Thursday, October 30, 2025

शेतातलं पहिलं प्रेम


ऊन सकाळचं, हलकं सोनेरी,
तो शेतात.... वडिलांसोबत नांगर फिरवी ,
घाम कपाळावर, पण हसू ओठावर ,
मनात मात्र एकच प्रश्न....
"आज ती येईल का पाणवठ्यावर? "

डोक्यावर घागर, परी ओढणी उडते,
चाल तिची हळू हळू, हृदय त्याचं  धावते,
नजरा नजर क्षणभर, अन ती अशी काही लाजते,
जणू काही वेळेसाठी जग थांबते.... सारं जग थांबते !!

तो बैल हाकतो,  चुकवून नजर,
ती सावरते केस, खळी  गुलाबी गालावर,
संवाद सारा नजरेतून, हे गुपित मनाचं,
अन त्या शेतात, पेरलं  बी, पहिल्या प्रेमाचं ... पहिल्या प्रेमाचं !!

 ----- विभव जोगळेकर 

Friday, October 3, 2025

डोळ्यात ह्यांच्या हो रजनी..

नदी तीरावर बसले दोघे, पाण्यात पाय सोडुनी,
सूर्य तळपती डोक्यावर, अन् डोळ्यात ह्यांच्या हो रजनी!!

एक सांगतो दुसऱ्याला जरा, ऐक रे, खळखळणारे पाणी,
पाण्यामध्ये बागडणाऱ्या, मास्यांची ती गाणी,
मास्यांच्या त्या बागडण्यावर, लक्ष ठेवुनी कुणी,
सूर्य तळपती डोक्यावर, अन् डोळ्यात ह्यांच्या हो रजनी!!

ऐक रे तो, बगळा बसला, धीर - गंभीर अनुष्ठानी,
चित्त त्याचे मास्यांवरती, लाळ टपके मुखातूनी,
सूर मारून, मासा नेला, खंड्याने चोचीतूनी,
सूर्य तळपती डोक्यावर, अन् डोळ्यात ह्यांच्या हो रजनी!!

पात्यांचे ते वार झेलती, नदी ही अंगावरती,
नाव निघाली स्वार होऊनी, ऐटीत लाटांवरती,
तुषार झेलती अंगावरती, बैसुनी आंधळे किनाऱ्यावरती,
सूर्य तळपती डोक्यावर, अन् डोळ्यात ह्यांच्या हो रजनी!!

  ---- विभव जोगळेकर 

सूर्यास्त - २

सूर्य अस्ताला निघाला, खेळ लाटांचा मंदावला, का अशावेळी खुणावते, अनामिक ओढ ही मनाला... ओढ अशी ही लागते, मन बेचैन असे हे होते, जसे ओळखीचे कोणी,...