Friday, July 31, 2020

श्रद्धा (की अंधश्रद्धा)

कराया साजरा आनंद, सण धुळवडीचा आला,
फाल्गुन पौर्णीमेत, गडी माय मातीत रंगला,
घातरक रंग तू निर्मिले, कितीएका तू मारिले,
तुझ्या 'श्रद्धे ' पायी तु, देवास मारलं ।। १ ।।
सर्प, मित्र शेतकऱ्याचा, म्हणून नागोबा पूजिला,
वन्य जीवही महत्वाचे, हाच संदेश दिधला,
तुझ्या श्रेष्ठ 'बुद्धी' पायी, नागाला दूध तू पाजीलं , 
 तुझ्या 'श्रद्धे ' पायी तु, देवास मारलं ।। २ ।।  
आषाढ मासी सण, वटपौर्णीमेचा आला,
झाडांचे महत्व तुला सांगून तो गेला,
वडाला दोऱ्यात बांधिले, तू जंगलच संपवलं,
 तुझ्या 'श्रद्धे ' पायी तु, देवास मारलं ।। ३ ।।  
भाद्रपद मासी बसले गणेश घरोघरी,
मातीची मूर्ती, विसर्जन मातीत, निसर्गाची पूजा ही खरी,
मूर्ती बनवुनी P. O. P. ची, तू नदीलाच मारलं ,
 तुझ्या 'श्रद्धे ' पायी तु, देवास मारलं ।। ४ ।।  
शरद ऋतूत, सण दिवाळीचा हा आला,
दारोदारी रोषणाई, उधाण आनंदाला,
तू निर्मिले फटाके, मिठाईत केली भेसळ ,
 तुझ्या 'श्रद्धे ' पायी तु, देवास मारलं ।। ५ ।।  
देव चराचरी आहे, वर्षभर सण हेच सांगती,
जपा निसर्गाला, जपा माणसा-माणसातली नाती,
स्वार्थ नी अज्ञानापोटी, विचार फक्त स्वताचा तू केला,
केले प्रदूषण, संपविले वन्य जीवनाला,
देव निसर्गात आहे, तू त्यालाच संपवायला निघाला,
देव माणसात आहे, तू माणुसकीलाच विसरला,
जपा निसर्गाशी नातं, तू नातंच तोडाया निघाला,
 तुझ्या 'श्रद्धे ' पायी, देवालाच माराया निघाला  ।। ६ ।।  

--------------विभव जोगळेकर 

Tuesday, July 21, 2020

आठवणीतले प्रवास - गोवा ते हेदवी



"बाबा गणपती बाप्पा लवकरच येणार आहे ना? आत्ता तो पाण्यातून येत असेल का?" नहुषने मला आज सकाळी हा प्रश्न केला. मला आधी प्रश्न कळलाच नाही. "पाण्यातून कसा येईल गणपती?" मी त्याला विचारलं. निरागसपणे तो उत्तरला, "बाबा, असं काय करता, गेल्या वर्षी पाण्यातूनच घरी गेला ना तो त्याच्या!!" मला हसू आलं, पण चेहऱ्यावर हसू न दाखवता मी म्हटलं "बरोबर, माझ्या लक्षातच आलं नाही!!"
बाबा कसे विसरले आणि आपण कसं बरोबर ओळखलं ह्या आनंदात तो गणपतीची आरती गुणगुणायला लागला. "बाबा आता हेदवीला केंव्हा जायचं? तिथे किती मज्जा येते, आरत्या  म्हणायच्या, मोरया मोरया करायच, मोदक खायचे.... " आता मात्र माझं भान हरपलं. नहुष आधीच हेदवीला पोहोचला होता, मनाने तो तिथेच होता, गणपती येण्याची आतुरतेने वाट पाहत. त्याला गणपती उत्सवाचे वेध लागले होते. आणि माझं मन आमच्या बालपणात गेलं. उत्सवातल सगळ्यात जास्त लक्षात रहातो तो गोवा - हेदवी प्रवास:

