Tuesday, July 29, 2025

स्फूर्ती गीत

नभी दाटता काळे मेघ हे, मोर उदास ना कधी बसला रे,
लय लावूनी, फुलवूनी पिसारा, मोर थुई थुई नाचे रे ||

मेघ बरसणार जलधारा, अथवा वाऱ्यासंगे पसार रे,
उज्वल आहे काळ उद्याचा, काळे मेघ हे संकेत रे ||

संकट येता, नको बसू उदास, तुज शक्ती युक्तीचे वरदान रे,
काळ उद्याचा तुझाच असणार, गाठ मनाशी बांध रे ||

---- विभव जोगळेकर

Saturday, July 19, 2025

Oh life

Oh Life, it's no harm in being a little nice!!
I know you Love, to throw surprises,
But one at a time would be really nice!!

Nothing's permanant, nothing here to stay,
And you wanna tell this in your own way,
But you can be gentle, and may be less brutal,
Am here to face all and am not running away!!
Oh life....

You have been generous and you have been kind,
There have been some great times as I look behind,
But now you wanna test me in your own way,
Let me assure you am not running away,
Oh life...


--- Vibhav 

Sunday, July 6, 2025

अंतरीचा विठ्ठल

का जाऊ पंढरीला, विठूरायाच्या दर्शना,
विठू सदा माझ्या संगे, का तुम्हास दिसेना?

विठू माझा, शेतामंदी, राबतोया दिसभर,
शेताच ओझं माझ्या, माऊलीच्या पाठीवर,
गोठ्यामध्ये रखुमाई, कपिलेचे रूप घेई,
दूध पाजी या लेकरा, दुजे भाग्य काही नाही,
विठू असे तुमच्यात, का तुम्हा उमगना,
विठू सदा माझ्या संगे, का तुम्हास दिसेना?

बैसलागे विठू माझा, अगदीच दाराम्होरं,
श्वान होऊनी राखितो, आपुलेच तो मंदिर,
विठू पाणी विठू वारा, विठू आनंदाचा झरा,
जेथे जातो तेथे, संगे उभा असे तो सावळा,
विठू आस, विठू श्वास, विठू रोमारोमात भरला,
विठू सदा माझ्या संगे, का तुम्हास दिसेना?

विठू माझ्या घरी, बाळगोपाळात, 
विठू भजनात..., विठू कीर्तनात,
माझी नगरी भासे दुजी पंढरपुरी,
व्यापून राहिला... विठू चराचरी,
ठेवा तुम्ही ठेवा, विठू चरणी भाव,
विठू सदा तुम्हा संगे; दिसेल हो राव,
आता झाली सीमा, अधिक सांगवेना,
विठू सदा माझ्या संगे, का तुम्हास दिसेना?

--- विभव

Saturday, December 21, 2024

आयुष्य

मलाही ना समजला, तू पण समजण्याचा हट्ट करू नको,
जगण्याचा अर्थ शोधताना, जगणं विसरून जाऊ नकोस||

झोपडीत जन्मला कोणी, तर कोणाचं बालपण महालात,
तरी प्रत्यकाच्या वाट्यास दुःख असतेच, हे कधी विसरु नकोस| ||१||

जगण्याला पैसा लागतोच, लक्ष्मी उपासना सोडू नकोस,
तरी पैशासाठी वाट्टेल ते, हे सूत्र कधीच धरू नकोस ||२||

प्रत्येकात राम असतो, रावणही असतो दडलेला,
तरी कलियुग आहे मित्रा, कृष्ण गीतेची शिकवण विसरु नकोस ||३||

यत्न करणे तुझ्याच हाती, कर्मावर तू श्रद्धा ठेव,
सबुरीने फळाची वाट पहाताना, कर्म तैसे फळ विसरु नकोस ||४||

जन्म - मृत्यू ना तुझ्या हाती, इथे प्रत्येकाचे श्वास ठरलेले,
जन्मसेही उलटी गिनाती शुरू है, हे कधीही विसरू नकोस ||५||

का करतोस चिंता मित्रा, चिंता सखी चीतेची,
जे होणार ते अटळ आहे, हे कधी विसरु नकोस ||६||

