मी लखपती झाले ....
"विभव मी आता लखपती झाले बरं, माझ्या कडे आता एक लाख जमा झालेत." अगदी आनंदात येऊन शालिनी काकू चहा देत मला म्हणाली होती. मी पण "अरे वा, छान" एवढंच उत्तर दिलं आणि तिने दिलेला चहा संपवून बाहेर पडलो होतो. आजही आठवतंय तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, डोळ्यातले मिश्किल भाव आणि आयुष्यात काहीतरी मोठं केल्याच समाधान होतं.
माझी सगळ्यात मोठी काकू, शालिनी काकू. गोरा वर्ण, घारे डोळे, गोल चेहरा, पिकलेले पांढरे केस, कमी उंची, आणि हातात walker. शिस्तीची एकदम कडक!!! दादरच्या हेदवकरवाडीतल्या १० x १० च्या खोलीत तीचं निम्म्याहून जास्त आयुष्य गेलं. अण्णा काका, शालिनी काकू आणि त्यांची एकुलती एक मुलगी शैला असं खरं तर छोटंसं कुटुंब. सोबत आमचे थोरले काका, आप्पा पण तिथेच रहायला. सासरी मोठा परिवार. माझ्या बाबांसह काकूला सहा दीर आणि चार नणंदा. गावाकडच्या काकांच्या दोन मुली, एक मुलगा, माझे बाबा, शशी काका एवढे सगळेजण मुंबईला शिकायला, त्या १० x १० च्या खोलीत रहायला होते. म्हणजे सगळे मिळून ९ - १० जण रहायला आणि घरात करणारी एकच बाई, शालिनी काकू. पण काळाने काहीतरी वेगळंच योजले होते ....
ध्यानीमनी नसताना अण्णांचा अपघात झाला आणि ते दगावले. केवढं आभाळ कोसळलं असेल काकूवर. आप्पा एकटेच कमावणारे, एवढ्या सगळ्यांचं शिक्षण, एका पगारात एवढ्याजणांच करायच. पण शालिनीकाकू खंबीरपणे उभी राहिली. तिला साथ मिळाली तिच्या सासूबाईंची, आमच्या आजीची. आंब्याचे लोणचे, आंबापोळी (आंब्याची साठं), फणसपोळी, पापड, कुळिथाचं पीठ असे वेगवेगळे पदार्थ करून आजी मुंबईला पाठवायची. हे सामान घरोघरी जाऊन विकायचं काम शालिनी काकूकडे. ह्यातून येणाऱ्या पैश्यातले थोडे पैसे आपल्याकडे ठेऊन, बाकीचे पैसे काकू हेदवीला पाठवायची. दोन्ही कडे पैश्याचा ओघ सुरु झाला. आजोबा गेल्यावर आजीने व्यवहारात लक्ष घातलं आणि हेदवीतपण लक्ष्मीचा ओघ सुरु झाला. दोन बायकांनी "जोगळेकर" घराणे सावरायला सुरुवात केली होती.
तिथे आप्पांच्या पगारात आणि सामान विकून येणाऱ्या पैश्यात काकूने बिऱ्हाड सांभाळायला सुरवात केली. अण्णांची पण थोडी पेन्शन होतीच मदतीला. "काटकसर आणि अखंड मेहनत" हा एकच मंत्र. कदाचित ह्या परिस्थीतीमुळेच असेल पण काकूंची शिस्त फार कडक होती. सगळं कसं मोजून मापून. एवढ्या मुलांमुलींची जबाबदारी असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत बारीक लक्ष ठेवायची सवय लागली. सगळ्यांना शिस्त आवडतेच असं नाही. ज्यांना तिची शिस्त मानवली, ते तिथे टिकले, शिकले, मोठे झाले. शशी काका आणि बाबा शिक्षण संपवून गोव्याला स्थायिक झाले. शोभा ताई शिक्षिका झाली आणि नंतर लग्न होऊन ठाण्याला स्थायिक झाली. तिचीच लहान बहीण, निला ताई बँकेत कामाला लागली. तिची मुलगी, शैला ताई पण शिक्षिका झाली.
तिची शिस्त जेवढी कडक होती, त्याहून जास्त ती प्रेमळ होती, हौशी होती. मला आठवतंय, आमच्या लहानपणी ती एकदा गोव्याला आली होती. रिकामी बसून रहाणं स्वभावातच नव्हतं. पण उंची कमी असल्यामुळे तिला आईला स्वयंपाकात मदत करणं कठीण जात होतं. शेवटी तिने शक्कल लढवली. शेगडी हालवली, खुर्चीने ओट्यावर चढून बसली आणि पोळ्या भाजायला आईला मदत करू लागली. आम्हा मुलांना जरा हे गंमतशीर वाटलं. काकू ओट्यावर बसून पोळ्या भाजते, पुऱ्या तळते. पण त्या वयात सुद्धा काकूंचा उत्साह प्रचंड होता. तिला आईचा खूप अभिमान वाटायचा. आई नोकरी करून घर सांभाळते ह्याच तिला खूप कौतुक होतं.
पुढे आप्पा रिटायर होऊन हेदवीला आले, पण शालिनी काकूने मुंबईलाच रहायचं ठरवलं. तिची कडक शिस्त पुढच्या पिढीला जाचक वाटू लागली. सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवायची सवय आता इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ होऊ लागली. पण आता तो तीचा स्वभाव झाला होता. जे आयुष्यभर केलं ते असं लगेच बदलणं शक्य नव्हतं. पुढे वयानुसार परावलंबी झाल्यावर तीला हेदवीला हलवण्यात आलं आणि काही काळ हेदवीला घालवल्यावर तीने ह्या जगाचा निरोप घेतला.
हेदवीची आजी, आप्पा ह्यांच्याबरोबर जोगळेकरांची पिढी घडवण्यात तिचा मोलाचा आणि मोठा वाटा होता. काटकसरीत आणि कठीण परिस्थितीत आयुष्य घालवल्यावर, ह्या बाईकडे जेंव्हा तिचे स्वतः:चे असे एक लाख जमा झाले तेंव्हा तिला किती आनंद झाला असेल. It was indeed a very big achievement for her!!
हॅट्स ऑफ शालिनी काकू. Love you n miss you!!