आम्ही रहायला गोव्याला आणि आमचं मूळ घर हेदवीला जिथे आम्ही सर्व जोगळेकर जमायचो गणपती साजरा करायला. ती परंपरा अजूनही आहे. गणपती जवळ आले की बाबा आधी बसचं reservation करून यायचे. त्याकाळी पणजी-मुंबई अशी रातराणी होती (अजूनही आहे, पण बहुतेक ३-४ गाड्या आहेत संध्याकाळच्या वेळेत). पांढरी - हिरवी एशियाड. मला ह्या गाडीचं प्रचंड आकर्षण होतं. बाबानी तिकीट बुक केलं कि आमची गणपतीची खरेदी व्हायची. गणपती समोर ताटी सजवायला रंगीत कागद, लाईटच्या माळा , पूजेला धूप, कापूर, चांगल्या आठवढाभर पुरतील एवढ्या उदबत्त्या, बुक्का इत्यादी. आठवड्याभराचे कपडे, खरेदी केलेलं सामान, प्रवासात लागणाऱ्या गरजेच्या वस्तू नैवेद्याचे खव्याचे मोदक इत्यादी सामान कमीतकमी बॅगमध्ये कसे पॅक केले जायचे ते आई आणि बाबांनाच ठाऊक. प्रवासाच्या दिवशी आम्ही ४ वाजे  पर्यंत पणजी बसस्थानकात असायचो. बस फलाटावर लागली की आमची घाई असायची जाऊन खिडकी पकडण्यासाठी. खिडकीकडे बसण्यासाठी स्पर्धा आणि आम्हा तिघा भावंडात भांडण झाल्याशिवाय प्रवास शक्यच नसायचा. मग आई वैष्णवीला आपल्याजवळ बसवायची, (खिडकीजवळ !! - young ones  always get the benifit !! ). मी आणि विनय एकाच सीट वर, अर्धा प्रवास तो खिडकीजवळ (म्हणजे सूर्य मावळेपर्यंत) आणि नंतर मला खिडकी मिळायची.
 प्रवास सुरु झाला की पोटातले कावळ्यांची कावकाव सुरु. आधी रंगीत poppins खायचे, मग ५० पैशेवाली पेप्सी असं करत करत बस सावंतवाडीला पोहोचायची. इथे वाहनचालक बदलले जायचे, त्यामुळे गाडी निदान ३० मिनिटे तरी  इथे थांबायची. इथे आलं की वडा पाव किंवा कांदा भाजीवर ताव मारायचा आणि पुढे कणकवलीला पोहोचलो की आवाज यायचा तो उसाच्या गाडीला बांदलेल्या घुंगरांचा. तेवढ्यात खिडकीत उभा रहायचा तो रसवाला. हातात उसाच्या रसाने भरलेले ग्लास. बाबा मग प्रत्येकाला एक ग्लास घ्यायचे आणि सोबत खायला कुरकुरीत लांब बोटं (bobbies का काय म्हणतात ते...) इथ पर्यंत सूर्य मावळलेला असायचा आणि मग मी बसायचो खिडकीकडे. संधीप्रकाशात गाडीच्या उलट दिशेने पळणारी झाडं पहायला मला खूप आवडतं. तो मंद प्रकाश आणि त्याचवेळी बसमध्ये लागलेले निळे दिवे, खिडकीतून येणारा गार वारा, वातावरण कसं एकदम बदलून जायचं. अशावेळी मूड खराब करायला हमखास मागच्या सिट्वरुन आवाज  यायचा, "जरा खिडकी बंद करतोस का रे बाळा? मागे थंडी वाजतेय". मग खिडकी बंद करून बाहेर बघत मी हरवून जायचो. थोड्या वेळाने गाण्याच्या भेंड्या सुरु व्हायच्या. वाटेत जेवण करून आमची एसटी रात्र १.३० च्या सुमारास चिपळूणला पोहोचायची. इथे उतरलो कि पुढच्या बसची वाट पहात बसणं हा कार्यक्रम असायचा. रात्र दीड ते पहाटे ४-४.३० वाजे पर्यंत. ह्या वेळेत चिपळूण स्टॅन्डवरच flavored milk, स्टॅन्डवरच्या canteen मधला वडा आणि चहा हा कार्यक्रम ठरलेला.