शेवटी एकच सांगेन मित्रा, आयुष्याचे खरे सोबती तुझे श्वास आहेत,
त्या श्र्वासांची उपासना कर, हे अंतिम सत्य विसरू नकोस ||७||

---- विभव 

Tuesday, July 26, 2022

Morning Walk - दिल तो बच्चा है जी

आज सकाळी पावसाने विश्रांती घेतली आणि आम्ही दोघे Morning Walk ला बाहेर पडलो. हो, हल्ली आम्ही जोडीने वॉकला जातो. म्हटलं एकट्याने चालून काही वजन कमी होत नाही, जोडीने जाऊन बघू.!!


जोडीने जायला लागल्यापासून एक गोष्ट लक्षात आली. आपण पुरुष मंडळी जेवढं DARING नही करत तेव्हढ ह्या बायका STARING करत असतात. मला वाटायचं अचानक एव्हढ्या बायका मला का observe करायला लागल्या, मग लक्षात आलं, मला नाही आमच्या जोडीदाराचं निरीक्षण सुरू असतं. मला एक गोष्ट नक्की कळली आहे, बायकांच्या डोळ्यात देवाने जो काही scanner बसवला आहे ना, science ने कितीही प्रगती केली तरी We can't beat it! अवघ्या एक सेकंदात त्या समोरच्या व्यक्तीला नखशिखांत स्कॅन करतात. अगदी पाच सहा महिन्यानंतर विषय निघाला तरी त्या सांगतील त्या दिवशी morning walk चे details. अगदी डोक्यावरच्या हेअर पिन पासून पायात कोणते shoes होते इथपर्यंत. तसा त्यांचा हेतू फार प्रामाणिक असतो हे scanning करताना. "काय तो टॉप घातलाय त्या बाईंने .... " अस म्हणून पुढील १-२ आठवड्यात तोच टॉप तुम्हाला तुमच्या बायकोच्या wardrobe मध्ये दिसतो!! 

तर गंमत अशी की मला पण एक वाईट सवय आहे, बाहेर पडलो की मी पण समोर येणाऱ्या व्यक्तीचं निरीक्षण करत असतो आणि आमच्या बायकोच्या भाषेत त्यांची ' मापं ' काढत असतो, उगाच काहीतरी time pass . असो, तर आजचा किस्सा थोडा वेगळाच. आम्ही निघालो morning walk ला आणि थोड्या वेळाने एक व्यक्ती चालत आमच्या पुढे गेली. साधारण पन्नास च्या आसपास वय असावं. चेहऱ्यावर अखिल विश्वाची चिंता, पाठीवर टांगलेली छोटी सॅक आणि खिशात मोबाईल. त्या मोबाईल वर मोठ्या आवाजात गाणं सुरू होतं..." ये अपना दिल तो आवारा..." त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव, त्याची देहबोली आणि त्या गाण्याचा मूड,  ह्याचा काडीमात्र ही संबंध नव्हता. तसही लोकांना अशा एकापेक्षा एक विचित्र सवयी असतात morning walk करताना -  एक जण  मोबाईल वर रामरक्षा लावून चालायचे, तर दुसरे एक जण हनुमान चालीसा आणि त्या बाजूने कोणी तरी रफी साहेबांचं गाणं ऐकत जाणार. आम्ही नक्की ऐकायचं काय आणि कशाला?.  नाही, ऐकायला माझी ना नाही, चालण्याला ज्याने प्रोत्साहन मिळेल असं तुम्ही काहीही एका, पण अख्या जगाला कशाला ऐकवता? एखादा हेडफोन लावा कानात आणि काय हवं ते ऐकावं. ह्या हेडफोन वाल्यांची पण वेगळी गंमत असते. त्यांना आपण कुठून चाललोय, आपल्या मागून गाड्या ये-जा करत आहेत ह्याच भानच नसतं. कधी फूटपाथ वर, तर कधी रस्त्याच्या मधून हे लोकं Morning  Walk करत असतात, जसं  की रस्ता हा ह्यांच्या morning walk साठीच बनवला आहे. गाड्यांनी जपून, वाट मिळेल तिथून जावं आपलं!!
  
