहीही न बोलता दोघेही पांघरूण  घेऊन गुपचूप झोपले. अगदी २ मिनिटात, शांत झोपले. आम्ही आईकडे बघितलं. ति काही न बोलता तिच्या खोलीत झोपायला गेली. सासूबाईंचा असा आधार मिळाल्यावर दोनीही सुनांना एकदम काय झालं ठाऊक नाही, पण चक्क रेकॉर्ड टाईम मध्ये दोघीही आवरून तयार पण झाल्या आणि चक्क दोन "जावा" एकत्र सिनेमा पाहून आल्या ......


सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...