 इथून पुढचा प्रवास हा सगळ्यात रंजक आणि थरारक प्रवास असायचा. चिपळूण-हेदवी हे अंतर तस ६० किमीचं. पहाटे ४.३० ला बोऱ्याबंदर गाडी असायची, जी हेदवी गावाजवळ जायची. ह्या बसमध्ये जागा मिळवणं म्हणजे युद्ध जिकंण्यासारखं असायचं. गाडी स्टॅण्डवर आली की आई वैष्णवीला घेऊन आधी बसमध्ये चढायची, अर्थात जागा पकडण्यासाठी. मग आम्ही घुसायचो गर्दीत, आजूबाजूच्या लोकांना कोपराने ढकलत, लोकांच्या पायावर पाय देत आणि नाहीच काही जमलं तर उगाच रडत (sympathy मिळायची आणि पुढे जायला आत पण !!). बाबा मागून सामान चढवायचे आणि शेवटी चढायचे. त्यांना बहुतेक वेळा जागा मिळायची नाही. मग माझ्या जागेवर ते बसायचे नि मी त्यांच्या मांडीवर. एकदा तर मला आठवतंय, वैष्णवीला बाबांनी खिडकीतून आत ढकलून सीट पकडलं होतं. पुढे पुढे बसची वाट बघण्याऐवजी आम्ही खाजगी tempo ने  (त्या वेळेची खाजगी चिपळूण-गुहागर shuttle सर्व्हीस) प्रवास करत मोडकाआगर गाठायचो आणि तिथून हेदवी. ह्या टेम्पो मधल्या प्रवासाची एक आठवण अजून ताजी आहे, रात्री २च्या दरम्यान आम्ही गाडीत बसलो. लहान असल्यामुळे आम्ही दोन सीटच्या मध्ये बसायचो. गाडी निघाली की आतले दिवे बंद व्हायचे आणि रस्त्यावरचे दिवे काये ते प्रकाश टाकायचे त्या बंद टेम्पोमध्ये. त्या रात्री माझ्या समोरच्या सीटवर एक जख्खड म्हातारी बसलेली, तोंडाने तंबाखू चघळत. त्या रात्री प्रवास संपेपर्यंत, जवळजवळ तासभर रस्त्यावरच्या दिव्या समोरून गाडी गेली की मी मला तिचं दर्शन व्हायचं, दात पडलेले, बोळक्याने तंबाखू चघळत म्हातारी तंद्रीत हरवलेली !!. हे दर्शन मी कधीच विसरू शकणार नाही.  कधी प्रवास संपतो आणि कधी ती  उतरते असं झालं होतं  मला. 

पुढे कोकण रेल्वे सुरु झाल्यावर प्रवास थोडा सोपा झाला, मजेशीर झाला. पावसामुळे वाटेवर दिसणारे असंख्य धबधबे आणि वाटेतले बोगदे मोजत चिपळूण कधी यायचं कळायचंच नाही. त्यात वाटेत प्रत्येक स्टेशनवर उतरून परत चढायचं, गावातल्या मुलांना टाटा करायचा, वडापाव, मसाला लावलेली काकडी खायची असं  काहींना काही तरी चालू असायचं. पुढे तर बाबांनी पहिली वहिली tata indica घेतली आणि आमचा प्रवास खूप सुखकर झाला, पण त्या एसटीतल्या प्रवासाची मजा काही औरच असायची!!!

आता मात्र एक गोष्ट जाणवते, आम्हाला हा आनंद मिळावा म्हणून आई बाबांना किती कष्ट घ्यायला लागायचे त्यावेळी. आधी सगळी तयारी, मग रात्रभर प्रवास आणि इतकं थकून प्रवास करून हेदवीला पोहोचलं की आम्ही झोपी जायचो, पण आई मात्र लगेच कामाला लागायची. तिचं सासर ना ते!! कुठून आणायची एवढी ताकद. आदल्या दिवशी शाळेत मुलांना शिकवून, सामान आवरून, रात्रभर प्रवास करून, दमून भागून हेदवी गाठायचं ते दुपारी जेवणं झाली की तिला थोडी विश्रांती मिळायची!!

