Wednesday, September 24, 2025

"आता तिच्या शिवाय करमत नाही .... "

"शेकू शिंदे" , ह्या माणसाची माझी ओळख पहिल्यांदा झाली २०१९ मध्ये, जेंव्हा आम्ही गृह प्रवेश करून स्वतः च्या घरात रहायला आलो. वारकरी असल्यामुळे गळ्यात तुळशीची माळ, डोक्यावर पांढरी टोपी, अंगावर २-३ एकावर एक चढवलेले शर्ट आणि  मळकट पांढरी विजार हा त्यांचा  पेहराव. वय अंदाजे ७०-७२.  सोसायटी मध्ये रोज सगळ्यांचा कचरा गोळा करणे आणि इमारतीची साफसफाई हे त्यांचं काम होतं. इथे ते बरीच वर्ष काम करीत होते. खिशात मोबाईल, त्यावर विठ्ठलाची भजनं  मोठ्या आवाजत लावून रोज सकाळी ते आणि त्यांची पत्नी Activa वरून कामाला येत! इथलं काम करायचं, बायकोला घरी पोचवायचं आणि नंतर एका हॉस्पिटल मध्ये "Watchman" च्या कामाला जायचं , म्हणून अगदी आत हॉस्पिटलचा शर्ट, त्यावर इथे काम करण्याचा मळकट शर्ट, त्यावर गाडी चालवताना घालण्याचा शर्ट हा पेहराव वर्षभर - उन्हाळा असो की थंडी!


जरी वारकरी असले तरी बोलायला तिखट. कोणी ह्यांच्या कामाबद्दल काहीही बोललेलं आवडत नव्हतं. वय झाल्यामुळे त्यांना काम अगदी पूर्वी सारखं जमत नव्हतं पण सोसायटीतले लोकं त्यांना सांभाळून घेत. तरी ह्यांची मात्र सगळीकडे अरेरावी चालायची. स्वभाव स्वाभिमानी, त्यामुळे कायम नाकावर "Ego", त्यामुळे सगळ्यांशी ह्यांची भांडणं ठरलेली.त्यांच्या बायकोला ऐकायला येत नव्हतं, त्यामुळे त्यांना मोठ्यांने बोलण्याची सवय लागलेली. इतकी की एखाद्याबद्दल दुसऱ्याकडे चुगली करायला गेले तर ज्यांच्याबद्दल सांगत आहेत त्यांना पण ऐकू जाईल ह्याच स्वरात नेहमी बोलणं. असा सगळं स्वभाव असला तरी का कोणास ठाऊक, मला आवडली ही व्यक्ती. वर्षातून दोनदा पंढरपूरला दर्शनाला जात, ते सोडलं तर ह्यांनी कधीही काम चुकवलं नाही. अगदी COVID काळात सुध्दा नाही. कधी कधी तर अंगात थोडा ताप असेल तरी काम करायला यायचे. ह्यांचा मुलगा रिक्षा चालवायचा, त्याला शिवण्याला घर घेऊन दिलेलं आणि स्वतः इथे जवळच छोट्या घरात रहायचे. 

त्यांच्या बायकोचं तंत्र थोडं वेगळं. मी त्यांना कायम साडीतच बघितलं. नवऱ्याच्या अगदी विरुद्ध, एकदम शांत. ऐकू येत नसल्यामुळे त्यांचा संवाद फार कमी असायचा, पण एखाद्या दिवशी बाहेर कचरा ठेवायला आणि त्या घ्यायला एकच वेळ आली की समजा तुमची ५-१० मिनिटे तरी गेलीच. त्या कोणी व्यक्ती दिसल्या की बोलायला सुरूच व्ह्यायच्या. मग समोरचा ऐकतोय की नाही, त्याला ऐकण्यात रस आहे की नाही, ह्या कडे त्यांचं लक्ष नसायचं. त्यांचं मनातलं सगळं बोलून झालं की कचरा उचलून पुढे जायच्या. कधी कधी फार वाईट वाटायचं, पण ऐन घाईच्या वेळी ह्या भेटल्या तर दडपण यायचं. कारण ह्यांना सांगून काही फायदा नाही!  "काय करावं " हा त्यांचा आवडता शब्द. प्रत्येक संवाद हा "काय करावं" ह्या शब्दांनी संपायचा. बऱ्याच  वेळा आम्ही morning  walk करून येताना ह्या खाली येऊन बसलेल्या दिसायच्या. आम्ही दिसलो की "चालायला गेला होता, बरं  आहे, थोडा तरी व्यायाम हवा, काय करावं" हे वाक्य ठरलेलं. 