असो, तर मूळ मुद्दा राहिला बाजूला. तर हे साहेब हेमंत कुमार ह्यांचं गाणं ऐकत चालले होते, ते थोडे पुढे गेल्यावर मी हळूच हिला म्हणालो - "ते गाणं आणि ह्यांचे भाव काही संबंध नाही" त्यावर आमच्या सौ - "अरे चालायचंच, काही लोकांसाठी गाणं ही सुद्धा एक प्रकारे थेरपीचं  काम करते. त्या बिचाऱ्याच्या  आयुष्यात काही problems असतील, त्याला जर का हे गाणं ऐकून आपला भूतकाळ आठवत असेल, जो कदाचित त्याला energy  देत असेल आजचं टेन्शन झेलायला, तर चांगलंच आहे. आणि काही लोकांना आवडतं  असं भूतकाळात रमून रहायला"
मी - " काही नाही, ह्या लोकांना change नको असतो, जुनं ते सोनं  आणि नवीन काही असेल ते भंगार असेच असतं  ह्यांचं "
आमची सौ. - "तू कशाला पण एवढा वैतागतो आहेस? आणि त्याला judge का करतो आहेस, you hardly know him."
मी - "मी Judge वगैरे नाही करत, ऐकेना तो काहीही मला काय करायचं आहे? पण जे काही ऐकायचं आहे ते कानात ऐकावं - स्वता:च्या!! जगावर कशाला थोपता  तुमचा मूड ?"
सौ. - "तू नको लक्ष देउस , आपण जरा speed वाढवू चालण्याचा आणि पुढे जाऊ त्याच्या.."

पण कुठे काय, तो पण आमच्याच स्पीड ने चालत होता, आता मला हळूहळू त्रास व्हायला लागला होता - गाण्याचा नाही पण त्याने ते मोठ्याने लावण्याचा असावा बहुतेक. माझ्या बाबतीत काय होतं की एखादं ऐकलेलं गाणं काधी कधी संबंध दिवस मी गुणगुणत असतो आणि ते गाणं माझ्या दिवसाचा "tone" ठरवतं ...Music has that power to influence you for the whole day!!   तेवढ्यात एक गंमत झाली... 

समोरून एक तरुणी, हातावर  Apple चे smart watch,  कानात boat चे headphone, पायात NIKE चे shoes  घालून जॉगिंग करत आमच्या बाजूने निघून गेली आणि योगायोग की काय माहीत नाही, त्या समोरच्या व्यक्तीच्या मोबाईल मधून नवीन गाणं कानावर पडलं .... "दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी" ... 

आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं, हसलो आणि पुढील walk "दिल तो बच्चा है जी" म्हणत पूर्ण केला!!

@ विभव जोगळेकर 

Monday, July 11, 2022

पाऊस आणि प्रेम ....

आज सकाळपासूनच पावसाची संततधार आणि हवेतला गारवा  ह्यामुळे वातावरण खूप प्रसन्न होतं. समीर आणि सईचं WhatsApp चॅटिंग सूरू होतं, कॉलेजला कसं जायचं हा विषय!! सईला पावसात छान सायकलने भिजत  जायचं होतं तर समीर बाईक ने जाऊ म्हणून आग्रह करत होता. शेवटी, मैत्रीणीच्या हट्टापुढे, समीरने माघार घेतली आणि दोघांनी सायकल घेऊन जायचं ठरवलं.

