"बाबा गणपती बाप्पा लवकरच येणार आहे ना? आत्ता तो पाण्यातून येत असेल का?" नहुषने मला आज सकाळी हा प्रश्न केला. मला आधी प्रश्न कळलाच नाही. "पाण्यातून कसा येईल गणपती?" मी त्याला विचारलं. निरागसपणे तो उत्तरला, "बाबा, असं काय करता, गेल्या वर्षी पाण्यातूनच घरी गेला ना तो त्याच्या!!" मला हसू आलं, पण चेहऱ्यावर हसू न दाखवता मी म्हटलं "बरोबर, माझ्या लक्षातच आलं नाही!!"
बाबा कसे विसरले आणि आपण कसं बरोबर ओळखलं ह्या आनंदात तो गणपतीची आरती गुणगुणायला लागला. "बाबा आता हेदवीला केंव्हा जायचं? तिथे किती मज्जा येते, आरत्या म्हणायच्या, मोरया मोरया करायच, मोदक खायचे.... " आता मात्र माझं भान हरपलं. नहुष आधीच हेदवीला पोहोचला होता, मनाने तो तिथेच होता, गणपती येण्याची आतुरतेने वाट पाहत. त्याला गणपती उत्सवाचे वेध लागले होते. आणि माझं मन आमच्या बालपणात गेलं. उत्सवातल सगळ्यात जास्त लक्षात रहातो तो गोवा - हेदवी प्रवास:
आम्ही रहायला गोव्याला आणि आमचं मूळ घर हेदवीला जिथे आम्ही सर्व जोगळेकर जमायचो गणपती साजरा करायला. ती परंपरा अजूनही आहे. गणपती जवळ आले की बाबा आधी बसचं reservation करून यायचे. त्याकाळी पणजी-मुंबई अशी रातराणी होती (अजूनही आहे, पण बहुतेक ३-४ गाड्या आहेत संध्याकाळच्या वेळेत). पांढरी - हिरवी एशियाड. मला ह्या गाडीचं प्रचंड आकर्षण होतं. बाबानी तिकीट बुक केलं कि आमची गणपतीची खरेदी व्हायची. गणपती समोर ताटी सजवायला रंगीत कागद, लाईटच्या माळा , पूजेला धूप, कापूर, चांगल्या आठवढाभर पुरतील एवढ्या उदबत्त्या, बुक्का इत्यादी. आठवड्याभराचे कपडे, खरेदी केलेलं सामान, प्रवासात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू नैवेद्याचे खव्याचे मोदक इत्यादी सामान कमीतकमी बॅगमध्ये कसे पॅक केले जायचे ते आई आणि बाबांनाच ठाऊक. प्रवासाच्या दिवशी आम्ही ४ वाजे पर्यंत पणजी बसस्थानकात असायचो. बस फलाटावर लागली की आमची घाई असायची जाऊन खिडकी पकडण्यासाठी. खिडकीकडे बसण्यासाठी स्पर्धा आणि आम्हा तिघा भावंडात भांडण झाल्याशिवाय प्रवास शक्यच नसायचा. मग आई वैष्णवीला आपल्याजवळ बसवायची, (खिडकीजवळ !! - young ones always get the benifit !! ). मी आणि विनय एकाच सीट वर, अर्धा प्रवास तो खिडकीजवळ (म्हणजे सूर्य मावळेपर्यंत) आणि नंतर मला खिडकी मिळायची.
प्रवास सुरु झाला की पोटातले कावळ्यांची कावकाव सुरु. आधी रंगीत poppins खायचे, मग ५० पैशेवाली पेप्सी असं करत करत बस सावंतवाडीला पोहोचायची. इथे वाहनचालक बदलले जायचे, त्यामुळे गाडी निदान ३० मिनिटे तरी इथे थांबायची. इथे आलं की वडा पाव किंवा कांदा भाजीवर ताव मारायचा आणि पुढे कणकवलीला पोहोचलो की आवाज यायचा तो उसाच्या गाडीला बांदलेल्या घुंगरांचा. तेवढ्यात खिडकीत उभा रहायचा तो रसवाला. हातात उसाच्या रसाने भरलेले ग्लास. बाबा मग प्रत्येकाला एक ग्लास घ्यायचे आणि सोबत खायला कुरकुरीत लांब बोटं (bobbies का काय म्हणतात ते...) इथ पर्यंत सूर्य मावळलेला असायचा आणि मग मी बसायचो खिडकीकडे. संधीप्रकाशात गाडीच्या उलट दिशेने पळणारी झाडं पहायला मला खूप आवडतं. तो मंद प्रकाश आणि त्याचवेळी बसमध्ये लागलेले निळे दिवे, खिडकीतून येणारा गार वारा, वातावरण कसं एकदम बदलून जायचं. अशावेळी मूड खराब करायला हमखास मागच्या सिट्वरुन आवाज यायचा, "जरा खिडकी बंद करतोस का रे बाळा? मागे थंडी वाजतेय". मग खिडकी बंद करून बाहेर बघत मी हरवून जायचो. थोड्या वेळाने गाण्याच्या भेंड्या सुरु व्हायच्या. वाटेत जेवण करून आमची एसटी रात्र १.३० च्या सुमारास चिपळूणला पोहोचायची. इथे उतरलो कि पुढच्या बसची वाट पहात बसणं हा कार्यक्रम असायचा. रात्र दीड ते पहाटे ४-४.३० वाजे पर्यंत. ह्या वेळेत चिपळूण स्टॅन्डवरच flavored milk, स्टॅन्डवरच्या canteen मधला वडा आणि चहा हा कार्यक्रम ठरलेला.