२०२० साली मी जेंव्हा सोसायटीचा सेक्रेटरी झालो तेंव्हा माझा ह्यांच्याशी संपर्क वाढला. आधी पगार वाढवावा म्हणून पाठीशी लागलेले. बरेच वर्ष त्यांचा पगार कमीच होता, मग सगळ्या सभासदांशी बोलून ह्यांचा पगार वाढवला आणि सोबत थोडी कामाची यादी पण.  पगार वाढवून दिल्यामुळे माझ्यावर भलतेच खुश असायचे. त्यामुळे माझ्याशी बोलणं वाढलं तशी घरच्या बऱ्याच  गोष्टी सांगायचे. नवीन घर कसं छान सजवतोय, सून कशी छान काळजी घेते, नातवंड कशी त्यांच्याशी खेळायला येतात वगैरे वगैरे. कधी मुलाशी कुठल्या विषयावरून भांडण झालं असेल तर दुसऱ्या दिवशी येऊन मग मी कसा स्वावलंबी आहे, मला कशी कोणाचीच गरज नाही असं सुरु व्हायचे. कामाचा व्याप वाढला तसा मी सेक्रेटरी पदाचा राजिनामा दिला पण माझा आणि शिंदेंचा संवाद चालूच राहिला. नवीन सेक्रेटरी कसे चांगले नाहीत, कसे त्यांना पैसे कमी देतात, जास्त काम करून कसे घेतात ह्याच्या तक्रारी सुरु झाल्या. मी आपलं एका कानाने ऐकायचो आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. 

जानेवारी २०२४ उजाडला आणि एके दिवशी शिंदे आणि त्यांची बायको कामाला आलेच नाहीत. असं फार क्वचित व्हायचं. सेक्रेटरीनी फोन केला पण कोणीच उचलला नाही. २ दिवस झाले, ३ दिवस झाले काहीच बातमी नाही. शेवटी न रहावुन मी फोन केला तर शेकू शिंदेनी उचलला. त्यांचा आवाज ऐकून जरा मन शांत झालं . "काय हो शिंदे, ३ दिवस झाले तुम्ही आला नाहीत, काय झालं ?" मी विचारलं . "त्याचं काय झालं, आमच्या हिला पॅरालीसीस चा अटॅक आला, हॉस्पीटल मध्ये होतो, उद्या पासून येतो" असं सांगून फोन ठेवला त्यांनी. ऐकून फार वाईट वाटलं . दुसऱ्या दिवशी ते कामावर आल्यावर विचारपूस केली, डावी बाजू paralysed झाल्यामुळे बायकोला काहीच करणं शक्य नव्हतं. मुलगा आणि सून त्यांच्याकडे रहायला आले होते. डॉक्टरने हळू हळू तब्येत सुधारेल असं सांगितलं  होतं . मी त्यांना थोडा दिलासा दिला, काहीही मदत लागली तर निसंकोच सांगा म्हटलं. 

