Sunday, August 25, 2013

हेदवी


कोकणातल्या समुद्रकिनारी हिरवळीत नटलेलं, 
हेदवी आमचं गाव सुंदर  जोगळेकरांनी वसवलेलं ।।

डोंगरावरती  नवलाई  नि गावात लक्ष्मीनारायण, 
गावाच्या रक्षणार्थ साक्षात दशभूज गजानन ।।





समुद्रावरचा सूर्यास्त नि बामण घळीतली भरती, 
अजुनही लक्षात आहे नदीवरची डुम्बण्यातली मस्ती ।।

झोपाळ्यावरचा उंच झोका नि अंगणातली खेळी, 
चहाची वेळ होताच वाजे ललिता काकूंची चिपळी ।।



पडवीतल्या आराम खुर्चीत बसण्याची आम्हा मुलांची धडपड,
आणि आतमधे चाललेली मोठ्ठ्याची ती "निरर्थक" बडबड ।।

माडीवरच्या खोलीमध्ये रंगलेला पत्त्यांचा तो डाव, 
नि दुकानातून चोरलेल्या फरसाणावर मारलेला ताव ।।

गणेश चतुर्थीला दोन दिवस आधी रंगवायची ताटी, 
संध्याकाळच्या आरती नि साथीला तबला पेटी ।।

धुसरशी आठवण आहे हेदवीच्या आजीची, 


तिने सांगितलेल्या गोष्टी नि माडीखाली रंगलेल्या पेशन्सच्या डावाची ।।

दर रविवारी अप्पांसाठी हेदवीला व्हायचा फोन, 
"विभवा ! कसा आहेस ? काळजी घे " एवढेच शब्द दोन ।।

गेल्या गेल्या हेदवीला द्यायचा इंटरव्यू अप्पांचा, 
चौकशी प्रवासाची नि अहवाल खुशालीचा ।।

काळ बदलला,माणसे बदलली , आम्हीही आता मोठे झालो, 
जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी हेदवीचेच होऊन राहिलो  ।।
 

No comments:

Post a Comment

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...