इथून पुढचा प्रवास हा सगळ्यात रंजक आणि थरारक प्रवास असायचा. चिपळूण-हेदवी हे अंतर तस ६० किमीचं. पहाटे ४.३० ला बोऱ्याबंदर गाडी असायची, जी हेदवी गावाजवळ जायची. ह्या बसमध्ये जागा मिळवणं म्हणजे युद्ध जिकंण्यासारखं असायचं. गाडी स्टॅण्डवर आली की आई वैष्णवीला घेऊन आधी बसमध्ये चढायची, अर्थात जागा पकडण्यासाठी. मग आम्ही घुसायचो गर्दीत, आजूबाजूच्या लोकांना कोपराने ढकलत, लोकांच्या पायावर पाय देत आणि नाहीच काही जमलं तर उगाच रडत (sympathy मिळायची आणि पुढे जायला आत पण !!). बाबा मागून सामान चढवायचे आणि शेवटी चढायचे. त्यांना बहुतेक वेळा जागा मिळायची नाही. मग माझ्या जागेवर ते बसायचे नि मी त्यांच्या मांडीवर. एकदा तर मला आठवतंय, वैष्णवीला बाबांनी खिडकीतून आत ढकलून सीट पकडलं होतं. पुढे पुढे बसची वाट बघण्याऐवजी आम्ही खाजगी tempo ने (त्या वेळेची खाजगी चिपळूण-गुहागर shuttle सर्व्हीस) प्रवास करत मोडकाआगर गाठायचो आणि तिथून हेदवी. ह्या टेम्पो मधल्या प्रवासाची एक आठवण अजून ताजी आहे, रात्री २च्या दरम्यान आम्ही गाडीत बसलो. लहान असल्यामुळे आम्ही दोन सीटच्या मध्ये बसायचो. गाडी निघाली की आतले दिवे बंद व्हायचे आणि रस्त्यावरचे दिवे काये ते प्रकाश टाकायचे त्या बंद टेम्पोमध्ये. त्या रात्री माझ्या समोरच्या सीटवर एक जख्खड म्हातारी बसलेली, तोंडाने तंबाखू चघळत. त्या रात्री प्रवास संपेपर्यंत, जवळजवळ तासभर रस्त्यावरच्या दिव्या समोरून गाडी गेली की मी मला तिचं दर्शन व्हायचं, दात पडलेले, बोळक्याने तंबाखू चघळत म्हातारी तंद्रीत हरवलेली !!. हे दर्शन मी कधीच विसरू शकणार नाही. कधी प्रवास संपतो आणि कधी ती उतरते असं झालं होतं मला.
पुढे कोकण रेल्वे सुरु झाल्यावर प्रवास थोडा सोपा झाला, मजेशीर झाला. पावसामुळे वाटेवर दिसणारे असंख्य धबधबे आणि वाटेतले बोगदे मोजत चिपळूण कधी यायचं कळायचंच नाही. त्यात वाटेत प्रत्येक स्टेशनवर उतरून परत चढायचं, गावातल्या मुलांना टाटा करायचा, वडापाव, मसाला लावलेली काकडी खायची असं काहींना काही तरी चालू असायचं. पुढे तर बाबांनी पहिली वहिली tata indica घेतली आणि आमचा प्रवास खूप सुखकर झाला, पण त्या एसटीतल्या प्रवासाची मजा काही औरच असायची!!!
आता मात्र एक गोष्ट जाणवते, आम्हाला हा आनंद मिळावा म्हणून आई बाबांना किती कष्ट घ्यायला लागायचे त्यावेळी. आधी सगळी तयारी, मग रात्रभर प्रवास आणि इतकं थकून प्रवास करून हेदवीला पोहोचलं की आम्ही झोपी जायचो, पण आई मात्र लगेच कामाला लागायची. तिचं सासर ना ते!! कुठून आणायची एवढी ताकद. आदल्या दिवशी शाळेत मुलांना शिकवून, सामान आवरून, रात्रभर प्रवास करून, दमून भागून हेदवी गाठायचं ते दुपारी जेवणं झाली की तिला थोडी विश्रांती मिळायची!!
हेदवी-गोवा बसने लहानपणी केलेले असंख्य प्रवास, त्या एशियाड मधला रात्रीचा निळा दिवा, स्टॅन्डवरचा उसाचा रस, चिपळूणला मिळणारं flavored milk... काय आणि किती मजा...... प्रवासाची मजा!!
---- विभव जोगळेकर

Must
ReplyDelete