|| श्री ||
बाबरी मस्जिद निकाल, भारतातली तणावपूर्ण परिस्थिती, धर्मावरून भांडण, लोकांवर मत व्यक्त करण्यावर बंदी, ह्या परिस्थितीत मनातून सुचलेली कविता share करत आहे....आशा आहे आवडेल सर्वांना!
एक अखंड होत भारत वर्ष,
जिथे सिंधू, गंगा, यमुना एकत्र नांदत होत्या |
पण आता सिंधू, काश्मीर बघण्यावर मृत्यूच सावट का?
पौर्णिमेच्या रात्री आकाशात अर्धाच चंद्र का? || १ ||
याच भारत भूमीवर घेतले प्रभू विष्णूने दहा अवतार,
कित्येक दानवांचा इथे त्यांनी केला आहे संहार |
पण आता चहूकडे पसरलेल्या दानवाना दशावतार तरी पुरातील का?
पौर्णिमेच्या रात्री आकाशात अर्धाच चंद्र का? || २ ||
जिथे जगातील श्रेष्ट संस्कृती नांदत होती आनंदात,
जिथे अनेक धर्मांचे लोक एकत्र नांदत होते सुखात |
आज इथलेच धर्म एकमेकांच्या रक्ताला हपापलेले का?
पौर्णिमेच्या रात्री आकाशात अर्धाच चंद्र का? || ३ ||
सावट आहे इथे लोकांवरती अतिरेकी हल्ल्यांच,
साध्या निकालानंतर, उफाळणाऱ्या दंगलीच |
सतत मृत्युच्या छायेत वावरत जीवनाचा आनंद उपभोगायचा का?
पौर्णिमेच्या रात्री आकाशात अर्धाच चंद्र का? || ४ ||
लोकतांत्रिक देशामध्ये लोकांवर मात्र अनेक बंधन आहेत,
बल्क एसमेस वर सुद्धा, सध्या तरी बंदी आहे |
स्वता:च मत मांडण्यावरसुद्धा इथे इतकी बंधने का?
पौर्णिमेच्या रात्री आकाशात अर्धाच चंद्र का? || ५ ||
लोकतंत्र देशात आपल्याकडे मतदानाचा अधिकार आहे,
चांगल्या नेत्यांना निवडून देण्याच प्रत्येकच कर्तव्य आहे |
देशाची अब्रू मातीत मिळवणाऱ्या, नेत्यांना थोडी तरी चाड आहे का?
पौर्णिमेच्या रात्री आकाशात अर्धाच चंद्र का? || ६ ||
नको वाटतंय चंद्राला भारतवर्षावरून जायला,
पापांच्या ज्वालांचा त्रास होतोय शीतल छाया देणाऱ्या चंद्राला |
पण मग असे असताना हे अर्धे तरी दर्शन का?
पौर्णिमेच्या रात्री आकाशात अर्धाच चंद्र का? || ७ ||
ज्यांना आहे चाड आपल्या अस्तित्वाची, कर्तव्याची |
जरी वाहत असतील नद्या कर्म पापी दानवांच्या,
प्रयत्न चालू आहे भारतवर्षात माणुसकी टिकविण्याची |
अशा लढणाऱ्या मानवाला आशेच्या किरणांची गरज आहे,
म्हणूनच पौर्णिमेच्या रात्री आकाशात अजून अर्धा तरी चंद्र आहे || ८ ||
..........विभव जोगळेकर...........
No comments:
Post a Comment