Tuesday, November 25, 2025

माऊली

तिने सोडला न धीर, वाट पाहत राहिली,
तिन्हीसांजेची वेळ, माऊली दारी उभी राहिली ।।

दिवे लागणीची झाली वेळ, लेकरू अजून नाही घरी,
संधी प्रकाशा आडून  हळूहळू, काळोख जाळे पसरी,
लेकराने असा मांडला खेळ, वेळेचे त्यास भान नाही,
गुंतले मन खेळण्यात, माऊलीची त्यास फिकीर नाही,
लेकराच्या काळजीने, कासावीस  ती  ऐसी झाली,
तिन्हीसांजेची वेळ, माऊली दारी उभी राहिली ।।

आली परतण्याची वेळ, सखे एक एक सोडून गेले,
मांडलेल्या खेळामध्ये, लेकरू मात्र गुंतून गेले,
क्षणभंगूर या खेळात, मन ऐसे रंगून गेले,
घराकडच्या वाटेपासून, अलगद ते दूर गेले,
खेळाच्या त्या मायाजाळात , नाही आठवली माय माउली,  
तिन्हीसांजेची वेळ, माऊली दारी उभी राहिली ।।

शेवटी संपला खेळ एकदाचा, त्याला फार रडू आले,
काळोखाच्या विळख्यात त्याला, एकटे एकटे वाटून गेले,
बेचैन अस्वस्थ पाउलांनी, धाव घराची घेतली,
 घरी परतण्याची तळमळ, आता शिगेला पोहोचली,
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे", हाक माऊलीची आली,
कर कटावरी ठेउनी, माउली दारी उभी राहिली ।।

----- विभव जोगळेकर 

No comments:

Post a Comment

प्रार्थना

जन्मोजन्मीचे वाहून ओझे, थकलो आता "आई" गं, आवराया हा सारा पसारा, मार्ग आता तू दावी गं... संचित बहू कर्माचे हे, नित्य भर त्यात पडते ...