आता त्यांचं थोडं routine बदललं होतं, सकाळी बायकोचं  सगळं करून मग हे कामावर यायचे, दोनही बिल्डिंगचा कचरा एकट्याने गोळा करून, साफसफाई करून निघायचे हॉस्पीटलला. रात्री घरी गेले की सून मुलगा आपल्या घरी जायचे आणि शिंदे मग बायकोला सांभाळायचे. जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, पण ह्यांच्या बायकोच्या तब्येतीत काहीच विशेष फरक नव्हता. मार्च महिन्याच्या सुरवातीला मी त्यांच्याशी बोललो होतो, तब्येतीची चौकशी केली होती. एकदम हळवे झाले होते बायकोच्या बाबतीत. बायकोचं खाणं कमी झालं होतं, ह्यांनाच भरवायला लागायचं, त्यात सगळंच अंथरुणावर. एवढं असून शिंदेनी कधी काम नाही चुकवलं. 

साधारण २५ मार्चला माझी आई गोव्याला घरात पडली. तिला पण जोरदार पॅरालीसीसचा अटॅक आला होता. विनयने, माझ्या भावानेच तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून मला कळवलं. थोड्याच दिवसात मी गोव्याला गेलो, आईची तब्येत थोडी सुधारली होती, १-२ दिवस हॉस्पीटल मध्ये थांबलो आणि डॉक्टरने आईला डिस्चार्गे दिला. तिला घरी आणून मी पुन्हा पुण्याला कामावर रुजू झालो. त्या दिवशी शिंदे आले नाहीत. पुढे ३-४ दिवस ते नव्हतेच. आईची तब्येत बरी नसल्यामुळे मी त्या काळजीत होतो, त्या मुळे शिंदे ४-५ दिवस आलेच नाहीत हे लक्षात नाही आलं. एके दिवशी morning walk करून येताना बघितलं  तर शिंदे आणि त्यांचा मुलगा दोघेही कामावर होते. मी चौकशी करायची म्हणून विचारलं, "काय हो शिंदे, दिसला नाहीत ४-५ दिवस " तशी त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं . "गेली बघा आमची मला एकट्याला सोडून ... " असं म्हणत ते खालीच बसले. 
मी थोडा वेळ शांतच राहिलो. काहीच सुचेना काय करावं, काय बोलावं. मुलाने त्यांना उठवलं. "आज ५वा दिवस, पोरगा म्हणाला कामावर चला, घरी बसून नुसतं रडत बसणार म्हणून आलो इथे". मला काहीच सुचत नव्हतं . मी त्यांच्या पाठीवर हात ठेवत "काय करणार, काळा पुढे आपलं काहीच चालत नाही... " असं काही तरी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि तडक घरी आलो. आता त्या आजी आम्हाला दिसणार नव्हत्या, "काय करावं" हा प्रश्न कानी येणार नव्हता. 

गुढी पाडवा आला आणि आईची तब्येत गोव्याला बिघडली. विनयने ICU  मध्ये ऍडमिट केलं . तब्येत वर खाली होत होती, मुलाची फायनल exam तोंडावर होती, ती उरकून गोव्याला जायचं आमचं  ठरलं. शेवटचा पेपर होता नहुषचा. त्याला शाळेत पोचवून मी घरी आलो, गाडी park केली तो शिंदे आले. तब्येत उतरली होती. मी विचारपूस केली तशी रडायला लागले. "एकटं एकटं  वाटतं आता. घरी जावंसं वाटत नाही. दोन भाकऱ्या खा अजून म्हणून आग्रह करायला 'ही' नाही घरी. कोणासोबत जेवू? घरी बोलायला कोणीच नाही. म्हातारीला ऐकू येत नव्हतं पण मी बोललो की मान डोलायची, आता कोणाकडे बोलायचं. कोणावर ओरडायचं?  आता तिच्या शिवाय करमत नाही.... " 

एवढ्यात माझा फोन वाजला, विनयचा फोन होता. त्याचा टोन  खूपच गंभीर होता, "आईची तब्येत खूप serious आहे, होईल तेवढ्या लवकर निघा!" मी आणि ऋजुताने सामान भरलं, मी तसाच शाळेत जाऊन नहुषला घेऊन आलो आणि गाडीत बसलो. आम्ही कात्रज बोगद्याजवळ पोचलो आणि तेवढ्यात  बहिणीचा फोन आला. ती फोनवर रडत होती, "दादा , आई गेली" एवढंच ऐकू आलं . मी तसाच गाडी चालवत राहिलो, गोवा गाठे पर्यंत! आणि मनात मात्र शिंदेचं वाक्य घोळत होतं "आता तिच्या शिवाय करमत नाही ..... "


- विभव जोगळेकर 

Monday, September 15, 2025

केशातली अबोली..