 हेदवी-गोवा बसने लहानपणी केलेले असंख्य प्रवास, त्या एशियाड मधला रात्रीचा निळा दिवा, स्टॅन्डवरचा उसाचा रस, चिपळूणला मिळणारं flavored milk...  काय आणि किती मजा...... प्रवासाची मजा!! 

---- विभव जोगळेकर 



Friday, July 17, 2020

|| २१व्या शतकातील अंधश्रद्धा ||




  1. रोज सकाळी फुलं, प्राणी आणि निसर्गाच्या चित्रांसह  "Good  Morning" मेसेज टाकल्याने लोकांची मॉर्निंग - गुड होते !! 
  2. Whatsaap आणि Facebook वर येणारी प्रत्येक पोस्ट ही खरीच असते आणि ती मी सगळ्यांशी share नाही केली तर मी घोड चूक करतोय !!
  3. Facebook वर पोस्ट केल्याशिवाय प्रवास करणं अशुभ असतं !!
  4. Whatsaap स्टेटस आणि Facebook वर उसनं  ज्ञान (Forwarded messages) लोकांना share करून मी लोकांना शिक्षित करतोय !!
  5. Facebook account वर जेवढे जास्त friends तेवढं चांगलं !! (माझ्या मते बरीचशी लोकं हे तुमच्यावर पाळत ठेवायला तुमच्या  facebook लिस्ट मध्ये असतात)
  6. Facebook वरच्या प्रत्येक पोस्टवर मी मत मांडलंच पाहिजे आणि ते माझं कर्तव्यच आहे!!
  7. माझ्या हातात "स्मार्टफोन" आहे म्हणजे मी आपोआप photographer होतो, मग मिळेल त्या गोष्टीचे फोटो मी काढलेच पाहिजेत !!

तळ टिप  - यातल्या काही अंधश्रद्धा मी पण बाळगतो 

Monday, July 6, 2020

अभंग - १



तुझ्या नामाचा गोडवा, कैसा कळेल त्यांना,
 ज्यांच्या मनी वासना, दृढ आहे  ।।

तुझ्या भक्तीचा महिमा, कैसा कळों आम्हा,
द्वैत भाव जेथे, दृढ आहे  ।।

निर्गुणाचे ज्ञान, कैसे होईल आम्हा,
मन आमुचे प्रवृत्ती, दृढ आहे।।

ऐसे आम्ही जरी, कृपा तूची करी,
सर्वा ठायी तूची, दृढ आहे।।

प्रार्थितो विभव, तुझा विसर ना होवो,
तुझ्या चरणी हे मन, दृढ राहो।।

 - विभव जोगळेकर

सद्गुरू राया





नाही त्रिभुवनी, तुज सम कोणी,
तूची चराचरी, सद्गुरू राया ।।

तूची मायबाप, तूच मायेचा सागर,
तूची करुणाकर, सद्गुरू राया ।।

सद्गुरू चरण, हेची तीर्थस्थान,
अमंगल करी मंगल, सद्गुरु राया ।।

तव एक एक बोल, जणू ब्रम्हयाचा वेद,
आम्हा हाच आशिष, सद्गुरू राया ।।

अखंड तुझे स्मरण, नित्य हो साधन,
हे एकची मागणे, सद्गुरू राया ।।

विजय सुत, मी दास नारायणी,
नामीतो तव चरणी, सद्गुरू राया ।।

------------ विभव जोगळेकर






पारिजात

पहाट झाली, कळी उमलली,
मंद सुगंध दरवळला,
शुभ्र नी भगवं वस्त्र लेवूनी,
पारिजात हा फुलला  ।।

तुटले मूळ, सुटले फुल,
घरंगळत आले पानावरती,
मंद वाऱ्याच्या झुळुकेसांगे,
पारिजात आला धरणीवरती ।।

त्या फुलास ना ठाऊक,
उद्या त्याचे काय होणार,
सडा सजवुनी कोमेजणार,
की देवाचरणी दरवळणार ।।

क्षणभंगुर आयुष्याचे,
त्या वेड्यास काय घेणे,
त्यास ठाऊक एकच धर्म,
दुसऱ्यास आनंद देणे ।।

 -----विभव जोगळेकर 

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...