मी माझ्याच तंद्रीत, अनवाणी, पायवाट तुडवीत चाललो होतो,
बेभान, बेफिकीर मी, माझ्याच मस्तीत चाललो होतो…
नाही चिंता, नाही फिकीर, नाही तमा कुणाची,
पायावाटेच्या वळणावळणावर, पावलं टाकीत चाललो होतो…
एकीकडे पसरलेला अथांग सागर होता…तर…
दुसऱ्या बाजूने, डोंगराच्या पायथ्याशी, संथ वाहणारी सरिता…
आजही पुन्हा त्या सागरावरच्या, सुर्यास्ताचा मी साक्षी होतो,
मी माझ्याच तंद्रीत, अनवाणी, पायवाट तुडवीत चाललो होतो…. ।१।
पावलांनी मात्र, घराकडे जाणारी, पायवाट धरली होती,
सायंकाळच्या त्या संधीप्रकाशात, निसर्गाच्या कुशीत हरवलो होतो,
मी माझ्याच तंद्रीत, अनवाणी, पायवाट तुडवीत चाललो होतो…।२।
पक्षांचे थवे घरी परतताना, मी निरोप त्यांचा घेत होतो,
आकाशातल्या रंगांच्या छटा, डोळ्यात साठवून घेत होतो,
स्वता:शी संवाद साधण्यासाठी, उद्या परत यायचं पक्कं करत होतो,
मी माझ्याच तंद्रीत, अनवाणी, पायवाट तुडवीत चाललो होतो…. ।३।

No comments:
Post a Comment