ती लाजून पाठमोरी, चोरून अंग बसलेली,
संकेत मिलनाचा, सांगे केशातली अबोली... 
 
एक याम रजनीचा, उलटून असा गेलेला,
प्रत्येक सरत्या क्षणाला, श्वासांचा वेग वाढलेला,
गंध रातराणीचा, वेड मनास लावून गेला,
बंदिस्त भावनांचा, मांडूनी पसारा गेला,
उनाड झुळूक वाऱ्याची, गवाक्ष उघडून गेली,
अन चांदण्यात पौर्णिमेच्या, तिची कांती न्हाऊन गेली...
नेत्रोमिलन होता, हलकेच कळी  ती खुलली,
संकेत मिलनाचा, सांगे केशातली अबोली...  ।।१।।

बेभान मन आवरेना, ही चंचलता हवीहवीशी,
श्वासांची पण दुरी, आता नकोनकोशी,
लोचनी भाव प्रीतीचा, भावना समर्पणाची,
सरत्या प्रत्येक क्षणात, आतुरता मिलनाची,
चढत्या लयीत श्वासांच्या, संपली घालमेल जीवांची,
प्रेमात डुंबून गेली, जोडी ही रती मदनाची,
ती लाजून मिठीत त्याच्या, अशी विरघळून गेली,
संकेत मिलनाचा, सांगे केशातली अबोली....||२||

-- विभव जोगळेकर 

Thursday, September 11, 2025

चहा आणि कॉफी

तो आणी ती  गेले कॉफी प्यायला,
कॉफीचं निमित्त, प्रेमाचं हितगुज करायला,
कॉफी झाली गार, त्यावर आली साय,
तरी हातातला हात काही ह्यांचा सुटत नाय!!

मित्र मित्र गेले सगळे कॉफी प्यायला,
कॉफीचं निमित्त,  गप्पा मारायला,
कॉफी झाली गार, त्यावर आली साय,
परी ह्यांची बडबड काही अजून संपत नाय!!

आजी आणि आजोबा गेले कॉफी प्यायला,
कॉफीचं निमित्त, घराबाहेर वेळ घालवायला,
कॉफी झाली गार, त्यावर आली साय,
भूतकाळातून बाहेर अजून ते पडलेच नाय !!

तेवढ्यात आले दोन businessman कॉफी प्यायला,
कॉफीचं निमित्त, ' Deal close' करायला,
कॉफी झाली गार, त्यावर आली साय,
तरी अजून दोघांचं एकमत होत नाय!!

तेवढ्यात आले IT वाले कटिंग चाय प्यायला,
चहाचं निमित्त, ऑफिसचे प्रॉब्लेम सोडवायला,
थोडा सोडला धूर, सांगे कटिंग चाय,
चटकन सुचलं ' solution', चालले परत कामाला !!


चहा आणि कॉफीची ही अशी असते गंमत,
एक प्यावा कटिंग मध्ये आणि एक निवांत,
काही शौकीन कॉफीचे, काहीना टपरीवरची चाय,
काहीही प्या, प्रमाणात प्या, बाकी काय नाय !!

 ---- विभव जोगळेकर 


Tuesday, July 29, 2025

स्फूर्ती गीत

नभी दाटता काळे मेघ हे, मोर उदास ना कधी बसला रे,
लय लावूनी, फुलवूनी पिसारा, मोर थुई थुई नाचे रे ||

मेघ बरसणार जलधारा, अथवा वाऱ्यासंगे पसार रे,
उज्वल आहे काळ उद्याचा, काळे मेघ हे संकेत रे ||

संकट येता, नको बसू उदास, तुज शक्ती युक्तीचे वरदान रे,
काळ उद्याचा तुझाच असणार, गाठ मनाशी बांध रे ||

---- विभव जोगळेकर

Saturday, July 19, 2025

Oh life

Oh Life, it's no harm in being a little nice!!
I know you Love, to throw surprises,
But one at a time would be really nice!!

