जिथे कधी उमटली होती, प्रेमाची पहिली कहाणी,
शब्द ना आले ओठावरती, शांतता होती सोबती,
हृदयांचे चालले हितगुज, नजरेस नजर ना मिळती ।१।
संगतीने चालत होते, सावल्यांनाही कंप विरहाचा,
प्रत्येक पावला संगे, ठोका चुके हा हृदयाचा,
हितगुज करून गेली, हळूच झुळूक वाऱ्याची,
नजरेस नजर मिळता, फुटला बांध भावनांचा ।२।
क्षणात गर्दी झाली, लोचनी त्या अश्रूंची,
गालावरून घरंगळत आली, ही धार दवबिंदुची,
क्षण विरहाचा आला, दोघे समजून चुकले,
इथून पुढची होती, बिकट वाट विरहाची ।३।
शेवटचे पाहिले त्याने, तिचे थरथरणारे डोळे,
डोळ्यात तिच्या आठवणी, आणि तुटलेली ती स्वप्ने,
ना कसले वाद, ना राग, ना कसली स्पष्टीकरणे,
कसलाही आवाज न करता, तुटलेली दोघांची मने ।४।
शेवटी वळले दोघे, परतीच्या अनोळखी वाटेने,
दोन जीव अजून जुळलेले, परी तोडली वीण नियतीने,
निरोप हवेत विरघळला, पावसाच्या बरसत्या धारांनी ,
संपली साथ एकमेकांची, राहिल्या फक्त आठवणी ।५।
--------- विभव जोगळेकर
No comments:
Post a Comment