 
आपापल्या घरातून निघून दोघेही कर्वे पुतळ्याजवळ सिग्नलला भेटले आणि एका बाजूने निवांत गप्पा मारत जाऊ लागले. पावसाची संततधार आणि सकाळचं ट्रॅफिक ह्यातही ते दोघे आपल्याच तंद्रीत चालले होते. मयूर कॉलनीचा सिग्नल ओलांडून दोघेही पुढच्या करिश्मा चौकातल्या सिग्नल जवळ येत असताना, चौकातला लाल दिवा लागला आणि गाड्या थांबु लागल्या. सवयीप्रमाणे, पुढे जाण्यासाठी  समीरने पटकन सायकल बाजूला घेत, लेन बदलली आणि गाडीच्या पुढे जायचं ठरवलं. पण सईला तिथेच थांबायचं होतं. थोडं  निवांत, पावसात भिजत जायचं होतं. तिला थांबलेलं पाहून समीर ने पटकन सायकल मध्येच थांबवली आणि तो मागे येण्यासाठी सायकलवरून उतरू लागला. मागून येणाऱ्या बाईकवाल्याने जोरात ब्रेक लावत चार शिव्या हासडल्या आणि बाजूने पुढे निघून गेला. ब्रेकचा आवाज ऐकून सिग्नलला थांबलेल्या सगळ्यांचं लक्ष त्या दोघांकडे गेलं.

मागोमाग येणाऱ्यास्कुटीवरच्या  मुलीने गाडी थोडी मागेच थांबवली आणि समीरला मागे येऊ दिलं. समीरने पटकन उतरून सायकल सईच्या बाजूला उभी केली. सईने बाइकवरच्या मुलीकडे बघीतलं , आँखो ही आँखो मे thanks आणि welcome संवाद झाला दोघींमध्ये आणि स्कुटीवाली पुढे निघाली. 

समीरची धडपड बघून सईच्या गालांवर अलगद हसू आले, थोडीशी ओशाळलीच ती; तिच्या खळीवरून ओघळणाऱ्या पावसाच्या थेंबात समीर आकंठ बुडाला होता आणि आजूबाजूला सिग्नलला थांबलेले.......क्षणभर Monday Blues विसरून, पाऊस आणि पावसात उमलणाऱ्या प्रेमाचा  विचार घेऊन कामावर निघाले. 

©विभव 

Friday, July 31, 2020

श्रद्धा (की अंधश्रद्धा)

कराया साजरा आनंद, सण धुळवडीचा आला,
फाल्गुन पौर्णीमेत, गडी माय मातीत रंगला,
घातरक रंग तू निर्मिले, कितीएका तू मारिले,
तुझ्या 'श्रद्धे ' पायी तु, देवास मारलं ।। १ ।।
सर्प, मित्र शेतकऱ्याचा, म्हणून नागोबा पूजिला,
वन्य जीवही महत्वाचे, हाच संदेश दिधला,
तुझ्या श्रेष्ठ 'बुद्धी' पायी, नागाला दूध तू पाजीलं , 
 तुझ्या 'श्रद्धे ' पायी तु, देवास मारलं ।। २ ।।  
आषाढ मासी सण, वटपौर्णीमेचा आला,
झाडांचे महत्व तुला सांगून तो गेला,
वडाला दोऱ्यात बांधिले, तू जंगलच संपवलं,
 तुझ्या 'श्रद्धे ' पायी तु, देवास मारलं ।। ३ ।।  
भाद्रपद मासी बसले गणेश घरोघरी,
मातीची मूर्ती, विसर्जन मातीत, निसर्गाची पूजा ही खरी,
मूर्ती बनवुनी P. O. P. ची, तू नदीलाच मारलं ,
 तुझ्या 'श्रद्धे ' पायी तु, देवास मारलं ।। ४ ।।  
शरद ऋतूत, सण दिवाळीचा हा आला,
दारोदारी रोषणाई, उधाण आनंदाला,
तू निर्मिले फटाके, मिठाईत केली भेसळ ,
 तुझ्या 'श्रद्धे ' पायी तु, देवास मारलं ।। ५ ।।  
देव चराचरी आहे, वर्षभर सण हेच सांगती,
जपा निसर्गाला, जपा माणसा-माणसातली नाती,
स्वार्थ नी अज्ञानापोटी, विचार फक्त स्वताचा तू केला,
केले प्रदूषण, संपविले वन्य जीवनाला,
देव निसर्गात आहे, तू त्यालाच संपवायला निघाला,
देव माणसात आहे, तू माणुसकीलाच विसरला,
जपा निसर्गाशी नातं, तू नातंच तोडाया निघाला,
 तुझ्या 'श्रद्धे ' पायी, देवालाच माराया निघाला  ।। ६ ।।  

--------------विभव जोगळेकर 

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...