Thursday, November 27, 2025

अव्यक्त

शेवटचे भेटले ते दोघे, त्याच जुन्या ठिकाणी,
जिथे कधी उमटली होती, प्रेमाची पहिली कहाणी,
शब्द ना आले ओठावरती, शांतता होती सोबती,
हृदयांचे चालले हितगुज, नजरेस नजर ना मिळती ।१।

संगतीने चालत होते, सावल्यांनाही कंप  विरहाचा,   
प्रत्येक पावला संगे, ठोका चुके  हा हृदयाचा,
हितगुज करून गेली, हळूच झुळूक वाऱ्याची,
नजरेस नजर मिळता, फुटला बांध भावनांचा ।२।

क्षणात गर्दी झाली, लोचनी त्या अश्रूंची,
गालावरून घरंगळत आली, ही धार दवबिंदुची,
क्षण विरहाचा आला, दोघे समजून चुकले,
इथून पुढची होती, बिकट वाट विरहाची ।३।

शेवटचे पाहिले त्याने, तिचे थरथरणारे डोळे,
डोळ्यात तिच्या आठवणी, आणि तुटलेली ती  स्वप्ने,
ना कसले वाद, ना राग, ना कसली स्पष्टीकरणे,
कसलाही आवाज न करता, तुटलेली दोघांची मने ।४।

शेवटी वळले दोघे, परतीच्या अनोळखी वाटेने,
दोन जीव अजून जुळलेले,  परी तोडली वीण नियतीने, 
निरोप हवेत विरघळला, पावसाच्या बरसत्या धारांनी ,
संपली साथ एकमेकांची, राहिल्या फक्त आठवणी ।५। 


--------- विभव जोगळेकर 

Tuesday, November 25, 2025

माऊली

तिने सोडला न धीर, वाट पाहत राहिली,
तिन्हीसांजेची वेळ, माऊली दारी उभी राहिली ।।

दिवे लागणीची झाली वेळ, लेकरू अजून नाही घरी,
संधी प्रकाशा आडून  हळूहळू, काळोख जाळे पसरी,
लेकराने असा मांडला खेळ, वेळेचे त्यास भान नाही,
गुंतले मन खेळण्यात, माऊलीची त्यास फिकीर नाही,
लेकराच्या काळजीने, कासावीस  ती  ऐसी झाली,
तिन्हीसांजेची वेळ, माऊली दारी उभी राहिली ।।

आली परतण्याची वेळ, सखे एक एक सोडून गेले,
मांडलेल्या खेळामध्ये, लेकरू मात्र गुंतून गेले,
क्षणभंगूर या खेळात, मन ऐसे रंगून गेले,
घराकडच्या वाटेपासून, अलगद ते दूर गेले,
खेळाच्या त्या मायाजाळात , नाही आठवली माय माउली,  
तिन्हीसांजेची वेळ, माऊली दारी उभी राहिली ।।

शेवटी संपला खेळ एकदाचा, त्याला फार रडू आले,
काळोखाच्या विळख्यात त्याला, एकटे एकटे वाटून गेले,
बेचैन अस्वस्थ पाउलांनी, धाव घराची घेतली,
 घरी परतण्याची तळमळ, आता शिगेला पोहोचली,
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे", हाक माऊलीची आली,
कर कटावरी ठेउनी, माउली दारी उभी राहिली ।।

----- विभव जोगळेकर 

Monday, November 17, 2025

बस लढ़ना है


सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...