Nothing's permanant, nothing here to stay,
And you wanna tell this in your own way,
But you can be gentle, and may be less brutal,
Am here to face all and am not running away!!
Oh life....

You have been generous and you have been kind,
There have been some great times as I look behind,
But now you wanna test me in your own way,
Let me assure you am not running away,
Oh life...


--- Vibhav 

Sunday, July 6, 2025

अंतरीचा विठ्ठल

का जाऊ पंढरीला, विठूरायाच्या दर्शना,
विठू सदा माझ्या संगे, का तुम्हास दिसेना?

विठू माझा, शेतामंदी, राबतोया दिसभर,
शेताच ओझं माझ्या, माऊलीच्या पाठीवर,
गोठ्यामध्ये रखुमाई, कपिलेचे रूप घेई,
दूध पाजी या लेकरा, दुजे भाग्य काही नाही,
विठू असे तुमच्यात, का तुम्हा उमगना,
विठू सदा माझ्या संगे, का तुम्हास दिसेना?

बैसलागे विठू माझा, अगदीच दाराम्होरं,
श्वान होऊनी राखितो, आपुलेच तो मंदिर,
विठू पाणी विठू वारा, विठू आनंदाचा झरा,
जेथे जातो तेथे, संगे उभा असे तो सावळा,
विठू आस, विठू श्वास, विठू रोमारोमात भरला,
विठू सदा माझ्या संगे, का तुम्हास दिसेना?

विठू माझ्या घरी, बाळगोपाळात, 
विठू भजनात..., विठू कीर्तनात,
माझी नगरी भासे दुजी पंढरपुरी,
व्यापून राहिला... विठू चराचरी,
ठेवा तुम्ही ठेवा, विठू चरणी भाव,
विठू सदा तुम्हा संगे; दिसेल हो राव,
आता झाली सीमा, अधिक सांगवेना,
विठू सदा माझ्या संगे, का तुम्हास दिसेना?

--- विभव

Saturday, December 21, 2024

आयुष्य

मलाही ना समजला, तू पण समजण्याचा हट्ट करू नको,
जगण्याचा अर्थ शोधताना, जगणं विसरून जाऊ नकोस||

झोपडीत जन्मला कोणी, तर कोणाचं बालपण महालात,
तरी प्रत्यकाच्या वाट्यास दुःख असतेच, हे कधी विसरु नकोस| ||१||

जगण्याला पैसा लागतोच, लक्ष्मी उपासना सोडू नकोस,
तरी पैशासाठी वाट्टेल ते, हे सूत्र कधीच धरू नकोस ||२||

प्रत्येकात राम असतो, रावणही असतो दडलेला,
तरी कलियुग आहे मित्रा, कृष्ण गीतेची शिकवण विसरु नकोस ||३||

यत्न करणे तुझ्याच हाती, कर्मावर तू श्रद्धा ठेव,
सबुरीने फळाची वाट पहाताना, कर्म तैसे फळ विसरु नकोस ||४||

जन्म - मृत्यू ना तुझ्या हाती, इथे प्रत्येकाचे श्वास ठरलेले,
जन्मसेही उलटी गिनाती शुरू है, हे कधीही विसरू नकोस ||५||

का करतोस चिंता मित्रा, चिंता सखी चीतेची,
जे होणार ते अटळ आहे, हे कधी विसरु नकोस ||६||

शेवटी एकच सांगेन मित्रा, आयुष्याचे खरे सोबती तुझे श्वास आहेत,
त्या श्र्वासांची उपासना कर, हे अंतिम सत्य विसरू नकोस ||७||

---- विभव 

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...